Book Title: Pashu Pakshi Srushti Don Vibhinna Drushtikon
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra

View full book text
Previous | Next

Page 3
________________ पशु-पक्ष्यांचा समावेश निश्चितपणे केला आहे परंतु कीट, पतंग इ. क्षुद्र जीव आणि वनस्पती यांच्याबाबतीत एकरूपता दिसत नाही. __ पशु-पक्ष्यांचे विभाजन स्थूलमानाने जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज्य या चार प्रकारे केलेले दिसते.२३ चरकसंहितेची एकंदर दृष्टी कायचिकित्सेला प्राधान्य देणारी असल्यामुळे त्यांनी वेगळीच परिभाषा वापरून पशुपक्ष्यांचे आठ प्रकारात विभाजन केलेले दिसते. औषधयोजना सुचवताना ते या विभाजनाचा वारंवार आधार घेतात. १) प्रसह - अन्न हिसकावून घेणारे व भक्ष्यांवर तुटून पडणारे - गाय, गाढव, घोडा, वाघ इ. २) बिलेशय - बिळात राहणारे - साप, मुंगूस, बेडूक इ. ३) आनूप - विपुल पाण्याच्या प्रदेशात राहणारे - हत्ती, म्हैस इ. ४) वारिशय - पाण्यात राहणारे - मासे, कासव, मगर इ. ५) जलचर - जलात विचरण करणारे - हंस, बदक, बगळा इ. ६) जांगल - कमी पाणी असलेल्या प्रदेशात राहणारे - हरीण, सांबर, मोर इ. ७) विष्किर - भक्ष्य पायांनी उकरून खाणारे - तित्तिर, कोंबडा, कवडा इ. ८) प्रतुद - चोचीने टोचून खाणारे - चिमणी, पोपट, सुतार इ.२४ ___ याखेरीज इतर प्रकारे केलेले पशु-पक्ष्यांचे वर्गीकरण चरकसंहितेत आढळत नाही. या वर्गीकरणाचा आधार चरकसंहिताकार आपल्या विवेचनात कशाप्रकारे घेतात ते पाहू. त्या विषयीची विधाने अशी आढळतात. १) शीतऋतूत जलस्थ प्राण्यांचे मांस भक्षण करावे. २) वर्षाऋतूत डाळीच्या पाण्यात उकडलेल्या, जांगल देशातील जनावरांच्या मांसाचे सेवन करावे.२५ ३) कुष्ठ, जलोदर किंवा प्रमेह रोग झालेल्या मनुष्याने ग्राम्य, जलज जनावरांचे मांस खाऊ नये.२६ जैन तत्त्वज्ञानाने जीवसृष्टीची ज्या अनेक प्रकारे वर्गवारी किंवा चिकित्सा केली आहे, त्याप्रकारची वर्गवारी अगर चिकित्सा चरकसंहितेने थोडीसुद्धा केलेली नाही. वेदना, कषाय, भावभावना, मन, ज्ञान इ. अनेक निकष पशु-पक्षीसृष्टीला लावले असते, तर औषधयोजनेसाठी पशु-पक्ष्यांचा वापर सांगताना त्यांना अर्थातच खूप मर्यादा आल्या असत्या. (३) आयुर्वर्धन व रोगचिकित्सेसाठी चरकसंहितेत प्रतिबिंबित झालेली पशु-पक्ष्यांची उपयुक्तता : चरकसंहितेतील सूत्रस्थानात औषधयोजनेसाठी 'द्रव्य' हा शब्द वापरलेला आहे. उत्पत्तिभेदानुसार औषधयोजनेसाठी वापरलेल्या द्रव्यांचे तीन प्रकार होतात. जांगम, औद्भिद आणि पार्थिव. चरकसंहितेत स्पष्टत: म्हटले आहे की मधु, गोरस, (दूध, दही इ.), पित्त, वसा, मज्जा, रक्त, मांस, मल, मूत्र, चर्म, शुक्र, स्नायु, शृंग, नख, खुर, केश, रोम व गोरोचन या ‘जांगम' द्रव्यांचा औषधकार्यात उपयोग केला जातो. जांगम द्रव्यांमध्ये निर्दिष्ट केलेले पशु-पक्ष्यांचे जे अवयव आहेत, ते पशु-पक्षी जैनदृष्टीने 'समनस्क पंचेंद्रिय त्रसजीव' आहेत. चरकसंहितेतील 'पार्थिव' औषधे म्हणजे सुवर्ण, रजत, लोह, चुना, गेरु, क्षार इ. आहेत. जैनदृष्टीने पृथ्वीच्या अंतर्भागात असलेली ही खनिजद्रव्ये 'पृथ्वीकायिक एकेंद्रिय स्थावर' जीव आहेत. चरकसंहितेच्या दृष्टीने 'औद्भिद' द्रव्ये म्हणजे विविध प्रकारच्या वनस्पती होत. औद्भिद द्रव्यांची १८ ग्राह्य अंगे सांगितली आहेत. यांमध्ये प्राय: सर्वच ताज्या वनस्पतींची अंगे आहेत.२७ जैनदृष्टीने सजीव अवस्थेतील सर्व प्रकारच्या वनस्पती म्हणजे 'एकेंद्रिय स्थावर वनस्पतीकायिक' जीवांचे स्कंध होत. चरकसंहितेतील सूत्रस्थानाच्या दुसऱ्या अध्यायात शिरोविरेचन (नस्य), वमन, विरेचन, आस्थापनबस्ती आणि अनुवासनबस्ती अशी पंचकर्मे सांगितली आहेत. या ग्रंथात विविध ठिकाणी या पंचकर्मांचे उल्लेख विखुरलेले आहेत. या पाचपैकी वमन, विरेचन व मुख्यत: बस्तीसाठी पशु-पक्ष्यांच्या मांसाचा, मांसरसाचा किंवा विविध प्रकारच्या कातड्यांचा वापर केलेला दिसतो.२९

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9