________________
उपसंहार :
प्रचलित आयुर्वेदशास्त्रात चरक, सुश्रुत व वाग्भट या वैद्यत्रयीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शास्त्रशाखेत चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व अष्टांगहृदय हे तीनही ग्रंथ विस्ताराने अभ्यासले जातात. चरकसंहितेतील जांगमद्रव्यती केलेली चिकित्सा विस्ताराने पाहिली. परंतु आत्ता प्रचलित असलेल्या आयुर्वेद चिकित्सेत औद्भिद द्रव्ये विशेषत्वान व पार्थिव द्रव्ये त्याखालोखाल वापरली जातात असे दिसते. आयुर्वेदाचार्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून असे समजले की, औषधयोजना आणि पंचकर्मे इ. मध्ये मांस, मांसरस, पशु-पक्ष्यांचे अवयव इ. चा वापर करणे जवळजवळ पूर्णतः थांबले आहे. आयुर्वेद - चिकित्सा पद्धतीत हे स्थित्यंतर येण्याचे कोणते कारण आहे, याचा विचार केला असता आपल्याला असे दिसेल की, हा अनेक भारतीय विचारधारांचा एकत्रित परिणाम आहे.
जैन आणि बौद्ध विचारधारांमध्ये अहिंसा, करुणा आणि दयेला दिलेले अनन्यसाधारण स्थान आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा या मागच्या कारणांचा एक घटक दिसतो.
ज्या वैद्यांनी आयुर्वेदिक चिकित्सेची परंपरा पुढे चालविली, त्यांनाच हळूहळू दया, करुणा, मैत्री व विशेषतः आत्मौपम्य या सदाचरणाच्या नीतिनियमांवर विचार करीत असताना, पशु-पक्ष्यांच्या घातावर आधारित चिकित्सापद्धती, गर्हणीय वाटू लागली असावी. परिणामी जैन सोडून प्राय: इतर भारतीय समाजाच्या, सामान्य अन्नपानविधीत मांसाहाराचा समावेश होत राहिला तरी, औषधयोजनेतून मात्र पशु-पक्ष्याधार चिकित्सेला रजा मिळाली.
जैन परंपरेने मात्र काळाच्या ओघात प्रासुक- एषणीय चिकित्सेचा स्वीकार केला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्यांच्या तिर्यंचविषयक धारणेच्या तत्त्वज्ञानातून लाभलेली होती.
निष्कर्ष :
वेदनीय व आयुष्यकर्माच्या प्रबलतेपेक्षा, पुरुषार्थाला प्राधान्य देऊन जैनपरंपरेने प्रासुक - एषणीय चिकित्सापद्धतीपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतले. तसेच आयुर्वेद विशारदांनीही आरंभी जांगम चिकित्सेला प्राधान्य दिले तरी वर नमूद केलेल्या अनेक कारणांमुळे, स्वत:त योग्य ते बदल घडवून, धर्माचे ‘अहिंसा' हे मूलतत्त्व अबाधित राखले. म्हणजेच चरकसंहितेतील मानवकेंद्री विचारांपासून त्यांनी 'सर्वप्राणिहिते रतः' हा दृष्टिकोन स्वीकारला आणि जैन परंपरेने ‘सर्वप्राणिहिते रतः' या तत्त्वाच्या भक्कम पार्श्वभूमीवर, चिकित्सेच्या पूर्ण निषेधाची आग्रही भूमिका सोडून, आरोग्यरक्षणाला प्राधान्य दिले. पुरुषार्थाची कास धरली. एकंदर भारतीय संस्कृतीचे वस्त्र अशाच विविध वैचारिक परंपरांच्या आदान-प्रदानातून विणत राहिले आहे आणि विणत राहील.
१) तत्त्वार्थसूत्र ८.११
२) तत्त्वार्थसूत्र ४.२७
३) तत्त्वार्थसूत्र २.२४
४) तत्त्वार्थसूत्र २. २५ व त्यावरील टीका
५) तत्त्वार्थसूत्र २.३४
६) आचारांग १. ११८
७) तत्त्वार्थसूत्र २.३२
८) प्रज्ञापनासूत्र १.५४ ते ८१
९) स्थानांगसूत्र ४.५५०
संदर्भ
१०) स्थानांगसूत्र ४.५५१
११) तत्त्वार्थसूत्र १.२३
१२) ज्ञातृधर्मकथा अध्ययन १३.३५ ते ४२
१३) भगवती आराधना १६४४ ; उत्तराध्ययन १४.४६, ४७ ; ३२.३७, ५०, ६३, ७६, ८९; ४.६ ; १४.४४