Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 20
________________ वडिलांची भलावण करते. त्यांची मर्जी संपादन करते. मदनासुंदरीचा कर्मसिद्धान्तावर दृढ विश्वास असतो. ती वडिलांना सांगते, 'माझ्या कर्मात असेल तोच नवरा मला मिळणार.' राजा रुष्ट होतो. मदनासुंदरीचं लग्न मुद्दामच एका कुष्ठरोग्याशी लावून देतो. ती पतीचे औषधोपचार करते. जोडीला सिद्धचक्राची उपासना करते. पती निरोगी होतो. स्वपराक्रमाने राज्यही मिळवतो. राजाही अखेर कर्मसिद्धान्ताचे श्रेष्ठत्व मान्य करतो. प्राविण्य मिळवण्याच्या ७२ कला सुप्रसिद्ध आहेत. 'मतिशेखर' नावाच्या मंत्र्याने 'चौर्यकला' ही ७२ वी कला असल्याचे चातुर्याने कसे दाखवून दिले ती कथा 'प्राकृत - विज्ञान-कथे'त नमूद केली आहे. शिक्षण आणि नम्रता यांच्या जोरावर एका अश्वाधिपतीकडे नोकर म्हणून रहाणारा युवक, कोणती युक्ती करून त्याचा घरजावई झाला - याची कथा 'उपदेशपद' या कथासंग्रहात येते. श्रोतेहो, पुण्यातील ‘सन्मति - तीर्थ' नावाच्या संस्थेमार्फत जैन प्राकृत कथांच्या मराठी अनुवादाचे काम झपाटा चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले असून सहावा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे. जिज्ञासूंनी याची जरूर नोंद घ्यावी. समाजातील उच्चभ्रू वर्गापासून तळागाळापर्यंतच्या स्त्री-पुरुषांच्या सर्व प्रवृत्तींवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा प्रामुख्यानं मध्ययुगीन समाजजीवनाचा जणू आरसाच आहेत. या कथांच्या प्रामाणिक अनुवादाच्या आधारे अनेक अंगांनी त्यांची समीक्षा करता येईल. यातील व्यापार-व्यापारी मार्ग व अर्थशास्त्र अतिशय लक्षणीय आहे. 'स्त्रीवादी' समीक्षकांना तर अलीबाबाची गुहा सापडल्याइतका आनंद होईल. काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा शोध घेता येईल. यातील पुनरावृत्त ‘मिथके' घेऊन जागतिक वाङ्मयात शोध घेता येईल. हिंदू - जैन-बौद्ध यांच्यातील परसंबंध वेगळीच सामाजिक तथ्ये उघड करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व आबालवृद्धांचे त्या निखळ मनोरंजन करतील. श्रोतेहो, अखेरीस एक गोष्ट आवर्जून नमूद करते की क्लिष्ट, कंटाळवाण्या, उपदेशांनी भरलेल्या, दीक्षावैराग्याचा अतिरेक असलेल्या, पूर्वजन्म - पुनर्जन्मांच्या अतिरिक्त वर्णनांनी मुख्य कथावस्तू हरवलेल्या, अतिशयोक्त जैनीकरणाने असंभाव्य वाटणाऱ्या - अशाही अनेक कथा या 'जैन कथाभांडारा'त आहेत. राजहंसाच्या वृत्तीने आपण साररूपाने त्या ग्रहण करू या आणि त्यातील वेचक कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून आपले सांस्कृतिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करू या !! प्रेमाने म्हणू या - जय जिनेन्द्र !! **********

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28