Book Title: Dashalakshnaparva Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 4
________________ दशलक्षणपर्व - चिंतन ४ डॉ. नलिनी जोशी अनुप्रेक्षा अर्थात् चिंतनाचा चौथा मुद्दा आहे 'अन्यत्व !' 'एकत्व' ही जर नाण्याची एक बाजू असेल तर दुसरी बाजू आहे ‘अन्यत्व’. रक्ताच्या आणि मैत्रीच्या नात्यांनी आपण अष्टौप्रहर वेढलेले असतो. आपण सर्वांनाच प्रेमाने 'हे माझे आहेत', 'हेही माझेच आहेत', असे म्हणत रहातो. वस्तुत: हे सर्व आपापल्या कार्यसिद्धीसाठी, सोयीसाठी एकत्र आलेले असतात. कर्मांची गती गहन असते. अगदी आपल्या निकटचे जवळचे देखील मला सुख-दुःखांचे साक्षात्कार घडविण्यासाठीच एकत्र आलेले असतात. परस्परांचा स्वार्थ सिद्ध होण्याची चिह्न दिसेनाशी झाली की येतं वितुष्ट ! मग आपलेपणा संपतो, परकेपणा सुरू होतो. म्हणून अनुकूल-प्रतिकूल - सर्वांना समानतेने आपल्या आत्म्यापासून 'अन्य', 'भिन्न' मानणं इष्ट ठरत ज्याच्यावर आपली प्रीती असते, भक्ती असते त्याचा मृत्यू, त्याचं काही वाईट होणे - या गोष्टींनी आपण हळहळत रहातो. शोक करतो. परंतु खरी गोष्ट अशी की आपण संसारसागरात स्वत:च बुडत आहोत याचं भान आपल्याला रहात नाही. तेव्हा अन्यत्वभावनेने असा विचार करावा की मला तरून जाण्यासाठी मीच हातपाय हलवले पाहिजेत. शोचनीय स्थिती तर माझी स्वत:ची आहे. मी जर माझ्या शरीरापासून भिन्न आहे तर पुत्र - मित्र इत्यादी सगळे नक्कीच अन्य आहेत. घटकेघटकेला जर मी संयोग-वियोगाने आनंदी आणि दुःखी होऊ लागेन तर आत्मकल्याणच्चा मार्ग मला कधीच दिसणार नाही. अन्यत्वाचा विचार जसजसा दृढ होईल तसं स्पष्ट जाणवू लागेल की शरीर आणि आत्मा पूर्ण भिन्न आहेत. शरीराला इंद्रिये आहेत. आत्मा इंद्रियरहित आहे. शरीर अज्ञ आहे, आत्मा ज्ञानवान् आहे. शरीर अनित्य तर आत्मा नित्य आहे. शरीराला आदि-अंत आहे. आत्म्याला नाही. संसारात भ्रमण करताना आत्म्याला कोट्यवधी शरीरे प्राप्त झाली होती आणि नंतरही होणार आहेत. इतकी तुलना स्वत:हून केली की आत्म्याचे अन्यत्व आपल्या मनावर चांगले ठसते. लोकव्यवहार, जगरहाटी चालू राहण्यासाठी आपण अनेक मानीव संबंधांना, शरीराला अगदी आपले म्हणतो. परंतु आध्यात्मिक पातळीवर पोहोचले की डोळ्यात भरते ते पृथक्त्व, अन्यत्व, वेगळेपणा ! अन्यत्वाच्या चिंतनाने ही जाणीव होते की सांसारिक सुखांच्या लक्षावधी पटींनी अधिक असा अत्युच्च आनंदाचा, प्रसन्नतेचा साठा माझ्या आत्म्यात आहे. किंबहुना सत्-चित्-आनंदमय हेच त्याचे स्वरूप आहे. क्षणिक सुख-दुःखे क्रमाक्रमाने येतील आणि जातील. त्यांच्यात किती वाहून जाणार ? आपल्या मूळ आनंदी स्वभावात रममाण रहाणेच इष्ट आहे. सारांश काय, अन्यत्वाचं चिंतन जणू काही माणसाला सदैव प्रसन्नतेचं वरदानच देऊन जातं ! **********Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10