Book Title: Dashalakshnaparva Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 6
________________ दशलक्षणपर्व ― चिंतन ६ डॉ. नलिनी जोशी नित्य चिंतनाचा सहावा मुद्दा आहे 'लोक - अनुप्रेक्षा'. जीव म्हणजे चेतनतत्त्व. पुद्गल म्हणजे अचेतन जड पदार्थ. या दोघांच्या गती आणि स्थितीला सहायक ठरणारे पदार्थ म्हणजे धर्म आणि अधर्म . पाचवा पदार्थ आहे काल अर्थात् समय. हे पाच पदार्थ आकाशाच्या जेवढ्या भागात रहातात त्याला 'लोक' असं म्हणतात. या लोकाचे तीन भेद आहेत. अधोलोक, मध्यलोक आणि उर्ध्वलोक. आकाशाचे दोन भाग आहेत. लोकाकाश आणि अलोकाकाश. लोकाकाश मधोमध आहे. लोकाचा आकार ज्याने आपले दोन हात कमरेवर ठेवले आहेत आणि पाय दूर पसरून ठेवले आहेत अशा पुरुषाच्या आकाराप्रमाणे आहे. या संपूर्ण लोकाला तीन वातवलयांचे वेष्टन आहे. घनवात, घनोदधिवात आणि तनुवात अशी त्यांची नावे आहेत. पुरुषाकार लोक हा विश्वातला सर्वात मोठा स्कंध आहे. या लोकात मध्यभाग त्रसजीवांनी भरलेला आहे. जैन परंपरेने त्रैलोक्यास अनादि-अनन्त मानले आहे. त्रैलोक्य हे कोणीही निर्माण केलेले नाही. ते वर वर्णन केलेल्या सहा पदार्थांच्या अर्थात् द्रव्यांच्या समवायाने बनले आहे. सोमदेव नावाच्या आचार्यांनी जगत्कर्तृत्वाचे खंडन अतिशय प्रभावीपणे संस्कृत श्लोकात केले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश हे फक्त आपल्या बुद्धीने अथवा इच्छेने जग निर्माण करू शकतात का ? बुद्धीने म्हणाल तर, जगात गवत पुष्कळ ठिकाणी आहे. मग त्यापासून चटई आपोआप बनायला हवी. पण तसे तर दिसत नाही. इच्छेने म्हणाल तर केवळ इच्छा आहे म्हणून चटई बनताना दिसत नाही. इच्छा आणि बुद्धी दोन्हींनी म्हणाल तर इच्छा-बुद्धी असलेला स्वस्थ बसला तर चटई कशी बनेल ? ब्रह्मा इ. जगाचे कर्ते आहेत. तर घरं, पूल इत्यादी बांधायला सुतार, गवंडी कशाला हवेत ? कारण जे एवढे मोठे जग निर्माण करतात ते घरं इत्यादी का निर्माणकरणार नाहीत ? शिवाय मुख्य मुद्दा हा की जगत्कर्ता मानला की त्याला कोणी बनवले हा प्रश्न उरतोच. तो काही केल्या सुटत नाही. म्हणून जग आहे तसे कर्त्याशिवायच स्वीकारले पाहिजे. त्रैलोक्याच्या चिंतनानंतर स्वत:ला असे समजावून सांगावे की, 'हे जीवा, पापपुंजांनी तू वेढला गेलास की नरकात जन्मतोस. कधी-कधी पशु-पक्षी बनतोस. पुण्यप्रकर्षाने स्वर्गात जातोस. पाप-पुण्य उभय संयोगाने मनुष्यगतीत येतोस. हे त्रैलोक्य आजवर तुला लाभलेले अतिविशाल असे घर आहे. या घरात तू अनंत जन्म रममाण झाला आहेस. परंतु त्रैलोक्याच्या अग्रभागी मोक्षस्थानही आहे. तुला त्याची जाणीव आहे. प्रयत्नपूर्वक तू तेथे पोहोचू शकतोस. प्रयत्न करून पहा. ' लोकानुप्रेक्षेच्या या भव्य चिंतनातून विचारशील माणसाने कर्मबंधनातून कायमची मुक्तता करून घ्यावी अशी जैन परंपरेची धारणा आहे. **********Page Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10