Book Title: Dashalakshnaparva
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ दशलक्षणपर्व - चिंतन 10 डॉ. नलिनी जोशी चिंतनासाठी दिलेल्या बाराव्या म्हणजे अखेरच्या मुद्याचं नाव 'बोधिदुर्लभ' असं आहे. बोध, बोधि, बुद्ध - हे शब्द खास करून श्रमण परंपरेचे बोधक आहेत. बोधीचं वर्णन एका शब्दात, वाक्यात करणं कठीण आहे. आत्मसामर्थ्याचं भान म्हणजे बोधी. अनित्यता, नश्वरता, अशरणता यांची आतून उमललेली जाणीव म्हणजे बोधी. त्रैलोक्याचं स्वरूप प्रत्येक जीवानं केलेली जन्ममरण-संसरणे या सर्वांचं चिंतन करीत असता सद्गुणांची केलेली नैष्ठिक जोपासना म्हणजे बोधी. ___ यावरून स्पष्टच आहे की अशी बोधी प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. चार गतींमध्ये भ्रमण करताना आधी मनुष्यगती लाभणे कठीण ; त्यातही धर्मश्रवणाची इच्छा होणे कठीण ; खऱ्या त्यागी मुनींचा सहवास त्याहून दुर्लभ आणि स्वत: त्या मार्गावर अग्रेसर होणं तर त्याहूनही दुर्लभ आहे. एखादा आंधळा माणूस सहज टाळ्या वाजवीत असताना, त्याच्या दोन हातांमधे अचानक बदक सापडणं जितकं अशक्य तितकीच बोधीची प्राप्ती दुर्लभ आहे. सोमदेवसूरि असा विचार नोंदवतात की अतिशय कष्टानं प्राप्त झालेला मनुष्यजन्म जे रोग, शोक, भीती, भोग आणि परिवाराची आसक्ती - यांच्यायोगे व्यर्थ घालवतात ते जणू राख मिळवण्यासाठी मौल्यवान् चंदनाची लाकडं जाळून टाकतात. दोरा मिळविण्यासाठी हारातले मोती काढून फेकून देतात. असा बोधिप्राप्त मनुष्य लोभ, मोहावर काबू मिळवतो. सहजपणे, लीलया प्राणिमात्रांवर दया करतो. योग्य संधी मिळताच त्याच्या तोंडून मधुर आणि हितकर वाणी प्रकट होते. त्याला सद्गुणी होण्यासाठी आटापिटा करावा लागत नाही. सद्गुणच त्याच्याकडे निवासासाठी येतात. ___ अनुप्रेक्षा अर्थात् चिंतनासाठी दिलेले बारा मुद्दे जैन परंपरेनं अधोरेखित केलेले असले तरी ते काही जैनांसाठी राखीव नाहीत. परमार्थाचं थोडंही भान असलेली व्यक्ती या मुद्यांकडे सहजच आकृष्ट होते. खरोखरच या बारा भावना नित्य पठण-चिंतनाला अतिशय सुयोग्य आहेत. क्षणभंगुरता, असहायता, एकटेपणा, वेगळेपणा, संसाराचं आणि त्रैलोक्याचं स्वरूप, मानवी शरीराचं अंतर्दर्शन, अशुभ कर्मांना रोक लावणं, ध्यान-स्वाध्यायानं पूर्वकर्मांवर मात करणं, दहा प्रकारचे सद्गुण अंगी बाळगणं आणि हे करताना दुर्लभ मनुष्यजन्माची सतत जाणीव ठेऊन क्षणभराचीही हेळसांड न करणं - असे या बारा भावनांचे एकंदरीत स्वरूप आहे. दिगंबर जैन संप्रदायात दशलक्षणपर्वाचं फार महत्त्व आहे. त्या निमित्तानं दशविध सद्गुणांचं चिंतन तर आपण केलंच, त्याशिवाय बाराही अनुप्रेक्षा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. जय जिनेन्द्र ! आणि मिच्छामि दुक्कडं !

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10