Book Title: Dashalakshnaparva
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 9
________________ दशलक्षणपर्व - चिंतन ९ डॉ. नलिनी जोशी बारा अनुप्रेक्षांमधे सतत चिंतनासाठी दिलेला अकरावा विषय आहे 'दशविध धर्म'. नाव जरी 'धर्म' असलं तरी वस्तुतः ती आहे सद्गुणांची जोपासना. सर्वसामान्य माणूस जमेल तशी सद्गुणांची जोपासना करीत असतो. पंसु सर्व सद्गुण जिथं सातत्यानं आणि उत्कृष्टपणं जोपासले जातात तिथं ते जणू मूर्तिमंत प्रकट होतात. अशांनाच साधू' म्हटलं झालं. यासाठी उत्तम गुणांची व्याख्या दिली जाते. क्रोधाची बाह्य कारणं साक्षात् उत्पन्न झाली तरी जो मनातही क्रोधभाव येऊ देत नाही, त्या साधूच्या ठिकाणी क्षमाधर्म प्रकट होतो. जी व्यक्ती आपले कुल, सौंदर्य, जाति, विद्वत्ता, ऐश्वर्य, शील - यांच्याविषयी बिलकुल गर्व ठेवीत नाही अशा व्यक्तीत मार्दवधर्म प्रकट होतो. कपट, कुटिलता, माया, ढोंग इत्यादींना जो बिलकुल थारा देत नाही ; 'ऋजु' म्हणजे सरळ, रोखठोक वागते त्याच्या ठिकाणी आर्जवधर्म प्रकट होतो. अर्थात् त्याचा रोखठोकपणा दुसऱ्यांना मुळीसुद्धा बोचरा नसतो. सत्यधर्मी माणूस खरे असेल ते बोलतो पण याची खबरदारी घेतो की ते दुसऱ्याला दुःखी, कष्टी, द्वेषी, मत्सरी करणार नाही. तेच सत्य की जे आपले व दुसऱ्याचंही भले करते. शौचधर्म म्हणजे स्नानसंध्येनं येणारी शुद्धी नव्हे. शुचिता, पवित्रता ज्यामुळं प्राप्त होते तो शौचधर्म. सर्व प्रकारच्या परिग्रहांची लालसा कमी होऊन ज्याला निरिच्छता येते, ज्याचा लोभ दूर होतो त्याच्या अंगी शौचधर्म प्रकट होतो. संयमधर्म हा तर साधुत्वाचा परमोत्कर्ष असतो. संयमानं व्रतपालनात शुद्धपणा उत्पन्न होतो. इतर प्राण्यांना पीडा न देणे हा प्राणिसंयम असतो. पाच इंद्रियांच्या पाच विषयांमध्ये प्रीतिभाव, आसक्ती न ठेवणं हा इंद्रियसंयम होय. तपोधर्माचं एक वेगळंच स्वरूप इथं चिंतनासाठी दिलं आहे. केवळ मोठमोठी अनशनं म्हणजे तप नव्हे. ते तर निव्वळ बाह्यतप आहे. ध्यान आणि स्वाध्याय यांच्याद्वारे जो आत्मचिंतन करतो त्याच्यामध्ये तपोधर्म प्रकट होतो. मनानं, वचनानं आणि कायेनं ज्याला वैराग्य प्राप्त झालं आहे, त्याचा सर्व पदार्थांवरचा मोह आपोआप, साहजिकपणं दूर झाला आहे, त्याच्यामध्ये त्यागधर्म प्रकट होतो. 'माझं' असं या जगतात काहीच नाही, 'मी' देखील या जगात कोणाचा नाही ही भावना चित्तात खोलवर रुजली की त्यास आकिंचन्यधर्म म्हणावं. स्त्रियांच्या संपर्कात असला तरी जो तिळमात्रही विचलित होत नाही त्याचा ब्रह्मचर्यधर्म आदर्श मानावा. मोक्षप्राप्तीसाठी संन्यासमार्ग आवश्यक मानला असला तरी सामान्य उपासकाने सद्गुणांची यथाशक्ती आराधना कशी करावी याचं मार्गदर्शन या अनुप्रेक्षेतून मिळतं. **********

Loading...

Page Navigation
1 ... 7 8 9 10