Book Title: Dashalakshnaparva Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 3
________________ दशलक्षणपर्व - चिंतन ३ डॉ. नलिनी जोशी बारा भावना अथवा चिंतनातला तिसरा मुद्दा आहे ‘एकत्व' अर्थात् ‘एकटेपणा'. यात असं अपेक्षित आहे की 'एकला चलो रे' हा विचार मनात सतत बिंबवावा. आपला आत्मा कर्म करताना एकटाच असतो. एकटाच दीर्घ संसारात फिरतो. एकटाच उत्पन्न होतो. एकटाच मरतो. जे काही चांगले किंवा वाईट कर्म केलेले असेल त्याचे फळही एकटाच भोगतो. मनुष्याच्या पाच इंद्रियांना सुखावणारे पाच विषय आजुबाजूला पसरलेले असतात. शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध यांच्याकडे आकृष्ट होऊन आपल्याला ती ती वैषयिक सुखे काही प्रमाणात प्राप्तही होतात. पण त्यांनी तृप्तीची भावना येत नाही. ती आणखी-आणखी हवी वाटू लागतात. चांगल्या मार्गानं मिळत नसतील तर कुठल्याही मार्गानं मिळवण्याचा मोह मनात घर करतो. परिणामी बिनदिक्कतपणे पापही करू लागतो. ह्या पापाचे दुःखरूप परिणाम तो कधी या जन्मी भोगतो तर कधी मृत्यूनंतर त्याची पापकर्मे पुढील जन्मीही भोगावी लागतात. हा सर्व भोग त्याला एकट्यालाच घ्यायचा आहे, सामुदायिकपणे नाही. चांगल्या मार्गाने मिळविलेल्या संपत्तीचे सत्पात्री दान केले तर तो पुण्य अर्जित करतो. दान देताना त्यावरील आसक्तीला तिलांजली द्यावी लागते. दानाच्या बदल्यात नाव-कीर्ती यांची जरासुद्धा अपेक्षा जो करीत नाही तो पुण्यसंचय करतो. हे पुण्यही त्याचे एकट्याचेच असते. त्यामुळे लाभणारे सुखही अर्थात् त्याचे एकट्याचेच असते. एकत्व भावनेचे चिंतन करताना स्वत:च्या मनाला बजावावे की सर्व बाह्य परिग्रह आणि परिवार तुझ्यापासून वेगळा आहे. त्यांची गोष्ट तर दूरच, पण तुझ्या बरोबर उत्पन्न झालेला, तुझ्याहून वेगळा न दिसणारा हा देह देखील तुझ्याबरोबर येत नाही. तुझेच आप्तेष्ट त्या देहाला लवकरात लवकर स्मशानाग्नी देण्याच्या तजविजीला लागतात. मग अशा पदार्थांच्या मोहपाशांनी बांधून तू स्वत:ला का कष्टी करून घेत आहेस ? कोळी नावाचा कीटक स्वत:च्या तोंडात उत्पन्न झालेल्या लाळेपासून तंतू बनवितो. त्या तंतूंचे स्वत:भोवती जाळे विणतो. इतर क्षुद्र कीटकांना अडकवता अडकवता स्वत:च त्यात अडकतो. अगदी गुरफटून जातो. त्याच प्रमाणे प्रत्येक प्राणिमात्र स्वत:च्याच कर्मबंधाच्या जाळ्यात अडकतो. व्रत, पूजा, दान, सद्गुणांची, सच्चारित्राची जोपासना इ. उपायांनी हे जाळे शिथिल करता येते. परंतु यातील महत्त्वाचा भाग असा की हे उपाय स्वतः, एकट्यमेच करावे लागतात. स्वत: एकट्याने प्रयत्न करताना पहिली अट अशी की स्वत:च्या आत्म्याच्या सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा, विश्वास हवा. माझ्या आत्म्याचा स्वभाव ममत्वरहित, शुद्ध आहे. पूर्ण ज्ञानमय आणि चैतन्यमय असा तो आहे. आत्म्याशी जे कर्मांचे, विकारांचे मिश्रण झालेले आहे, तो त्याचा वास्तव स्वभाव नव्हे. एकत्वाचे सतत चिंतन केले की पुत्र, मित्र, घर-परिवार यांची आसक्ती हळुहळू कमी होते. शिवाय शत्रूविषयीचा द्वेषही कमी होतो.Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10