Book Title: Dashalakshnaparva
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 2
________________ दशलक्षणपर्व — चिंतन २ डॉ. नलिनी जोशी अनुप्रेक्षा अर्थात् चिंतनातला दुसरा मुद्दा आहे 'सर्व प्राणीमात्रांची अशरणता अर्थात् असहायता’. आपण जन्मतो तेव्हाच आपल्या पूर्वकर्मांनुसार आपलं आयुष्यही बरोबर घेऊन आलेलं असतो. साधारणपणे आयुष्यकाल ठरलेला असला तरी अनेक बाह्य कारणांनी अकालमृत्यूही ओढवू शकतो. देहाला सोडून जाण्याची वेळ आली की त्यावेळी कोणीसुद्धा ती लांबवू शकत नाही. त्यावेळी प्रत्येक जीव अशरणतेचा अर्थात् असहायतेचा, विवशतेचा अनुभव घेतो. वेगवेगळ्या विद्या - यापैकी कोणीसुद्धा मणि, मंत्र, औषध, भस्म, विविध प्रकारची वाहनं, घेतलेलं ज्ञान, त्या मोक्याच्या वेळी कामास येत नाही. केवळ मनुष्ययोनीची नव्हे तर स्वर्गातल्या देवांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. स्वर्ग हा इंद्राचा किल्ला आहे. बलशाली देव त्याचे नोकर आहेत. पर्वतांचा चुराडा करू शकणारे 'वज्र' हे त्याचं भयंकर शस्त्र आहे. ऐरावतासारखा बलशाली गजेंद्र त्याच्या दिमतीला आहे. तरीही त्याची स्थानभ्रष्ट होण्याची वेळ आली की तो असहाय होतो. आपल्याच कर्मांच्या उदयाने उत्पन्न झालेल्या जन्म, म्हातारपण, मृत्यू, रोग, शोक यांचा त्रैलोक्यावर कायम हल्ला झालेला आहे, होत नाही. या हल्ल्यापासून बचाव करू शकणारा आहे तो आपला आत्मा. क्रमाक्रमानं अशुभांचा त्याग केला, शुभ कर्मांचा अंगीकार केला आणि तेथेच न थांबता संपूर्ण शुद्धतेचा ध्यास धरला, तर या असहायतेवर आपण मात करू शकतो. हे माझ्या जीवा, जेव्हा तुझ्याजवळ पुष्कळ धन-संपत्ती असते तेव्हा आजुबाजूचे सर्वजण नोकराप्रमाणे सावधान-चित्त होऊन तुझ्या आज्ञेची वाट पहातात. त्यांना जरूर असली की तुझी हांजी हांजी करतात. तू मृत्युशय्येवर पडलास की ज्यांचा पुढे फायदा होणार असेल तेच तुझ्या मृत्यूची वाट बघत तेथे घुटमळत रहातात. पण त्यापैकी कोणीच तुला मृत्युमुखातून सोडवू शकत नाहीत. तू हे लक्षात ठेव की जर एखादा पक्षी नावेच्या आधाराने समुद्रात गेला आणि तेथे त्याने नावेचा आधार सोडून दिला, तर दिशाज्ञानाच्या अभावी त्याचा समुद्रात पडून नाश हा ठरलेला आहे. तुझी स्थितीही या भवसागरात काही वेगळी नाही. या अशरण भावनेच्या चिंतनाने कोणता फायदा होतो ? या प्रश्नाचं उत्तर हेच की या संसारात माझा कोणीच खरा संरक्षक नाही याची जाणीव होते. सांसारिक सुख-दु:खे, क्लेश- आनंद यांच्याकडे पहाण्याची तटस्थ वृत्ती येते. त्यांच्याविषयीची आसक्ती सुटते. वीतरागी भगवंतांचा उपदेशच मला तारक आहे याची खात्री होते. आपणच आपले उद्धारक आहोत अशी स्वावलंबनाची भावना बळावू लागते. आपल्या आत्म्यातच स्व-उद्धाराचे विलक्षण सामर्थ्य आहे अशी जाणीव जागृत होते. सारांश काय तर अशरणतेच्या भावनेचे भावन सतत केले तर स्वावलंबनाचा रस्ता स्पष्ट दिसू लागतो. दुसऱ्या कोणाची शरणागती पत्करून त्याच्यावर विसंबून राहण्याची वृत्ती हळुहळू नाहीशी होते. स्वत:च्या आत्म्याचेच साक्षीभावाने दर्शन घडू लागते. ***********

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10