Book Title: Jain Tattvagyanchya Chaukatitun Utkrantivada
Author(s): Kaumudi Baldota
Publisher: Kaumudi Baldota
Catalog link: https://jainqq.org/explore/229738/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून उत्क्रांतिवाद (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, अधिवेशन २७, मालाड (मुंबई), ११ ते १३ नोव्हेंबर २०१०) विषय व मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी, जैन अध्यासन, पुणे विद्यापीठ शोधछात्रा : डॉ. कौमुदी बलदोटा, सन्मति-तीर्थ, पुणे ४ प्रस्तावना : जैनविद्येचे व्यासंगी अभ्यासक नेहमीच असा दावा करीत असतात की जैन धर्म आधुनिक विज्ञानाशी इतर धर्मांच्या तुलनेत अधिक मिळताजुळता आहे. यासाठी अनेक उदाहरणेही दिली जातात. 'षद्रव्यात्मको लोक:' या व्याख्येनुसार सहा physical realities' नी विश्व बनलेले असणे ; 'काल' या द्रव्याला अस्तिकाय न मानता परिवर्तनाला आधारभूत असे अनुमेय तत्त्व मानणे ; वैशेषिकांपेक्षा परमाणु व स्कंधांची अधिक सूक्ष्म चिकित्सा करणे ; शब्दाला आकाशाचा गुण न मानता पौद्गलिक मानणे ; 'दोन वायूंच्या संयोगातून पाणी निर्माण होते', अशी अवधारणा असणे ; सृष्टीतील गति-स्थितींची नियामक अशी धर्म-अधर्म नावाची द्रव्ये मानणे ; वनस्पतींमधील चेतनता आणि सजीवता अधोरेखित करणे ; पंचेंद्रिय पशुपक्षीसृष्टीला मन-भावना-ज्ञान-कषाय या संकल्पना उपयोजित करणे - या आणि अशा अनेक संकल्पनांमधून जैन तत्त्वज्ञानाने आधुनिक विज्ञानाशी जवळीक साधली आहे, हेही स्पष्ट होते. चार्लस् डार्विनने (१८०९-१८८२) मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतातून जीवसृष्टीच्या अभ्यासाला वेगळेच परिमाण लाभले. परिस्थितीशी समायोजन करून हळूहळू नवीन प्रजाती विकसित होणे आणि परिस्थितीशी समायोजन करू न शकणाऱ्या प्रजातींचा क्रमाक्रमाने लोप होणे', हा उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताचा मुख्य गाभा आहे. 'माअप्राणी हा प्राणीसृष्टीच्या विकासातील अखेरचा टप्पा आहे' - असेही ह्या सिद्धांतातून कळते. जैन सिद्धांतग्रंथांतून आणि सृष्टिवर्णनविषयक इतर प्राचीन ग्रंथांतून उत्क्रांतिवादासंबंधी काय मार्गदर्शन मिळते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात केला आहे. उत्क्रांतिवादाचा सिद्धांत चार्लस् डार्विननंतर हक्स्ले, स्पेन्सर, हेकेल, लॉइड मॉर्गन, बेर्गसों, अॅलेक्झंडर, व्हाइटहेड, तेयार् द शार्दै आणि इतरही अनेकांनी अधिकाधिक स्पष्ट केलेला दिसतो. परंतु प्रस्तुत शोधनिबंधात केवळ डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाची जैन दृष्टीने समीक्षा केलेली आहे. रूढ जैन धार्मिक दृष्टिकोणानुसार उत्क्रांतिवाद न मानण्याची कारणे : उत्क्रांतीची कल्पना कितीही जुनी असली तरी आधुनिक काळात तिची वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केल्याचे श्रेय चार्लस् डार्विन याला मिळाले आहे. The Origin of Species आणि The Descent of Man या ग्रंथांनी त्याला जागतिक मान्यता आणि अमरता मिळवून दिली. प्राण्यांच्या आणि पशुंच्या प्रदीर्घ विकासमालेत माकडाच्या एका विशिष्ट जातीपासून (Ape) मानवाची उत्पत्ती झाली असावी, असे मत डार्विनने The Descent of Man या ग्रंथात व्यक्त केले. मानवी आत्मगौरवाची भावना दुखावली गेल्याने ख्रिश्चन धर्मगुरुंनी उत्क्रांतिवादाला प्रखर विरोध केल. ___ जैन धर्मानेही मनुष्याची योनी ही तिर्यंच्यांपेक्षा वेगळी, स्वतंत्र व श्रेष्ठ मानली आहे. त्यामुळे अर्थातच अनादिकाळापासून अस्तित्वात असलेल्या चतुर्गतींच्या सिद्धांतावर दृढ विश्वास ठेवणारे जैनही उत्क्रांतिवाद पुढील कारणे देऊन खोडून काढण्याची शक्यता आहे. ___ जैन धर्माची अशी धारणा आहे की लोक किंवा जगत् किंवा विश्व अनादि अनंत आहे. ते कोणी निर्माण केले नाही आणि त्याचा कधी शेवट होणार नाही. विश्वात एकंदर जीव प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत - सिद्ध आणि संसारी.' सिद्ध म्हणजे मुक्त जीव अशरीरी स्वरूपात अनादि काळापासून सिद्धशिलेवर विराजमान आहेत. संसारी Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ जीव हे अनादि काळापासून कर्मपरवश होऊन चतुर्गत्यात्मक संसारात अखंड फिरत आहेत. सर्वज्ञांनी चार प्रकारच्य गती सांगितलेल्या आहेत - नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देव. या चारही गती अनादि काळापासून आहेत आणि अनंत काळापर्यंत राहणार आहेत. यातली कोणतीही गती नव्याने निर्माण झालेली नाही. कारण कोठेही तीन किंवा दोन गतींचे विधान नाही. सर्वज्ञांनी लोकातील सर्व जीवांच्या ८४ लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. त्या कोठेही कमीजास्त होताना दिसत नाहीत. त्याअर्थी सजीवांच्या सर्व जाती-प्रजाती (species and sub-species) यांची संख्या निश्चित आहे. विशिष्ट जीवांचे पूर्वभव व पूर्वजन्म सांगत असताना गतिविषयीचे नियम पाळले असले तरी तो जीव कधी पंचेंद्रिय मनुष्य असेल तर कधी एकेंद्रिय जीव म्हणून जन्मास येईल. जीवांच्या प्रवासात एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असा क्रा पाळला गेलेला दिसत नाही. सृष्टी काळाच्या ओघात कधी निर्माण झाली, ते जैन धर्माने सांगितलेले नाही. हास आणि उत्कर्ष यांनी युक्त असलेले म्हणजे “अवसर्पिणी आणि उत्सर्पिणींनी सतत फिरणारे कालचक्र आहे"-"अशीच संकल्पना व्यक्त केली आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा व पंचमहाभूतांच्या निर्मितीचा उपनिषदांमध्ये सांगितलेला विशिष्ट क्रमही जैन ग्रंथांत आढळत नाही. हिंदूंच्या अवतार संकल्पनेत दिसून येणारा जलचर, स्थलचर, उभयचर व मनुष्य असा विकासक्रमही जैन धर्माने अधोरेखित केलेला नाही. __ "एप् वानर त्यापासून क्रमाने विकसित झालेला मनुष्य” हे उत्क्रांतिवादाचे उदाहरण म्हणून दिले जाते. हे धार्मिक जैन दृष्टिकोणातून संभवत नाही. कारण वानर हा तिर्यंच गतीतील प्राणी आहे व मनुष्याची गती अर्थात् मनुष्यगती मुळातच वेगळी आहे. उत्तराध्ययन, प्रज्ञापना, गोम्मटसार या आणि अनेक ग्रंथांत इंद्रियक्रम सांगताना एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असा सांगितला असला तरी तो सोयीसाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सांगितला आहे. म्हणजेच निव्वळ अर्थवादात्मक आहे. जीव त्याच क्रमाने प्रगती करतो असे मार्गदर्शन या विवेचनातून मिळवणे योग्य नाही. भवधारणा करताना सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो कर्मसिद्धांत. प्रत्येक जीव हा तैजस् आणि कार्मण ही दोन शरीरे बरोबर घेऊन नामकर्माच्या उदयानुसार त्या त्या योनीत जन्म घेणार आहे म्हणजे कर्माचे प्राबल्य हे सर्वश्रेष्ठ आहे. ती योनी प्रगत आहे की अवनत आहे याचा संबंध येथे नाही. धार्मिक मान्यतेनुसार आदि तीर्थंकर ऋषभदेव करोडो वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांचे आयुष्य ८४ लक्ष पूर्व हेते. ऋषभदेवांनी मानवाला सुसंस्कृत बनविले म्हणजे तेव्हाही मनुष्ययोनी अस्तित्वात होती. ऋषभदेवांनी मनुष्यांना सुसंस्कृत बनविले, एप् जातीच्या वानरांना नव्हे. म्हणजेच 'मनुष्य' ही प्रगतीच्या टप्प्यातील एक अवस्था नसून पंचेंद्रिय, बुद्धिमान, विवेकशील, वचन-व्यवहार इ. कौशल्ये असलेली मनुष्ययोनी ही अनादि काळापासून अस्तित्वात आहे. उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतानुसार जीवसृष्टीचा समायोजनात्मक क्रमिक विकास चालू असतो. जैन मान्यतेनुसार आत्ताच्या अवसर्पिणी काळात विकास तर सोडाच पण क्रमाने अवनती किंवा हास चालू आहे.१० मानवाच्या शारीरिक व मानसिक सामर्थ्यांचाही हास चालू आहे. ___आध्यात्मिक विकासाचा विचार केला तर सर्वोच्च आध्यात्मिक विकास असलेल्या मोक्षगामी मानवांपैकी 'तीर्थंकर' हे अवसर्पिणीच्या आणि उत्सर्पिणीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आऱ्यात होतात म्हणजे आध्यात्मिक विकासाच्या बाबतीतही उत्क्रांतिवाद अर्थात् क्रमिक विकासाचा सिद्धांत लागू पडत नाही. एकंदरीत जैन धर्मातील धारणा जीवसृष्टीच्या समायोजनात्मक क्रमिक विकासाला पूरक असलेल्या दिसत नाहीत. Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ पूर्वपक्षाचा पुनर्विचार : 'निगोदी-जीव' संकल्पनेच्या प्रारंभबिंदूच्या आधारे : उपरोक्त वर्णनावरून अशी धारणा होऊ लागते की, जैन शास्त्राला उत्क्रांतिवाद अर्थात् क्रमिक विकासवाद हा मान्य नाही. 'जैन धर्म हा विज्ञानानुकूल आहे' असे मत जैनविद्येच्या सखोल अभ्यासकांनी नोंदविलेले दिसते. या न्यायाने उत्क्रांतिवादाला पोषक असे संकेत वस्तुत: जैन धर्मातून मिळायला हवेत. जैन शास्त्रग्रंथांत वर्णिलेली 'निगोद' संकल्पना उपरोक्त विचारांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडते. निगोदी जीवांचे वर्णन हे प्रामुख्याने प्रज्ञापना, जीवाभिगम१२ या अर्धमागधी ग्रंथांत आणि गोम्मटसार (जीवकांड)१३ या शौरसेनी ग्रंथात आढळते. जिज्ञासूंनी ते सर्व सविस्तर वर्णन मूळ ग्रंथांतून आणि जैनेंद्र सिद्धांत कोशातून समजावून घ्यावे. निगोदविषयक ग्रांथिक वर्णनाचे सार असे आहे - हे निगोदी जीव अत्यंत अप्रगत, एका शरीराच्या आधारे राहणारे, सर्व लोकात व्याप्त असलेले, अनंतानंत, ‘एकेंद्रिय साधारण वनस्पतिजीव' आहेत. जैन धारणेनुसार जेव्हा एखादा जीव मोक्ष प्राप्त करतो तेव्हा नित्य निगोदातून म्हणजे अव्यवहार राशीतून एक जीव व्यवहार राशीत म्हणजे संसारात प्रविष्ट होतो. मोक्षाला जाणारा जीव तर नक्की मानवी जीव आहे. संसारात प्रविष्ट होणारा जीव अप्रगत निगोदी जीव आहे. जैन शास्त्रातील हे तथ्य उत्क्रांतिविरोधक विचारांना वेगळी दिशा देणारे ठरते. निगोदविषयक तथ्यातून जैन शास्त्रातही क्रमिक जीवविकासाला स्थान दिसते. उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आधुनिक पारिभाषिक शब्दात मांडला असण्याची अपेक्षा प्राचीन जैन शास्त्राकडून करता येत नाही. तथापि जीवसृष्टीच्या क्रमिक विकासाचे संकेत जैन सिद्धांतग्रंथात कसे दिसून येतात याचा शोध घेऊ. प्रथम डार्विनच्या मांडणीनुसार, जैन ग्रंथांतील तथ्यांचा विचार करू. उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतात अंतर्भूत तथ्ये आणि जैन दृष्टीने समीक्षा : * डार्विनच्या मते जीवन-प्रक्रिया (Life process) ही सर्वव्यापी असते. सर्वांमध्ये एकच जीवनस्रोत वाहात असतो. ती अनेक रूपांतून व्यक्त होत असते. वनस्पती, प्राणी, पशू, मानव या सर्वांतून एकच जीवनप्रेरणा, एकच जीवनधारा, एकच चित्शक्ती वाहात असते आणि कार्य करीत असते ; आणि ती विभिन्न माध्यमांतून वाहाताना विविध आणि विभिन्न रूपे घेत असते. अमीबापासून वृक्ष वनस्पतीत, पशु-पक्ष्यात आणि मानवात सर्वांमध्ये एकच मूल जीवनधारा वाहात असते. जैन शास्त्रानुसार जीव हे अनंत आहेत. 'उपयोग' हे सर्व जीवांचे अनन्यसाधारण लक्षण आहे.१४ जीवांच्या अनेक जाति-प्रजातींची आपापली म्हणून वेगळी वैशिष्ट्ये असली तरी ज्ञानचेतनेच्या रूपाने त्यांच्यात साम्य असते. याचाच अर्थ असा की, उत्क्रांतिवादाच्या परिभाषेत एकच चित्-शक्ती सर्व सजीवांमधून वाहात असते. * विश्वात जीवनप्रक्रिया ही अखंड, परस्परावलंबी, परस्परपूरक, परस्परसाहाय्यक, परस्परपोषक आणि परस्परसंवर्धक अशी प्रदीर्घ क्रियामालिका आहे. आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, उमास्वातींनी तत्त्वार्थसूत्रात ‘परस्परोग्रहो जीवानाम्'१५ या सूत्रातून हेच अधोरेखित केले आहे की पारस्परिक उपकार करणे' हे जीवांचे कार्य होय. केवळ जीवापुरत्व नव्हे तर त्यांनी काल, पुद्गल, आकाश, धर्म व अधर्म या सर्व द्रव्यांची लक्षणे कार्यद्वारा सांगितली आहेत. * उत्क्रांतिवादानुसार, प्रत्येक जिवंत वस्तू, वनस्पती आणि प्राणी यांची जिवंत राहण्यासाठी म्हणजे मरण टाळण्यासठी सतत आणि आटोकाट धडपड चालू असते. कोणाही जिवंत प्राण्याला मरण नकोसे वाटते. जैन शास्त्रानुसार, प्रत्येक सजीवाला चार संज्ञा अर्थात् अंत:प्रेरणा (instincts) आहेत - आहार, भय, मैथुन Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ आणि परिग्रह.१७ यातील 'भयसंज्ञा' ही उत्क्रांतिवादातील जीवनकलह अर्थात् जीवनसंघर्षाची प्रतीक मानता येईल. दुःख टाळण्याची आणि अनुकूल ते स्वीकारण्याची सर्व जीवांची प्रवृत्ती आचारांगातील पुढील उद्गारांवरून स्पष्ट होते. “सव्वे पाणा पियाउया सुहसाया दुक्खपडिकूला, अप्पियवहा पियजीविणो जीविउकामा । सव्वेसिं जीवियं प्पिं १८ * उत्क्रांतिवादानुसार, प्राण्यांची आणि वनस्पतींची बाह्य रचना व अवयव वातावरणाच्या गरजेप्रमाणे अवस्थांत करीत करीत, स्थिर होतात. नंतर हे गुणधर्म आनुवंशिकतेच्या मार्गाने पुढील पीढीत संक्रमित होतात. त्यामुळे तो जीवनकलहात टिकाव धरू शकतो. जैन शास्त्रानुसार, जीव हा वेळोवेळी अनेक पर्याय अर्थात अवस्थांतरे धारण करीत असतो. ‘अनुकूल शरीर धारण करणे'- हा जीवाचा पर्याय मानता येईल. नामकर्मानुसार जीवाची योनी, शारीरिक वैशिष्ट्ये ठरत असतात. गोत्रकर्म म्हणजे स्पष्टत: genetic qualities होत." म्हणजे जीव हा त्याच्या कर्मानुसार विशिष्ट योनीत गेल्यानंतर त्या प्रजातीचे जे बाह्य शारीरिक आकार नक्की झालेले असतात त्यानुसारच त्याची शारीरिक वैशिष्ट्ये ठरतात. जीवजातींमध्ये प्रदीर्घ कालावधीत झालेले शारीरिक संरचनात्मक बदल हे फक्त बाह्य आकारात झालेली अवस्थांतरे म्हणजे पर्याय आहेत. त्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म मानले तरीही उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतास कोणतीही बाधा पोहोचत नाही. * उत्क्रांतिवादानुसार, ज्या जीवजाती बलिष्ठ आहेत त्या टिकून राहणार आहेत व ज्या दुर्बल आहेत त्या हळूहळू नामशेष होत जाणार आहेत. म्हणजेच 'survival of the fittest' हा निसर्गाचा नियम आहे. रूढ जैन मान्यतेनुसार जर जीवजातींची संख्या कोणत्याही काळात सुनिश्चित म्हणजे ८४ लाख मानली तर ते उत्क्रांतिवादाशी पूरक ठरत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की जीवयोनींची ८४ लक्ष ही संख्या काळाच्या ओघात टीकाकारांनी केलेली संकल्पनात्मक निर्मिती आहे. अर्धमागधी व शौरसेनी भाषेतील प्राचीनतम जैन ग्रंथांत ८४लक्ष योनींचा निर्देश नाही. याचाच अर्थ असा की, 'survival of the fittest' या सिद्धांताला जैन दृष्ट्या कोणतीच अडचण नाही. अर्थात् ८४ लक्ष योनींचे, एकेंद्रिय ते पंचेंद्रिय जीवजातींमध्ये सूक्ष्मतापूर्वक केलेले विभाजन, हा जैन शास्त्राचा एक लक्षणीय विशेषच मानावा लागेल. * डार्विनच्या मते उत्परिवर्तने जशी प्रगतीला (Progression) साहाय्यक व पोषक ठरतात, तशी काही सदोष उत्परिवर्तने उत्क्रांतीत परागती (Retrogression) करण्यालाही जबाबदार ठरू शकतात. जैन शास्त्रातही कालचक्राचे उत्सर्पिणी व अवसर्पिणी हे टप्पे उत्कर्ष व -हास या दोन्हीही गोष्टींचा निर्देश करतात. प्रगती व ऱ्हासाचे हे कालचक्र निसर्गाचाच एक भाग आहे, हे जैन शास्त्रकारांना जाणवलेले दिसते. * उत्क्रांतिवादाचा सिद्धांत पुढे नेताना लामार्क हा जीववैज्ञानिक म्हणतो की, 'उत्क्रांतीला प्राण्याची संकल्पशक्ती व प्रयत्न हेही जबाबदार असतात. ' प्रत्येक जीव तत्त्वतः अनंतचतुष्टयाने" युक्त असून आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जीवजाती पुरुषार्थ अर्थात् प्रयत्न करीत राहते असा जैन शास्त्राचाही एकंदर अभिप्राय आहे. - * रूढीवादी धार्मिक विचारांचा विरोधी हल्ला परतविताना डार्विन स्पष्ट करतो की, 'जगण्याची क्षमता ही केवळ शारीरिक रीत्या जिवंत राहण्याची क्षमता किंवा पात्रता समजावयास पाहिजे ; तिचा नैतिक पात्रतेशी गोंधळ करता कामा नये. शारीरिक पात्रता आणि नैतिक पात्रता या दोन गोष्टी एकरूप नाहीत. जीवशास्त्रीय अभिकल्प नैतिक Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ क्षेत्रात लागू करण्याच्या प्रयत्नातून या गोंधळाचा जन्म होतो.' परंतु डार्विन किंवा स्पेन्सर दोघेही उत्क्रांतीचे उपपत्ती नीतीस विरोधी आहे असे मानत नाहीत. जैनशास्त्राने दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर सिद्धांताची रचना केलेली दिसते. नैतिक अथवा आध्यात्मिक विकासासाठी कर्मांवर आधारित, पूर्वजन्म-पुनर्जन्म यांना उपोबलक असा आध्यात्मिक विकासाचा द्योतक गुणस्चम अथवा गुणश्रेणींचा सिद्धांत मांडलेला दिसतो. म्हणजे व्यावहारिक पातळीवर अत्यंत अप्रगत अशी निगोद जीवांची संकल्पना तसेच एकेंद्रिय, द्वींद्रिय अशी जैविक दृष्ट्या मांडणी इत्यादी सांगून उत्क्रांतिवादाचेही बीजरूपाने संकेत दिले आहेत. या दोन्ही सिद्धांतांची पातळी वेगवेगळी आहे. त्यात परस्परविरोध नाही. नैतिक वादाच्या चौकटीतून जीवशास्त्रीय उत्क्रांतीकडे बघण्याच्या अट्टाहासामुळे जैन विचार उत्क्रांतीला पूरक नाहीत असे वरकरणी वाटते. किंबहुना सृष्टीत होणाऱ्या जैविक विकासाचे संकेत जैन ग्रंथांत आढळून येणे ही जैन दर्शनाची उपलब्धी मानावी लागेल. * डार्विनच्या मतानुसार, मानवाची जाणीव आणि मन ही सुद्धा मूळ जडद्रव्याची विकसित रूपे आहेत. आत्मा व मन वेगळे आध्यात्मिक द्रव्य नसून ते उत्क्रांत होत गेलेल्या शरीराचेच आविष्कार आहेत. जैन शास्त्रानेही डार्विनच्या मतानुसार, 'मन' हे पौद्गलिक मानले आहे.२१ आत्म्याला जडद्रव्याचे विकसित रूप मानणे मात्र जैन तत्त्वज्ञानाच्या प्रकृतीत बसत नाही. जैन मतानुसार चेतन व अचेतन ही दोन्ही तत्त्वे स्वतंत्र असून अनादि काळापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. * विश्वातील आकार, व्यवस्था, योजना या नैसर्गिकपणे घडत असतात. यात श्रेष्ठ दैवी बुद्धीचा आणि शक्तीचा हस्तक्षेप नसतो, असे डार्विनचे मत आहे. डार्विनची भूमिका अनुभववादी, प्रत्यक्षार्थवादी आणि निरीश्वरवादी आहे. __ जैन दर्शनानेही निरीश्वरवादी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. अर्थात् जीवसृष्टीबाबत कर्मसिद्धांत आणि पुरुषार्थवाद या दोन्हींची सांगड घातली आहे. * डार्विनच्या मते, या विश्वात काहीही स्थिर, अचल आणि न बदलणारे नसते. 'बदलणे' निसर्गाचा स्वाभाविक धर्म आहे. परिवर्तनाची क्रिया समायोजनाच्या प्रक्रियेमार्फत अविरतपणे चालू आहे व चालू राहील. ____ जैन दर्शनाने 'सत्'ची व्याख्या करताना कूटस्थ व नित्य सत्३ संकल्पनेचा पाठपुरावा केला नाही. द्रव्यरूपाने सत् आणि पर्याय रूपाने बदलणारे असेच वस्तू, व्यक्ती व घटनांचे अस्तित्व मानले.२४ त्यामुळेच अध्यात्मवादाच्या आड न येताही सृष्टीच्या नित्य बदलत्या रूपाची उपपत्ती जैन तत्त्वज्ञानाच्या आधारे लावता येते. सद् वस्तू मुळातच अनंत धर्मात्मक आहे.२५ त्याशिवाय वस्तूकडे बघण्याचे दृष्टिकोण अर्थात् नयही अनेकविध असतात. ही तथ्ये सांगितल्यामुळे विकास, बदल, हास या सर्वांनाच जैन तत्त्वज्ञानानुसार एक सुदृढ पार्श्वभूमी प्राप्त होते. उत्क्रांतिवादाचे मंतव्य डोळ्यासमोर ठेवून ही समीक्षा केली. आता जैन ग्रंथांतून मिळणाऱ्या उत्क्रांतिसूचक संकेतांवर नजर टाकू. जैन ग्रंथांतून मिळणारे उत्क्रांतिसूचक संकेत : (१) निगोदी जीवांना आधुनिक परिभाषेत 'Microbes' म्हणता येईल. आधुनिक जीवशास्त्रातही स्वतंत्र सजीवाची मायक्रोब्ज ही अशी अवस्था आहे की ती, वनस्पतिसृष्टीच्या अंतर्गत येते की प्राणिसृष्टीच्या ?'-अशी संभ्रमावस्थ निर्माण करतो. लोकातील एक जीव मोक्षगामी झाल्यानंतर इतर निगोदातील एक जीव संसारात प्रविष्ट होतो, हे जैन शास्त्रातील विधान वेगळी दिशा देणारे ठरते. ज्या अर्थी आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत मनुष्य मोक्षगामी झाल्यानंतर, जीवसृष्टीत अप्रगत निगोदी जीव प्रवेश करतो, त्या अर्थी जैन शास्त्रातही क्रमिक जीवविकासाला निश्चित स्थान Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दिसते. (२) 'निगोद' सिद्धांताचा जर अधिक विकास झाला असता तर तो उत्क्रांतिवादाच्या रूपाने कदाचित् दिसून आला असता. आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यता जेव्हा वरचढ झाल्या तेव्हा अनंतकायिक निगोदी जीवांचे स्थान जैन धर्मात खानपानविषयक आचारनियमात आले आणि सैद्धांतिक विकास थांबला. (३) पृथ्वी, अप्, तेज, वायु, वनस्पती या पाचांना जैन शास्त्राने मूर्च्छित चेतनायुक्त स्थावर जीव मानले आहेत. ते एकेंद्रिय आहेत. द्वींद्रियांपासून चतुरिंद्रियांपर्यंतचे जीव क्रमाक्रमाने इंद्रियदृष्ट्या विकसित आहेत आणि त्रसआहेत. तिर्यंच पंचेंद्रिय आणि गर्भज मनुष्य यांना पाच इंद्रियांबरोबरच मनही आहे." जैन शास्त्राने डार्विनप्रमाणेच मनालाही पौद्गलिक मानले आहे. सर्व प्रकारच्या तिर्यंच्यांना आपापल्या कुवतीनुसार ज्ञान, भावभावना इत्यादि असल्या तरी मानवामध्ये विचार व विवेकाला प्राधान्य असल्यामुळे तो सर्वाधिक विकसित मानला आहे. विकासक्रमाचे इतके टप्पे सुव्यवस्थितपणे दिसत असताना त्यातून विकासक्रमाचे सूचन होत नाही असे म्हणणे केवळ हास्यास्पद ठरते. (४) मनुष्यगतीचे दुर्लभत्व लक्षात घेऊन जैन धर्माने मानवकेंद्री दृष्टिकोणातून मनुष्य नावाची वेगळी चौथी गतीच कल्पिली आहे. वस्तुत: मानव हा तिर्यंचसृष्टीतीलच प्रगत प्राणी आहे. म्हणजे, प्रदीर्घ काळाच्या ओघात वानराचा मानव बनण्याच्या प्रक्रियेत, 'गती बदलणे' हा काही अडथळा असू शकत नाही. कारण मानवाला सर्वात प्रगत तिर्यंच म्हणण्यात जैन शास्त्राला काहीच आक्षेच असणार नाही. तसेही मनुष्याला 'मनुष्यप्राणी' म्हणण्याचा प्रघ आहेच. मानवी दुर्लभत्वाचा असाही अर्थ लावता येईल की, निसर्गाच्या विकासक्रमात मानव सर्वात शेवटच्या टप्प्यावर निर्माण झाला आहे. (५) 'उपनिषदांमध्ये पृथ्वी, अप्, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये जसा एक विशिष्ट क्रम अनुस्यूत आहे तसा जैन दर्शनातल्या पाच एकेंद्रिय जीवांमध्ये आहे का ?' - याचा विचार करू लागलो असता असे दिसते की, उत्तराध्ययन, पंचास्तिकाय या प्राचीन आगमग्रंथांत पृथ्वी, अप् आणि वनस्पती या तिघांनाच स्थावर म्हटले आहे. वनस्पतिशास्त्रीय मान्यतेनुसार वनस्पतीच्या वाढीला क्षार आणि पाणी हे दोन घटक लागतात. पाणी हे दोन वायूंच्या संयोगाने बनले आहे. याचा निर्देश सूत्रकृतांगात आढळतो. याचाच अर्थ असा की, वनस्पतिसृष्टी ही पृथ्वी व पाणी यांच्या आधारे विकसित होऊ शकते. हेच तथ्य या तिघांना 'स्थावर' मानण्यामागे अपेक्षित असावे. शिवाय जैन मान्यतेनुसार निगोदी जीव हे वनस्पतिकायिक आहेत. या सर्वांचा भावार्थ असा की, दृश्य जीवसृष्टीचा आरंभ वनस्पतींपासून झाला व वनस्पतींच्या आधारे हालचाल करणारी जीवसृष्टी हळूहळू विकसित झाली. जैन शास्त्रातील व उत्क्रांतिवादातील अवधारणा एका समान मुद्यापाशी येऊन ठेपतात. (६) आयुष्यकर्माच्या अंतर्गत जैन दर्शनाने प्रत्येक जीवाच्या कायस्थितिचा व भवस्थितिचा विचार केला आहे. कायस्थिति म्हणजे कोणत्याही दुसऱ्या जातीत (species) जन्म न ग्रहण करता त्याच त्याच जातीमध्ये (species) वारंवार उत्पन्न होणे. तत्त्वार्थसूत्राच्या तिसऱ्या अध्यायात एकेंद्रिय ते पंचेंद्रिय जीवांची उत्कृष्ट व जघन्य कायस्थिति दिलेली आहे. त्यातील उत्कृष्ट कार्यस्थिति लक्षावधी आणि करोडो वर्षे आधी नोंदविलेली आहे? एकाच कायस्थितीत अति प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे परिस्थितीशी समायोजन करून, त्या त्या जाती-प्रजातींनी आपला विकास करून घेण्याची शक्यताच जणू जैन दर्शनाने व्यक्त केलेली दिसते. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ उपसंहार आणि निष्कर्ष : उपसंहारात आरंभीच नमूद करणे गरजेचे आहे की, उत्क्रांतिवाद (आणि अर्थातच परागतिवाद) हा आधुनिक विज्ञानयुगात मांडला गेलेला सिद्धांत आहे. तो त्याच प्रकारच्या परिभाषेत जैन प्राचीन तत्त्वग्रंथात आढळत नाही. किंबहुना तशी अपेक्षाच ठेवता येत नाही. आपण केवळ हे जाणू शकतो की जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून उत्क्रीवादाला प्रतिकूल असे संकेत मिळतात की अनुकूल ? शोधनिबंधाच्या आरंभी रूढ धार्मिक व आध्यात्मिक चौकटीतून दिसून येणारे प्रतिकूल संकेत पाहिले. त्यातंर डार्विनची परिभाषा आणि जैन विचारधारा - यांच्यातील साम्यस्थळे पाहिली. जैन ग्रंथातील परिभाषा उलगडून दाखविण्याचा प्रयत्न तिसऱ्या मुद्यात केला. अंतिमत: असे म्हणता येईल की, जैन तत्त्वज्ञान उत्क्रांतिवादाला उपोबलक अशाच तथ्यांचे दिग्दर्शन करते. * 'जग अनादि अनंत आहे'-याचे स्पष्टीकरण उत्तराध्ययनसूत्रातच असे केले आहे की 'जग हे प्रवाहाच्या दृष्टीने अनादि अनंत तर जीवाच्या वर्तमान पर्यायाच्या अपेक्षेने सादि सान्त आहे.' * 'द्रव्य' संकल्पनेच्या व्याख्येतच 'ध्रौव्य' आणि 'पर्याय' (बदल) हे दोन्ही अंतर्भूत आहेत. म्हणजेच 'जीवत्व' आणि ‘परमाणुत्व' अबाधित राखूनही अवस्थांतरे, बदल यांना पूर्ण वाव आहे. सर्व प्रकारच्या जीवजातींचे बाह्याकार (forms) परिस्थितीनुसार बदलू शकतात. कमी-अधिक विकसित होऊ शकतात, प्रसंगी नष्टही होऊ शकतात. 'द्रव्य-गुण-पर्याय' हा सिद्धांत आणि 'द्रव्य-क्षेत्र-काल-भाव' हे निक्षेप उत्क्रांतिवादाला अनुकूल ठरतात. * सूक्ष्म निगोदी जीवांची संकल्पना ‘उत्क्रांतिवादा'चा सर्वाधिक सुस्पष्ट संकेत आहे. * अनेक जाति-प्रजातींच्या प्रदीर्घ 'भवस्थिति' आणि 'कायस्थिति' ह्या, मंदगतीने होत जाणाऱ्या बदलाला अतिशय अनुकूल आहेत. * जीवांची कर्मे, त्यानुसार जीवाचा होणारा चतुर्गत्यात्मक प्रवास, पूर्वजन्म-पुनर्जन्मावर आधारित धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना ही जैन विचारांची एक दिशा आहे. पौद्गलिक अथवा भौतिक शरीरकृतींमध्ये वातावरणाला अनुकूल बदल घडवीत अनेक जाती-प्रजाती विकसित होणे अथवा नष्ट होणे - ही जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीत राहूनच आढळून येणारी अशी विचारांची दुसरी परंतु समांतर दिशा आहे. पहिली दिशा दुसरीला छेद देणारी नाही. आध्यात्मिकता कायम राखून सुद्धा जीवसृष्टीच्या क्रमिक उत्क्रांतीला अथवा परागतीला जैन दर्शनात बाधा येत नाही, असे मंतव्य या शोधनिबंधात व्यक्त करावयाचे आहे. ********** संदर्भ १) संसारिणो मुक्ताश्च । तत्त्वार्थसूत्र २.१० २) अ) अलोए पडिहया सिद्धा लोयग्गे य पइट्ठिया । इह बोन्दिं चइत्ताणं तत्थ गन्तूण सिज्झई ।। उत्तराध्ययन ३६.५६ ब) एगत्तेण साईया अपज्जवसिया वि य । पुहत्तेण अणाईया अपज्जवसिया वि य ।। उत्तराध्ययन ३६.६५ Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ ३) पंचिन्दिया उ जे जीवा चउव्विहा ते वियाहिया । नेरइया तिरिक्खा य मणुया देवा य अहिया ।। उत्तराध्ययन ३६.१५५ ४) णिच्चिदर धादुसत्तय तरुदस वियलिंदियेसु छच्चेव । सुर णिरय तिरिय चउरो चोद्दस मणुये सदसहस्सा । बारसाणुपेक्खा गाथा ३५ ५) असंखेज्जाहिं उस्सप्पिणि - अवसप्पिणीहिं अवहीरंति कालओ । अनुयोगद्वार गाथा ४२३ ६) उत्तराध्ययन, अध्ययन १०-गाथा ५-१३, अध्ययन ३६-गाथा ६९-१५५ ७) प्रज्ञापना, पद १-१५ ८) औदारिक वैक्रियाऽऽहारकतैजसकार्मणानि शरीराणि । तत्त्वार्थसूत्र २.३७ तदादीनि भाज्यानि युगपदेकस्याचतुर्दाः ।। तत्त्वार्थसूत्र २.४४ ९) तिलोयपण्णत्ति ४.५७९-५८२ १०) तिलोयपण्णत्ति ४.१५३५-१५४४ ११) प्रज्ञापना पद १,३,१८ १२) जीवाभिगम ५.५६ १३) गोम्मटसार (जीवकांड) १४) उपयोगो लक्षणम् । तत्त्वार्थसूत्र २.८ १५) तत्त्वार्थसूत्र ५.२१ १६) तत्त्वार्थसूत्र ५.१७-२२ १७) सण्णा चउव्विहा आहार-भय-मेहुणपरिगहसण्णा चेदि । खीणसण्णा वि अत्थि धवला २.१; १.४१३.२ १८) आचारांग १.२.३.६३-६४ १९) तत्त्वार्थसूत्र ८.१२, ८.१३ २०) अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत चारित्र, अनंत वीर्य - क्षपणसार गाथा ६१० २१) शरीरवाङ्मन:प्राणापाना: पुद्गलानाम् । तत्त्वार्थसूत्र ५.१९ २२) उत्पादव्ययध्रौव्ययुक्तं सत् । तत्त्वार्थसूत्र ५.२९ २३) तद्भावाव्ययं नित्यम् । तत्त्वार्थसूत्र ५.३० २४) गुणपर्यायवद् द्रव्यम् । तत्त्वार्थसूत्र ५.३७ २५) अर्पितानर्पितसिद्धेः । तत्त्वार्थसूत्र ५.३१ २६) दशवैकालिक ३.७ २७) अप्पेगे संपमारए , अप्पेगे उद्दवए । आचारांग १.१.५.११२ २८)समनस्काऽमनस्का : । --- संज्ञिनः समनस्काः । तत्त्वार्थसूत्र २.११-२५ २९) अ) पुढवी आउजीवा य तहेव य वणस्सई। इच्चेए थावरा तिविहा तेसिं भेए सुणेह मे ।। उत्तराध्ययन ३६.६९ ब) पृथिव्यम्बुवनस्पतय: स्थावराः । तत्त्वार्थसूत्र २.१३ ३०) सूत्रकृतांग २.३.२२ ३१) नृस्थिती परापरे त्रिपल्योपमान्तर्मुहर्ते । तिर्यग्योनीनां च । तत्त्वार्थसूत्र ३.१७-१८ * वैज्ञानिक संदर्भ * * या शोधनिबंधासाठी आवश्यक ती वैज्ञानिक माहिती Wikipedia ह्या Website वरून घेतली आहे. * महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाच्या डॉ.ग.ना.जोशी कृत 'पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास (खंड तिसरा) या ग्रंथातूनही संदर्भ घेतले आहेत. संदर्भ-ग्रंथ-सूची १) अणुयोगद्वार (अणुओगद्दार) : आर्य रक्षित, सं.मुनि पुण्यविजय, महावीर जैन विद्यालय, मुंबई, १९६८ २) आचारांग (भाष्य व नियुक्तिसहित) : जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), १९७४ ३) उत्तराध्ययन (उत्तरज्झयण) : मुनि पुण्यविजय, श्री महावीर जैन विद्यालय, १९७७ ४) गोम्मटसार : नेमिचन्द्रसिद्धांतचक्रवर्ती, द सेंट्रल जैन पब्लिशिंग हाऊस, लखनौ, १९२७ Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ 5) जीवाजीवाभिगम : उवंगसुत्ताणि 4 (खंड 1), जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), 1987 6) तत्त्वार्थसूत्र : उमास्वाति, पं.सुखलालजी संघवी, पार्श्वनाथ विद्यापीठ, वाराणसी, 2001 7) त्रिलोकप्रज्ञप्ति (तिलोयपण्णत्ति) : यतिवृषभ, सं.प्रो.ए.एन्.उपाध्ये, हीरालाल जैन, जीवराज जैन ग्रंथमाला 1, सोलापुर, 1943 8) दशवैकालिक (दसवेयालिय) : नवसुत्ताणि 5, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), 1987 9) प्रज्ञापना (पण्णवणा) : उवंगसुत्ताणि 4 (खंड 2), जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), 1986 10) सूत्रकृतांग (सूयगड) : अंगसुत्ताणि 1, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), वि.सं. 2031