________________
उपसंहार आणि निष्कर्ष :
उपसंहारात आरंभीच नमूद करणे गरजेचे आहे की, उत्क्रांतिवाद (आणि अर्थातच परागतिवाद) हा आधुनिक विज्ञानयुगात मांडला गेलेला सिद्धांत आहे. तो त्याच प्रकारच्या परिभाषेत जैन प्राचीन तत्त्वग्रंथात आढळत नाही. किंबहुना तशी अपेक्षाच ठेवता येत नाही. आपण केवळ हे जाणू शकतो की जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून उत्क्रीवादाला प्रतिकूल असे संकेत मिळतात की अनुकूल ?
शोधनिबंधाच्या आरंभी रूढ धार्मिक व आध्यात्मिक चौकटीतून दिसून येणारे प्रतिकूल संकेत पाहिले. त्यातंर डार्विनची परिभाषा आणि जैन विचारधारा - यांच्यातील साम्यस्थळे पाहिली. जैन ग्रंथातील परिभाषा उलगडून दाखविण्याचा प्रयत्न तिसऱ्या मुद्यात केला.
अंतिमत: असे म्हणता येईल की, जैन तत्त्वज्ञान उत्क्रांतिवादाला उपोबलक अशाच तथ्यांचे दिग्दर्शन करते.
* 'जग अनादि अनंत आहे'-याचे स्पष्टीकरण उत्तराध्ययनसूत्रातच असे केले आहे की 'जग हे प्रवाहाच्या दृष्टीने अनादि अनंत तर जीवाच्या वर्तमान पर्यायाच्या अपेक्षेने सादि सान्त आहे.'
* 'द्रव्य' संकल्पनेच्या व्याख्येतच 'ध्रौव्य' आणि 'पर्याय' (बदल) हे दोन्ही अंतर्भूत आहेत. म्हणजेच 'जीवत्व' आणि ‘परमाणुत्व' अबाधित राखूनही अवस्थांतरे, बदल यांना पूर्ण वाव आहे. सर्व प्रकारच्या जीवजातींचे बाह्याकार (forms) परिस्थितीनुसार बदलू शकतात. कमी-अधिक विकसित होऊ शकतात, प्रसंगी नष्टही होऊ शकतात. 'द्रव्य-गुण-पर्याय' हा सिद्धांत आणि 'द्रव्य-क्षेत्र-काल-भाव' हे निक्षेप उत्क्रांतिवादाला अनुकूल ठरतात.
* सूक्ष्म निगोदी जीवांची संकल्पना ‘उत्क्रांतिवादा'चा सर्वाधिक सुस्पष्ट संकेत आहे.
* अनेक जाति-प्रजातींच्या प्रदीर्घ 'भवस्थिति' आणि 'कायस्थिति' ह्या, मंदगतीने होत जाणाऱ्या बदलाला अतिशय अनुकूल आहेत.
* जीवांची कर्मे, त्यानुसार जीवाचा होणारा चतुर्गत्यात्मक प्रवास, पूर्वजन्म-पुनर्जन्मावर आधारित धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना ही जैन विचारांची एक दिशा आहे. पौद्गलिक अथवा भौतिक शरीरकृतींमध्ये वातावरणाला अनुकूल बदल घडवीत अनेक जाती-प्रजाती विकसित होणे अथवा नष्ट होणे - ही जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीत राहूनच आढळून येणारी अशी विचारांची दुसरी परंतु समांतर दिशा आहे. पहिली दिशा दुसरीला छेद देणारी नाही. आध्यात्मिकता कायम राखून सुद्धा जीवसृष्टीच्या क्रमिक उत्क्रांतीला अथवा परागतीला जैन दर्शनात बाधा येत नाही, असे मंतव्य या शोधनिबंधात व्यक्त करावयाचे आहे.
**********
संदर्भ
१) संसारिणो मुक्ताश्च । तत्त्वार्थसूत्र २.१० २) अ) अलोए पडिहया सिद्धा
लोयग्गे य पइट्ठिया । इह बोन्दिं चइत्ताणं तत्थ गन्तूण सिज्झई ।। उत्तराध्ययन ३६.५६ ब) एगत्तेण साईया
अपज्जवसिया वि य । पुहत्तेण अणाईया अपज्जवसिया वि य ।। उत्तराध्ययन ३६.६५