Book Title: Jain Tattvagyanchya Chaukatitun Utkrantivada
Author(s): Kaumudi Baldota
Publisher: Kaumudi Baldota

View full book text
Previous | Next

Page 1
________________ जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून उत्क्रांतिवाद (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, अधिवेशन २७, मालाड (मुंबई), ११ ते १३ नोव्हेंबर २०१०) विषय व मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी, जैन अध्यासन, पुणे विद्यापीठ शोधछात्रा : डॉ. कौमुदी बलदोटा, सन्मति-तीर्थ, पुणे ४ प्रस्तावना : जैनविद्येचे व्यासंगी अभ्यासक नेहमीच असा दावा करीत असतात की जैन धर्म आधुनिक विज्ञानाशी इतर धर्मांच्या तुलनेत अधिक मिळताजुळता आहे. यासाठी अनेक उदाहरणेही दिली जातात. 'षद्रव्यात्मको लोक:' या व्याख्येनुसार सहा physical realities' नी विश्व बनलेले असणे ; 'काल' या द्रव्याला अस्तिकाय न मानता परिवर्तनाला आधारभूत असे अनुमेय तत्त्व मानणे ; वैशेषिकांपेक्षा परमाणु व स्कंधांची अधिक सूक्ष्म चिकित्सा करणे ; शब्दाला आकाशाचा गुण न मानता पौद्गलिक मानणे ; 'दोन वायूंच्या संयोगातून पाणी निर्माण होते', अशी अवधारणा असणे ; सृष्टीतील गति-स्थितींची नियामक अशी धर्म-अधर्म नावाची द्रव्ये मानणे ; वनस्पतींमधील चेतनता आणि सजीवता अधोरेखित करणे ; पंचेंद्रिय पशुपक्षीसृष्टीला मन-भावना-ज्ञान-कषाय या संकल्पना उपयोजित करणे - या आणि अशा अनेक संकल्पनांमधून जैन तत्त्वज्ञानाने आधुनिक विज्ञानाशी जवळीक साधली आहे, हेही स्पष्ट होते. चार्लस् डार्विनने (१८०९-१८८२) मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतातून जीवसृष्टीच्या अभ्यासाला वेगळेच परिमाण लाभले. परिस्थितीशी समायोजन करून हळूहळू नवीन प्रजाती विकसित होणे आणि परिस्थितीशी समायोजन करू न शकणाऱ्या प्रजातींचा क्रमाक्रमाने लोप होणे', हा उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताचा मुख्य गाभा आहे. 'माअप्राणी हा प्राणीसृष्टीच्या विकासातील अखेरचा टप्पा आहे' - असेही ह्या सिद्धांतातून कळते. जैन सिद्धांतग्रंथांतून आणि सृष्टिवर्णनविषयक इतर प्राचीन ग्रंथांतून उत्क्रांतिवादासंबंधी काय मार्गदर्शन मिळते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात केला आहे. उत्क्रांतिवादाचा सिद्धांत चार्लस् डार्विननंतर हक्स्ले, स्पेन्सर, हेकेल, लॉइड मॉर्गन, बेर्गसों, अॅलेक्झंडर, व्हाइटहेड, तेयार् द शार्दै आणि इतरही अनेकांनी अधिकाधिक स्पष्ट केलेला दिसतो. परंतु प्रस्तुत शोधनिबंधात केवळ डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाची जैन दृष्टीने समीक्षा केलेली आहे. रूढ जैन धार्मिक दृष्टिकोणानुसार उत्क्रांतिवाद न मानण्याची कारणे : उत्क्रांतीची कल्पना कितीही जुनी असली तरी आधुनिक काळात तिची वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केल्याचे श्रेय चार्लस् डार्विन याला मिळाले आहे. The Origin of Species आणि The Descent of Man या ग्रंथांनी त्याला जागतिक मान्यता आणि अमरता मिळवून दिली. प्राण्यांच्या आणि पशुंच्या प्रदीर्घ विकासमालेत माकडाच्या एका विशिष्ट जातीपासून (Ape) मानवाची उत्पत्ती झाली असावी, असे मत डार्विनने The Descent of Man या ग्रंथात व्यक्त केले. मानवी आत्मगौरवाची भावना दुखावली गेल्याने ख्रिश्चन धर्मगुरुंनी उत्क्रांतिवादाला प्रखर विरोध केल. ___ जैन धर्मानेही मनुष्याची योनी ही तिर्यंच्यांपेक्षा वेगळी, स्वतंत्र व श्रेष्ठ मानली आहे. त्यामुळे अर्थातच अनादिकाळापासून अस्तित्वात असलेल्या चतुर्गतींच्या सिद्धांतावर दृढ विश्वास ठेवणारे जैनही उत्क्रांतिवाद पुढील कारणे देऊन खोडून काढण्याची शक्यता आहे. ___ जैन धर्माची अशी धारणा आहे की लोक किंवा जगत् किंवा विश्व अनादि अनंत आहे. ते कोणी निर्माण केले नाही आणि त्याचा कधी शेवट होणार नाही. विश्वात एकंदर जीव प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत - सिद्ध आणि संसारी.' सिद्ध म्हणजे मुक्त जीव अशरीरी स्वरूपात अनादि काळापासून सिद्धशिलेवर विराजमान आहेत. संसारी

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9