Book Title: Jain Tattvagyanchya Chaukatitun Utkrantivada
Author(s): Kaumudi Baldota
Publisher: Kaumudi Baldota

View full book text
Previous | Next

Page 2
________________ जीव हे अनादि काळापासून कर्मपरवश होऊन चतुर्गत्यात्मक संसारात अखंड फिरत आहेत. सर्वज्ञांनी चार प्रकारच्य गती सांगितलेल्या आहेत - नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देव. या चारही गती अनादि काळापासून आहेत आणि अनंत काळापर्यंत राहणार आहेत. यातली कोणतीही गती नव्याने निर्माण झालेली नाही. कारण कोठेही तीन किंवा दोन गतींचे विधान नाही. सर्वज्ञांनी लोकातील सर्व जीवांच्या ८४ लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. त्या कोठेही कमीजास्त होताना दिसत नाहीत. त्याअर्थी सजीवांच्या सर्व जाती-प्रजाती (species and sub-species) यांची संख्या निश्चित आहे. विशिष्ट जीवांचे पूर्वभव व पूर्वजन्म सांगत असताना गतिविषयीचे नियम पाळले असले तरी तो जीव कधी पंचेंद्रिय मनुष्य असेल तर कधी एकेंद्रिय जीव म्हणून जन्मास येईल. जीवांच्या प्रवासात एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असा क्रा पाळला गेलेला दिसत नाही. सृष्टी काळाच्या ओघात कधी निर्माण झाली, ते जैन धर्माने सांगितलेले नाही. हास आणि उत्कर्ष यांनी युक्त असलेले म्हणजे “अवसर्पिणी आणि उत्सर्पिणींनी सतत फिरणारे कालचक्र आहे"-"अशीच संकल्पना व्यक्त केली आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा व पंचमहाभूतांच्या निर्मितीचा उपनिषदांमध्ये सांगितलेला विशिष्ट क्रमही जैन ग्रंथांत आढळत नाही. हिंदूंच्या अवतार संकल्पनेत दिसून येणारा जलचर, स्थलचर, उभयचर व मनुष्य असा विकासक्रमही जैन धर्माने अधोरेखित केलेला नाही. __ "एप् वानर त्यापासून क्रमाने विकसित झालेला मनुष्य” हे उत्क्रांतिवादाचे उदाहरण म्हणून दिले जाते. हे धार्मिक जैन दृष्टिकोणातून संभवत नाही. कारण वानर हा तिर्यंच गतीतील प्राणी आहे व मनुष्याची गती अर्थात् मनुष्यगती मुळातच वेगळी आहे. उत्तराध्ययन, प्रज्ञापना, गोम्मटसार या आणि अनेक ग्रंथांत इंद्रियक्रम सांगताना एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असा सांगितला असला तरी तो सोयीसाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सांगितला आहे. म्हणजेच निव्वळ अर्थवादात्मक आहे. जीव त्याच क्रमाने प्रगती करतो असे मार्गदर्शन या विवेचनातून मिळवणे योग्य नाही. भवधारणा करताना सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो कर्मसिद्धांत. प्रत्येक जीव हा तैजस् आणि कार्मण ही दोन शरीरे बरोबर घेऊन नामकर्माच्या उदयानुसार त्या त्या योनीत जन्म घेणार आहे म्हणजे कर्माचे प्राबल्य हे सर्वश्रेष्ठ आहे. ती योनी प्रगत आहे की अवनत आहे याचा संबंध येथे नाही. धार्मिक मान्यतेनुसार आदि तीर्थंकर ऋषभदेव करोडो वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांचे आयुष्य ८४ लक्ष पूर्व हेते. ऋषभदेवांनी मानवाला सुसंस्कृत बनविले म्हणजे तेव्हाही मनुष्ययोनी अस्तित्वात होती. ऋषभदेवांनी मनुष्यांना सुसंस्कृत बनविले, एप् जातीच्या वानरांना नव्हे. म्हणजेच 'मनुष्य' ही प्रगतीच्या टप्प्यातील एक अवस्था नसून पंचेंद्रिय, बुद्धिमान, विवेकशील, वचन-व्यवहार इ. कौशल्ये असलेली मनुष्ययोनी ही अनादि काळापासून अस्तित्वात आहे. उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतानुसार जीवसृष्टीचा समायोजनात्मक क्रमिक विकास चालू असतो. जैन मान्यतेनुसार आत्ताच्या अवसर्पिणी काळात विकास तर सोडाच पण क्रमाने अवनती किंवा हास चालू आहे.१० मानवाच्या शारीरिक व मानसिक सामर्थ्यांचाही हास चालू आहे. ___आध्यात्मिक विकासाचा विचार केला तर सर्वोच्च आध्यात्मिक विकास असलेल्या मोक्षगामी मानवांपैकी 'तीर्थंकर' हे अवसर्पिणीच्या आणि उत्सर्पिणीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आऱ्यात होतात म्हणजे आध्यात्मिक विकासाच्या बाबतीतही उत्क्रांतिवाद अर्थात् क्रमिक विकासाचा सिद्धांत लागू पडत नाही. एकंदरीत जैन धर्मातील धारणा जीवसृष्टीच्या समायोजनात्मक क्रमिक विकासाला पूरक असलेल्या दिसत नाहीत.

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9