________________
दिसते.
(२) 'निगोद' सिद्धांताचा जर अधिक विकास झाला असता तर तो उत्क्रांतिवादाच्या रूपाने कदाचित् दिसून आला असता. आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यता जेव्हा वरचढ झाल्या तेव्हा अनंतकायिक निगोदी जीवांचे स्थान जैन धर्मात खानपानविषयक आचारनियमात आले आणि सैद्धांतिक विकास थांबला.
(३) पृथ्वी, अप्, तेज, वायु, वनस्पती या पाचांना जैन शास्त्राने मूर्च्छित चेतनायुक्त स्थावर जीव मानले आहेत. ते एकेंद्रिय आहेत. द्वींद्रियांपासून चतुरिंद्रियांपर्यंतचे जीव क्रमाक्रमाने इंद्रियदृष्ट्या विकसित आहेत आणि त्रसआहेत. तिर्यंच पंचेंद्रिय आणि गर्भज मनुष्य यांना पाच इंद्रियांबरोबरच मनही आहे." जैन शास्त्राने डार्विनप्रमाणेच मनालाही पौद्गलिक मानले आहे. सर्व प्रकारच्या तिर्यंच्यांना आपापल्या कुवतीनुसार ज्ञान, भावभावना इत्यादि असल्या तरी मानवामध्ये विचार व विवेकाला प्राधान्य असल्यामुळे तो सर्वाधिक विकसित मानला आहे. विकासक्रमाचे इतके टप्पे सुव्यवस्थितपणे दिसत असताना त्यातून विकासक्रमाचे सूचन होत नाही असे म्हणणे केवळ हास्यास्पद ठरते.
(४) मनुष्यगतीचे दुर्लभत्व लक्षात घेऊन जैन धर्माने मानवकेंद्री दृष्टिकोणातून मनुष्य नावाची वेगळी चौथी गतीच कल्पिली आहे. वस्तुत: मानव हा तिर्यंचसृष्टीतीलच प्रगत प्राणी आहे. म्हणजे, प्रदीर्घ काळाच्या ओघात वानराचा मानव बनण्याच्या प्रक्रियेत, 'गती बदलणे' हा काही अडथळा असू शकत नाही. कारण मानवाला सर्वात प्रगत तिर्यंच म्हणण्यात जैन शास्त्राला काहीच आक्षेच असणार नाही. तसेही मनुष्याला 'मनुष्यप्राणी' म्हणण्याचा प्रघ आहेच. मानवी दुर्लभत्वाचा असाही अर्थ लावता येईल की, निसर्गाच्या विकासक्रमात मानव सर्वात शेवटच्या टप्प्यावर निर्माण झाला आहे.
(५) 'उपनिषदांमध्ये पृथ्वी, अप्, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये जसा एक विशिष्ट क्रम अनुस्यूत आहे तसा जैन दर्शनातल्या पाच एकेंद्रिय जीवांमध्ये आहे का ?' - याचा विचार करू लागलो असता असे दिसते की, उत्तराध्ययन, पंचास्तिकाय या प्राचीन आगमग्रंथांत पृथ्वी, अप् आणि वनस्पती या तिघांनाच स्थावर म्हटले आहे. वनस्पतिशास्त्रीय मान्यतेनुसार वनस्पतीच्या वाढीला क्षार आणि पाणी हे दोन घटक लागतात. पाणी हे दोन वायूंच्या संयोगाने बनले आहे. याचा निर्देश सूत्रकृतांगात आढळतो. याचाच अर्थ असा की, वनस्पतिसृष्टी ही पृथ्वी व पाणी यांच्या आधारे विकसित होऊ शकते. हेच तथ्य या तिघांना 'स्थावर' मानण्यामागे अपेक्षित असावे. शिवाय जैन मान्यतेनुसार निगोदी जीव हे वनस्पतिकायिक आहेत. या सर्वांचा भावार्थ असा की, दृश्य जीवसृष्टीचा आरंभ वनस्पतींपासून झाला व वनस्पतींच्या आधारे हालचाल करणारी जीवसृष्टी हळूहळू विकसित झाली. जैन शास्त्रातील व उत्क्रांतिवादातील अवधारणा एका समान मुद्यापाशी येऊन ठेपतात.
(६) आयुष्यकर्माच्या अंतर्गत जैन दर्शनाने प्रत्येक जीवाच्या कायस्थितिचा व भवस्थितिचा विचार केला आहे. कायस्थिति म्हणजे कोणत्याही दुसऱ्या जातीत (species) जन्म न ग्रहण करता त्याच त्याच जातीमध्ये (species) वारंवार उत्पन्न होणे. तत्त्वार्थसूत्राच्या तिसऱ्या अध्यायात एकेंद्रिय ते पंचेंद्रिय जीवांची उत्कृष्ट व जघन्य कायस्थिति दिलेली आहे. त्यातील उत्कृष्ट कार्यस्थिति लक्षावधी आणि करोडो वर्षे आधी नोंदविलेली आहे? एकाच कायस्थितीत अति प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे परिस्थितीशी समायोजन करून, त्या त्या जाती-प्रजातींनी आपला विकास करून घेण्याची शक्यताच जणू जैन दर्शनाने व्यक्त केलेली दिसते.