________________
पूर्वपक्षाचा पुनर्विचार : 'निगोदी-जीव' संकल्पनेच्या प्रारंभबिंदूच्या आधारे :
उपरोक्त वर्णनावरून अशी धारणा होऊ लागते की, जैन शास्त्राला उत्क्रांतिवाद अर्थात् क्रमिक विकासवाद हा मान्य नाही. 'जैन धर्म हा विज्ञानानुकूल आहे' असे मत जैनविद्येच्या सखोल अभ्यासकांनी नोंदविलेले दिसते. या न्यायाने उत्क्रांतिवादाला पोषक असे संकेत वस्तुत: जैन धर्मातून मिळायला हवेत. जैन शास्त्रग्रंथांत वर्णिलेली 'निगोद' संकल्पना उपरोक्त विचारांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडते.
निगोदी जीवांचे वर्णन हे प्रामुख्याने प्रज्ञापना, जीवाभिगम१२ या अर्धमागधी ग्रंथांत आणि गोम्मटसार (जीवकांड)१३ या शौरसेनी ग्रंथात आढळते. जिज्ञासूंनी ते सर्व सविस्तर वर्णन मूळ ग्रंथांतून आणि जैनेंद्र सिद्धांत कोशातून समजावून घ्यावे.
निगोदविषयक ग्रांथिक वर्णनाचे सार असे आहे - हे निगोदी जीव अत्यंत अप्रगत, एका शरीराच्या आधारे राहणारे, सर्व लोकात व्याप्त असलेले, अनंतानंत, ‘एकेंद्रिय साधारण वनस्पतिजीव' आहेत. जैन धारणेनुसार जेव्हा एखादा जीव मोक्ष प्राप्त करतो तेव्हा नित्य निगोदातून म्हणजे अव्यवहार राशीतून एक जीव व्यवहार राशीत म्हणजे संसारात प्रविष्ट होतो. मोक्षाला जाणारा जीव तर नक्की मानवी जीव आहे. संसारात प्रविष्ट होणारा जीव अप्रगत निगोदी जीव आहे. जैन शास्त्रातील हे तथ्य उत्क्रांतिविरोधक विचारांना वेगळी दिशा देणारे ठरते. निगोदविषयक तथ्यातून जैन शास्त्रातही क्रमिक जीवविकासाला स्थान दिसते.
उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आधुनिक पारिभाषिक शब्दात मांडला असण्याची अपेक्षा प्राचीन जैन शास्त्राकडून करता येत नाही. तथापि जीवसृष्टीच्या क्रमिक विकासाचे संकेत जैन सिद्धांतग्रंथात कसे दिसून येतात याचा शोध घेऊ. प्रथम डार्विनच्या मांडणीनुसार, जैन ग्रंथांतील तथ्यांचा विचार करू.
उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतात अंतर्भूत तथ्ये आणि जैन दृष्टीने समीक्षा :
* डार्विनच्या मते जीवन-प्रक्रिया (Life process) ही सर्वव्यापी असते. सर्वांमध्ये एकच जीवनस्रोत वाहात असतो. ती अनेक रूपांतून व्यक्त होत असते. वनस्पती, प्राणी, पशू, मानव या सर्वांतून एकच जीवनप्रेरणा, एकच जीवनधारा, एकच चित्शक्ती वाहात असते आणि कार्य करीत असते ; आणि ती विभिन्न माध्यमांतून वाहाताना विविध आणि विभिन्न रूपे घेत असते. अमीबापासून वृक्ष वनस्पतीत, पशु-पक्ष्यात आणि मानवात सर्वांमध्ये एकच मूल जीवनधारा वाहात असते.
जैन शास्त्रानुसार जीव हे अनंत आहेत. 'उपयोग' हे सर्व जीवांचे अनन्यसाधारण लक्षण आहे.१४ जीवांच्या अनेक जाति-प्रजातींची आपापली म्हणून वेगळी वैशिष्ट्ये असली तरी ज्ञानचेतनेच्या रूपाने त्यांच्यात साम्य असते. याचाच अर्थ असा की, उत्क्रांतिवादाच्या परिभाषेत एकच चित्-शक्ती सर्व सजीवांमधून वाहात असते.
* विश्वात जीवनप्रक्रिया ही अखंड, परस्परावलंबी, परस्परपूरक, परस्परसाहाय्यक, परस्परपोषक आणि परस्परसंवर्धक अशी प्रदीर्घ क्रियामालिका आहे.
आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, उमास्वातींनी तत्त्वार्थसूत्रात ‘परस्परोग्रहो जीवानाम्'१५ या सूत्रातून हेच अधोरेखित केले आहे की पारस्परिक उपकार करणे' हे जीवांचे कार्य होय. केवळ जीवापुरत्व नव्हे तर त्यांनी काल, पुद्गल, आकाश, धर्म व अधर्म या सर्व द्रव्यांची लक्षणे कार्यद्वारा सांगितली आहेत.
* उत्क्रांतिवादानुसार, प्रत्येक जिवंत वस्तू, वनस्पती आणि प्राणी यांची जिवंत राहण्यासाठी म्हणजे मरण टाळण्यासठी सतत आणि आटोकाट धडपड चालू असते. कोणाही जिवंत प्राण्याला मरण नकोसे वाटते.
जैन शास्त्रानुसार, प्रत्येक सजीवाला चार संज्ञा अर्थात् अंत:प्रेरणा (instincts) आहेत - आहार, भय, मैथुन