Book Title: Jain Tattvagyan aani Jain Samajatil Parivartane Author(s): Anita Bothra Publisher: Anita Bothra View full book textPage 5
________________ ४) दान-मदत-सेवा यांचे सैद्धांतिक स्थान : __ 'जीवो जीवस्य जीवनम्' या वचनामध्ये 'एकाने दुसऱ्याच्या जिवावर जगणे', असा भाव विशेषत्वाने दिसतो. जैन तत्त्वज्ञानात जीवाचे कार्यानुसारी लक्षण देताना 'परस्परोपग्रहो जीवानाम्' असे दिले जाते. या लक्षणात सर्व प्रकारच्या जीवजातीप्रजातींनी एकमेकांना जगायला परस्पर सहकार्य करण्याचा भाव असल्यामुळे अर्थातच दान, मदत, सेवा इ.ना भक्कम सैद्धांतिक आधार लाभतो. परिणामी सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील जैन व्यक्तींना मनापासून दान देण्याची उर्मी विशेष करून दिसून येते. ५) 'पंधरा कर्मादान' अर्थात् निषिद्ध व्यवसाय : जैन श्रावकाचारात, 'कोणते व्यवसाय करावेत व कोणते करू नयेत', याबाबत मार्गदर्शन आढळते. श्रावकाचारातील पंधराही निषिद्ध व्यवसाय आधुनिक परिस्थितीत निषिद्ध ठरवता येत नाहीत. तरीही मद्य, मांस, कातडे, शिंग, केस, रेशीम, हस्तिदंत, मासेमारी इ. प्रत्यक्ष हिंसाधार व्यवसायांमध्ये जैन व्यक्ती सहजी प्रवेश करीत नाही. निषिद्ध व्यवसायांविषयीचे हे संकेत बऱ्याच अंशी पाळल्यामुळे, जैनेतरांना हे प्रांत खुले राहिले. परिणामी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने ते हितकारकच ठरले. ६) तप, उपवास व नियम ग्रहण यांना विशेष स्थान : महाव्रतांचे पूर्ण पालन करणे, श्रावकाला शक्य नसल्याने यथाशक्ती धर्म पालन करणारा प्रत्येक श्रावक, प्राय: विशिष्ट धार्मिक कालावधीत तरी नक्कीच तप, उपवास अथवा विशिष्ट गोष्टींच्या त्यागाचा नियम ग्रहण करतो. असे यथाशक्ती नियम पालन 'जैनत्वा'ची ओळख म्हणूनच गणली पाहिजे. ७) क्षमापना : पर्युषणपर्वानंतर जैन समाजाकडून पाळला जाणारा क्षमापनेचा दिवस हा संवराचे साधन असलेल्या दशविधधर्मांपैकी एक सद्गुण जो ‘क्षमा'-त्याच्या आचारात्मक प्रतिबिंबावर आधारलेला आहे. ८) श्राद्ध, पितर, पिंड व इतर तत्सम चालीरीतींचा अभाव : वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत श्राद्ध, पितर, पिंड, व इतर चालीरीती हा हिंदू समाजाचा एक आविभाज्य घटक बनलेला आहे. शहरीकरणामुळे हिंदूसमाजातील या चाली काहीशा कमी दिसत असल्या तरी, मध्यम छोटी गावे, खेडी इ. मध्ये यांचे प्रायः पालन केले जाते. अगदी तुरळक अपवाद वगळता जैन समाजाने हे विधी उचललेले नाहीत. त्याचे कारण त्यांच्या पुनर्जन्मविषयक सिद्धांतात आहे. जीवाने देहत्याग केल्यानंतर काही क्षणातच तो दुसरे शरीर धारण करतो. त्यामुळे पितर, पिंड, श्राद्ध इ.ना मुळीसुद्धा वाव रहात नाही. ह्या स्पष्ट सैद्धांतिक मान्यतेत बदल करण्याची आवश्यकता जैन समाजाला कोणत्याही काळात वाटली नाही. ९) जैन तत्त्वज्ञानाचा विज्ञानानुकूलतेच्या दिशेने अभ्यास : ___ जैन तत्त्वज्ञानाची पर्यावरणरक्षणाला असलेली अनुकूलता, परमाणु-सिद्धांताचा नवा अन्वयार्थ, गोत्रकर्माचा आनुवंशशास्त्राशी असलेला संबंध, सम्मूर्छिमजीव आणि क्लोनिंग, जैन तत्त्वज्ञानातून मिळणारे उत्क्रांतिवादाला अनुकूल असे संकेत-ह्या आणि अशा अनेक वैज्ञानिक दिशांनी जैनविद्येच्या संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. जैनविद्येच्या अभ्यासाला आधुनिक काळात मिळत चाललेले हे अभिनव वळण, अत्यंत आशादायी आणि तत्त्वज्ञानाची महत्ता अधोरेखित करणारे आहे.Page Navigation
1 ... 3 4 5 6