Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
जैन तत्त्वज्ञान आणि जैन समाजातील परिवर्तने
(महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, मुंबई येथे विशेष व्याख्यान, नोव्हेंबर २०१०)
(१) प्रस्तावना : समाजाची परिवर्तनशीलता ; परिवर्तनशीलतेला जैन तत्त्वज्ञानात स्थान
आपल्या आजूबाजूचे जग, वस्तू, व्यक्ती, घटना सर्वांमध्ये सतत बदल चालू आहेत. काही बदल मंद तर काही शीघ्र आहेत. बदलांच्या अखंड मालिकेने डोळ्यात भरणारी पृथगात्मकता ज्याने जाणवते त्याला आपण 'परिवर्तन' म्हणू या. सामान्यत: अशी अपेक्षा केली जाते की धर्माचरणामध्ये अशी परिवर्तनशीलता असावी. परंतु ती इतकीही नसावी की जिने धर्माला आधारभूत चौकट देणाऱ्या सिद्धांतांना, तत्त्वांना धक्का बसेल.
__ जैन परंपरेचे असे वैशिष्ट्य आहे की बदल, परिवर्तनशीलता आणि 'ध्रौव्य' या दोहोंना तिने आपल्या मूलभूत ढाचातच कौशल्याने विणून ठेवले आहे. 'सत्' म्हणजे 'reality'चे स्वरूपच जैन दर्शनाने 'कूटस्थ नित्य' न मानता ‘उत्पाद-व्यय-ध्रौव्ययुक्त सत्' असे मानले आहे. अशी 'सत्' द्रव्ये एकूण सहा मानली आहेत. जगातील खऱ्याखुऱ्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींची विभागणी षड्-द्रव्यांमध्ये केली आहे. द्रव्याची व्याख्या'गुणपर्यायवद् द्रव्यम्' अशी आहे. यातील ‘पर्याय' संकल्पनेत अवस्थांतरे, बदल, परिवर्तने याला भक्कम सैद्धांतिक पार्श्वभूमी आहे. ___वस्तूकडे (व्यक्तीकडे, घटनांकडे) पाहण्याचे चार 'निक्षेप'ही परिवर्तनशीलतेला वाव देणारे आहेत. ते म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भाव. अनेकान्तवादाचा सिद्धांत तर theory of non-absolutism अगर 'theory of relativity' म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याचा अधिक विस्तार न करता म्हणेन की 'जैनत्व अबाधित राखणारे घटक' आणि 'जैन समाजातील कालानुसार परिवर्तने' या दोन मुद्यांचा विचार आणि त्यातील सुसंगती दाखवणे हे आजच्या माझ्या भाषणाचे प्रयोजन आहे.
(२) जैनविद्येकडे पाहण्याचे अभ्यासकांचे जुने प्रारूप (model). ते बदलण्याची आवश्यकता
___"मुळातला जैनधर्म हा अत्यंत सैद्धांतिक, मूलगामी व कडक असून, साहित्यात, समाजात आणि कलानिर्मितीत, केल्या गेलेल्या तडजोडी ही सर्व 'भ्रष्टरूपे' आहेत”-असे एक प्रारूप जैनविद्येचे देशी-विदेशी अभ्यासक, डोळ्यासमोर ठेवून मूल्यांकन करीत असत. गेल्या दशकात म्हणजे २१ व्या शतकाच्या आरंभापासून हे वैचारिक प्रारूप बदलण्याची आवश्यकता, अभ्यासकांना वाटू लागली. डॉ. जॉन ई. कोर्ट, डॉ. पॉल इन्डास इ. पाश्चात्य विचारवंतांनी नवीन विचारसरणी प्रथम दृष्टिपथात आणली. वैदिक धर्मापासून पुराणातील हिंदुधर्मापर्यंत, त्या परंपरेत जे बदल, परिवर्तने व अवस्थांतरे झाली, त्याची अनेक अभ्यासकांनी 'लवचिक', 'समन्वयवादी' अशा शब्दात भलावण केली. हिंदूंच्या विकसनशील दैवतशास्त्राचा चिकित्सक अभ्यास केला. नवीन बदलांना स्वीकृती दिली.
हिंदू समाजाच्या अत्यंत निकट राहणाऱ्या, जैन समाजाने मात्र ज्या चालीरीती, श्रद्धा व देवदेवता स्वीकारल्या, त्याबद्दल जैनांमधल्या सनातन्यांनी पाखंड म्हणून हिणवले. विचारवंतांनीही 'जैनीकरण' 'जैनीकरण' अशी दूषणे लावली. जैनधर्म आणि हिंदुधर्म यांना असे दोन वेगळे निकष लावायचे का ? हे सर्व बदल बाह्य आचारबदल आहेत की सिद्धांताशीही तडजोड केली आहे', याचा पुनर्विचार होणे अत्यंत जरूरीचे आहे.
(३) जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार टिकविण्याचे मुख्य आधार - १) कुटुंब २) स्वाध्याय मंडळे ३) साधु-साध्वी वर्ग
औपचारिक शिक्षण पद्धतीतून जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार यांचे मिळणारे मार्गदर्शन जवळ-जवळ नगण्य
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
आहे. समाजही अल्पसंख्य आहे. तरीही हे तिन्ही अव्याहतपणे २६०० - २७०० वर्षे टिकून राहण्याचे मुख्य आधार, वर वर्णन केलेले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. हे आव्हान खरोखरच अवघड आहे. धर्माचरणाची व सिद्धांतांची मूलभूत आवड असल्याशिवाय, हे टिकून राहणे दुष्कर आहे. त्यामुळेच द्रव्य-क्षेत्र - काल-भावानुसार काही तडजोडी करतच, या धर्माचे अस्तित्व टिकून राहिले.
(४) कोणत्या गोष्टींमुळे जैन समाज हिंदू बांधवांच्या अगदी जवळ आला असा आभास निर्माण होतो
?
१) मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा :
‘सैद्धांतिक दृष्टीने निरीश्वरवादी असलेल्या जैनधर्मीयांनी मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा इ. ना आपल्या धर्मात का बरे स्थान दिले ?' - असा कळीचा प्रश्न वारंवार विचारला जातो. हिंदुधर्माचा यांवरील प्रभाव पूर्ण नाकारता येणार नाही. तथापि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीतरागी जिनांची स्थापना करून, त्यांच्या आदर्शरूप मानवी गुणांची पूजा करणे, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. भक्ती, श्रद्धा, पूजा यांना स्थान असले तरी ते पुण्यबंधकारक मानले आहे. सिद्धांतानुसार भक्ती, पूजा, गुणानुवाद, दान इ. सर्व कृत्ये पुण्य बांधतात परंतु कर्मांची निर्जरा करू शकत नाहीत. त्यासाठी ज्ञानपूर्वक केलेल्या तपस्येची, शुद्ध आचरणाची आणि संयमित वृत्तींची आवश्यकता आहे, हे प्रत्येक जैन व्यक्ती प्राय: समजूनच असते. यक्ष-यक्षिणी, विद्यादेवता, शासनदेवता इ. मुळे कदाचित ऐहिक लाभ होऊ शकतील (अर्थात् तेही कर्मफलानुसार). परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी देवदेवता पूजन प्रत्यक्ष सहाय्यभूत होऊ शकत नाही.
२) सण-वार- उत्सवात सहभाग :
हिंदू बांधवांच्या सण-वार- उत्सवात जैन बांधवांचा सहभाग हा निव्वळ सामाजिक कारणाने असतो, धार्मिक नव्हे. अर्थातच काही अपवाद असू शकतात. अक्षयतृतीया, दिवाळी इ. प्रसंगी आवर्जून, जैन इतिहासातील व्यक्तींचे व घटनांचे स्मरण केले जाते.
३) चातुर्मास व इतर व्रते :
हिंदूंच्या व जैनांच्या चातुर्मासाच्या पद्धतीत साम्प्रत काळातही बराच फरक दिसतो. जैनांच्या चातुर्मासात तप आणि उपवासाला विशेष महत्त्व असते. हिंदू व्रते प्राय: पूजाविधी व भोजनविधीच्या संबंधित असतात. मुळातच 'व्रत' हा शब्द जैन परंपरेत महाव्रते व श्रावकव्रते (अणुव्रते) यांच्याशीच जोडलेला आहे. इच्छित गोष्टीच्या प्राप्तीसाठी केलेली तात्कालिक व्रते जैनांमध्ये त्यामानाने अत्यल्प आहेत. त्यापेक्षा दैनंदिन, चातुर्मासिक अथवा वार्षिक नियम ग्रहण करून तो पाळण्याकडे अधिक कल दिसतो.
४) अनेक संप्रदाय - उपसंप्रदाय :
अनेकांतवादी जैनधर्मातील श्वेतांबर - दिगंबर मतभेद आणि फाटाफूट होऊन निघालेले इतर संप्रदाय, याबद्दल अभ्यासक अनेकदा आक्षेप घेतात. फाटाफुटीचे समर्थन करण्याचा येथे उद्देश नाही. परंतु शैव, वैष्णव, माहेश्वरी, लिंगायत, नाथपंथी, वारकरी, रामानुजी आणि इतरही असंख्य उपसंप्रदाय असूनही, जेव्हा ते सर्वजण हिंदू म्हणून संबोधले जातात, तेव्हा समान सैद्धांतिक आधार असणारे संप्रदाय अनेक असले तरी, जैनधर्माच्या एकत्वाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. शिवाय आधुनिक काळात याच कारणासाठी धर्म आणि जात या दोन्ही शीर्षकाखाली फक्त 'जैन' असे लिहावे, असे आव्हान करण्यात येते. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे कारण जैन युवापिढीला संप्रदाय - उपसंप्रदायातील ही तेढ अजिबात मान्य नाही. येत्या दशकभरातच त्याचे
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
परिणाम दिसण्याची सुचिह्ने जाणवू लागली आहेत.
(५) व्यापार व शेतीव्यवसायामुळे निर्माण झालेली अंगभूत वैशिष्ट्ये अ) साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण : ____ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार जैन समाजात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण जवळ-जवळ शत-प्रतिशत आहे. व्यापार आणि हिशेब ठेवणे ही तर कारणे आहेतच परंतु आदिनाथ ऋषभदेवांनी आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना लिपी विज्ञान आणि गणित यांचे शिक्षण दिले होते, ही ऐतिहासिक धारणाही यामागची पार्श्वभूमी असावी.
ब) जेथे जातील तेथील समाजाशी एकरूप :
भ. महावीरांच्या कार्यप्रवृत्ती प्रामुख्याने मगधात होत्या म्हणजे अंग-वंग आणि कलिंग या प्राचीन भारतीय प्रदेशात तो सर्वप्रथम पसरला. जैन इतिहासानुसार त्यानंतर तो पश्चिमेकडे व दक्षिणेकडेही प्रसृत झाला. विशेष गोष्ट अशी की व्यापारामुळे व धाडसी स्वभावामुळे जैन समाज भारतभर व भारताबाहेरही पसरत राहिला. विशिष्ट प्रदेशाशी निगडित नसल्यामुळे, त्या त्या प्रदेशाची भाषा, चालीरीती, पोषाख इ. ही स्वीकारीत गेला. एवढे सामाजिक अभिसरण होऊनही जैनधर्मीयांनी आपली पृथगात्मकता नेटाने जपली.
क) भाषिक वैशिष्ट्ये :
धर्म आणि आचार हा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठीच, जैन तीर्थंकरांनी आपले उपदेश 'प्राकृत' भाषेमध्ये दिले होते. भ. महावीरांचे प्राचीन उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत आहेत. प्राकृत या बोलीभाषा असल्यामुळे त्या संपूर्ण भारतात आरंभापासूनच विविध होत्या. भाषेची स्थळानुसार आणि काळानुसार होणारी सगळी परिवर्तने, जैनधर्माने सकारात्मकतेने स्वीकारली. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश या पाचही भाषांतून ग्रंथनिर्मिती केली. १० व्या शतकानंतर गुजराती, हिंदी, मराठी कन्नड या चार भाषांमधील मूळ साहित्याला भरीव योगदान दिले. महत्त्वाची गोष्ट अशी की, आपले सर्व मूलगामी तत्त्वज्ञान वेळोवेळी त्यांनी या भाषांच्या माध्यमातून समाजापर्यंत झिरपवले. जैन समाजाचे हे वैशिष्ट्यच आहे की तो तीन-चार भाषा तरी सहजपणे बोलू शकतो. अर्थातच बहुभाषित्वाचे हे वरदान जैन साधु-साध्वी-वर्गामध्ये तर अधिकच विशेषत्वाने दिसते.
ड) राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण :
जैनांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहास वाचताना हे जाणवते की, या तिन्ही काळात त्यांनी राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवले. इ.स.पूर्व २०० मध्ये होऊन गेलेला ‘सम्राट खारवेल' जन्माने जैन होता असे कलिंग अर्थात आधुनिक ओरिसातील 'हाथीगुंफा' शिलालेखावरून स्पष्ट होते. गुजरातेतील शैवराजा, वनराज चावडा जैनानुकूल होता. चालुक्य राजा कुमारपाल पूर्णत: जैन श्रावक होता. दक्षिणेतील कदंब, गंग, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ हे राजेही जैन साधुवर्ग व श्रावकवर्गाला अनुकूल होते. ह्या सर्व राजवटीत राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवणे त्यामानाने सोपे होते. मुघल राजांच्या आक्रमणानंतर तपागच्छ आणि 'खरतरगच्छा'च्या साधुवर्गाने त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. जिनप्रभसूरींच्या अंगी असलेल्या शक्ती व सिद्धींचा प्रभाव, ‘महम्मद तघलका'वर होता असे दिसून येते. त्यामुळेच जिनप्रभसूरींनी मुघल राजवट चालू असतानाही, अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत पुढाकार घेऊन जैनसंघाची व धर्माची खूप प्रभावना केली. त्याच्या आश्रयाने 'विविधतीर्थकल्प'सारख्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मितीही केली. १६
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
व्या शतकात सम्राट ‘अकबरा'च्या दरबारात आ. 'हीरविजयसूरीं'ना सन्मानाचे स्थान होते. सम्राट अकबराने आपल्या संपूर्ण साम्राज्यात पर्युषणपर्वकाळात कत्तलखाने बंद ठेवण्याची आज्ञा दिली होती. शिकारीलाही बंदी घातली होती. बादशाह ‘जहांगिर'नेही अकबरानंतर हेच धोरण ठेवले होते. २० व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडां'वरही तपागच्छाच्या 'बुद्धिसागरसूरीं'च्या अहिंसाविचाराचा पगडा होता.
पुढील काळात जैन आणि युरोपियन यांचे सामाजिक, आर्थिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. ब्रिटीश राजवटीतही जैन समाजाने Bankers, Traders and Merchants यांच्या रूपाने आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटन, आफ्रिका आणि अमेरिका या खंडात व्यापारानिमित्त पोहोचलेले लोक बहुतांशी जैनच होते. या खंडात पोहोचल्यानंतर त्यांनी आपोआपच संघटना बांधून, मंदिरनिर्मिती व अभ्यासकेंद्रे स्थापली. यशस्वी व्यापाराबरोबरच शाकाहार, अहिंसा आणि शांतता यांच्या प्रसाराचे काम, आपापल्या शक्तीनुसार चालू ठेवले.
या संक्षिप्त इतिहासावरून असे दिसून येते की सामोपचाराचे धोरण ठेवण्यासाठी, स्वत:त वेळोवेळी बदल घडवून आणण्याची जी शक्ती लागते, ती जैनांनी परंपरागत धर्मातून चालत आलेल्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मिळविली.
(६) परिवर्तने चालू असतानाच जैनांनी जपलेले 'जैनत्व' : ___वर वर पाहता समाजाशी एकरूप झाल्यासारखे दिसणारे जैन लोक, कोणकोणत्या बाबतीत आपल्या जैनत्वाची चिह्न जपून आहेत, या विषयाचे काही मुद्दे, माझ्या २५ वर्षांच्या निरीक्षणाच्या आधारे नमूद करीत आहे. १) अहिंसेचे आहारात प्रत्यक्षीकरण :
अहिंसातत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात सूक्ष्म वापर करत असताना, जैनांनी प्रथम स्वत:च्या आहारात पूर्ण अहिंसा आणली. शाकाहाराच्या अंतर्गतही प्रत्येक वनस्पतिजीवाचा सूक्ष्म विचार करून, अनेक प्रकारच्या संयम व मर्यादा सांगितल्या. आधुनिक काळातही देश-विदेशी मिशनरी वृत्तीने शाकाहार चळवळ चालू ठेवली. त्या चळवळीला सकारात्मक पाठिंबाही मिळत आहे.
२) 'आपला समाज'-अशी संघभावना :
सामाजिकता जपत असतानाच स्वतः अल्पसंख्य असल्यामुळे धर्माच्या समानतेच्या आधारे, छोट्यामोठ्या संघटना उभ्या करून, त्या द्वारे आपल्या आणि इतर समाजाच्या हिताची कामे करण्याची एक सर्वसाधारण प्रवृत्ती, जैन माणसामध्ये मूलत:च रुजलेली असते. धर्म आणि आचार टिकून राहण्यासाठी, अशा छोट्यामोठ्या संघटना आपोआपच कार्यरत असतात.
३) साधु-साध्वी वर्गाचे तुलनेने काटेकोर आचरण :
पायी विहार, वस्त्र-पात्र मर्यादा, सचित्त सेवनाचा त्याग, रात्रिभोजनत्याग इ. अनेक प्रकारचे कडक अथवा कठोर आचरण इतर धर्मीयांच्या तुलनेत, जैन साधु-साध्वीवर्ग काटेकोरपणे करीत असलेला दिसतो. वेळोवेळी यामध्ये शिथिलता आणण्याची चर्चाही होत राहते. परंतु जैनत्व जपण्यासाठी अंतिमत: हे कडक आचरण उपयुक्तच ठरते.
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
४) दान-मदत-सेवा यांचे सैद्धांतिक स्थान :
__ 'जीवो जीवस्य जीवनम्' या वचनामध्ये 'एकाने दुसऱ्याच्या जिवावर जगणे', असा भाव विशेषत्वाने दिसतो. जैन तत्त्वज्ञानात जीवाचे कार्यानुसारी लक्षण देताना 'परस्परोपग्रहो जीवानाम्' असे दिले जाते. या लक्षणात सर्व प्रकारच्या जीवजातीप्रजातींनी एकमेकांना जगायला परस्पर सहकार्य करण्याचा भाव असल्यामुळे अर्थातच दान, मदत, सेवा इ.ना भक्कम सैद्धांतिक आधार लाभतो. परिणामी सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील जैन व्यक्तींना मनापासून दान देण्याची उर्मी विशेष करून दिसून येते.
५) 'पंधरा कर्मादान' अर्थात् निषिद्ध व्यवसाय :
जैन श्रावकाचारात, 'कोणते व्यवसाय करावेत व कोणते करू नयेत', याबाबत मार्गदर्शन आढळते. श्रावकाचारातील पंधराही निषिद्ध व्यवसाय आधुनिक परिस्थितीत निषिद्ध ठरवता येत नाहीत. तरीही मद्य, मांस, कातडे, शिंग, केस, रेशीम, हस्तिदंत, मासेमारी इ. प्रत्यक्ष हिंसाधार व्यवसायांमध्ये जैन व्यक्ती सहजी प्रवेश करीत नाही. निषिद्ध व्यवसायांविषयीचे हे संकेत बऱ्याच अंशी पाळल्यामुळे, जैनेतरांना हे प्रांत खुले राहिले. परिणामी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने ते हितकारकच ठरले.
६) तप, उपवास व नियम ग्रहण यांना विशेष स्थान :
महाव्रतांचे पूर्ण पालन करणे, श्रावकाला शक्य नसल्याने यथाशक्ती धर्म पालन करणारा प्रत्येक श्रावक, प्राय: विशिष्ट धार्मिक कालावधीत तरी नक्कीच तप, उपवास अथवा विशिष्ट गोष्टींच्या त्यागाचा नियम ग्रहण करतो. असे यथाशक्ती नियम पालन 'जैनत्वा'ची ओळख म्हणूनच गणली पाहिजे.
७) क्षमापना :
पर्युषणपर्वानंतर जैन समाजाकडून पाळला जाणारा क्षमापनेचा दिवस हा संवराचे साधन असलेल्या दशविधधर्मांपैकी एक सद्गुण जो ‘क्षमा'-त्याच्या आचारात्मक प्रतिबिंबावर आधारलेला आहे.
८) श्राद्ध, पितर, पिंड व इतर तत्सम चालीरीतींचा अभाव :
वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत श्राद्ध, पितर, पिंड, व इतर चालीरीती हा हिंदू समाजाचा एक आविभाज्य घटक बनलेला आहे. शहरीकरणामुळे हिंदूसमाजातील या चाली काहीशा कमी दिसत असल्या तरी, मध्यम छोटी गावे, खेडी इ. मध्ये यांचे प्रायः पालन केले जाते. अगदी तुरळक अपवाद वगळता जैन समाजाने हे विधी उचललेले नाहीत. त्याचे कारण त्यांच्या पुनर्जन्मविषयक सिद्धांतात आहे. जीवाने देहत्याग केल्यानंतर काही क्षणातच तो दुसरे शरीर धारण करतो. त्यामुळे पितर, पिंड, श्राद्ध इ.ना मुळीसुद्धा वाव रहात नाही. ह्या स्पष्ट सैद्धांतिक मान्यतेत बदल करण्याची आवश्यकता जैन समाजाला कोणत्याही काळात वाटली नाही.
९) जैन तत्त्वज्ञानाचा विज्ञानानुकूलतेच्या दिशेने अभ्यास : ___ जैन तत्त्वज्ञानाची पर्यावरणरक्षणाला असलेली अनुकूलता, परमाणु-सिद्धांताचा नवा अन्वयार्थ, गोत्रकर्माचा आनुवंशशास्त्राशी असलेला संबंध, सम्मूर्छिमजीव आणि क्लोनिंग, जैन तत्त्वज्ञानातून मिळणारे उत्क्रांतिवादाला अनुकूल असे संकेत-ह्या आणि अशा अनेक वैज्ञानिक दिशांनी जैनविद्येच्या संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. जैनविद्येच्या अभ्यासाला आधुनिक काळात मिळत चाललेले हे अभिनव वळण, अत्यंत आशादायी आणि तत्त्वज्ञानाची महत्ता अधोरेखित करणारे आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________ 7) काळाच्या ओघात निर्माण झालेले दोष : __ आत्तापर्यंतच्या वर्णनावरून असे वाटेल की जैनत्व जपण्यासाठी केलेले सर्व बदल सकारात्मकच आहेत की काय ? अर्थातच हे खरे नाही. बदल-परिवर्तन करून घेत असताना स्वाभाविकपणे दोष हे उद्भवणारच. गृहमयूर' वृत्ती, संप्रदाय-संप्रदायात कट्टापणा-वैमनस्य-तेढ, आर्थिक घोटाळ्यांशी संबंध, दानात दडलेली दिमाख दाखविण्याची वृत्ती, समारंभी बडेजाव-डामडौल, 'अहो रूपं अहो ध्वनि:'-अशा प्रकारे पुरस्कारांची रेलचेल, सामाजिक प्रतिष्ठेचे दडपण, हाव अथवा अट्टाहास, 'जैन सोडून जे इतर ते पाखंड'-अशी वृत्ती, आर्थिक भरभराटीसाठी साधु-बुवा-ज्योतिषांकडे घेतलेली धाव-हे आणि इतरही अनेक दोष जैन समाजाबाबत दृष्टोत्पत्तीस आणून दिले जातात आणि येतील. ___ परंतु यातील कित्येक दोष असे आहेत की जे काळाच्या ओघात एकंदर समाजातच खतपाणी घालून जोपासलेले आहेत, केवळ 'जैन' असल्यामुळे आलेले नाहीत. 'भ्रष्टाचार हाच शिष्टाचार' अशा सार्वत्रिक नैतिक अध:पतनाच्या काळात हे जैन-हे जैनेतर' अशी तफावत करून ठोकत रहाणे उचित नव्हे. ___ अत्यंत वरचा मलईदार स्तर (creamy layer) आणि निम्न स्तर हे वगळता सामान्यत: जैन समाज धर्मप्रेमी, कौटुंबिक व अंतर्गत भावनिक संबंध जपणारा, संकटकाळी तत्परतेने मदतीसाठी पुढे होणारा, तडजोडवादी आणि इतरांशी एकरूप होता होता स्वत:चे ‘जैनत्व' जपण्याची तारेवरची कसरत करणारा असा आहे. ते बदल आणि परिवर्तने तो सहज स्वीकारतो जे मूलभूत तत्त्वज्ञानाच्या चौकटीशी सुसंगत ठरतात. ___ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामान्यतः समजतात तसे 'जैन' म्हणजे केवळ 'जैन दर्शन' नव्हे. ही एक स्वायत्त, प्राचीन परंपरा आहे. त्या परंपरेला तिचा म्हणून खास इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, आचारप्रणाली आणि कलानिर्मितीची प्रेरणा आहे. या सर्व प्रांतात जैनांनी भारतीय संस्कृतीला दिलेले योगदान, ‘संख्याबल' पाहता, खरोखरच लक्षणीय आहे !!! **********