________________
आहे. समाजही अल्पसंख्य आहे. तरीही हे तिन्ही अव्याहतपणे २६०० - २७०० वर्षे टिकून राहण्याचे मुख्य आधार, वर वर्णन केलेले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. हे आव्हान खरोखरच अवघड आहे. धर्माचरणाची व सिद्धांतांची मूलभूत आवड असल्याशिवाय, हे टिकून राहणे दुष्कर आहे. त्यामुळेच द्रव्य-क्षेत्र - काल-भावानुसार काही तडजोडी करतच, या धर्माचे अस्तित्व टिकून राहिले.
(४) कोणत्या गोष्टींमुळे जैन समाज हिंदू बांधवांच्या अगदी जवळ आला असा आभास निर्माण होतो
?
१) मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा :
‘सैद्धांतिक दृष्टीने निरीश्वरवादी असलेल्या जैनधर्मीयांनी मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा इ. ना आपल्या धर्मात का बरे स्थान दिले ?' - असा कळीचा प्रश्न वारंवार विचारला जातो. हिंदुधर्माचा यांवरील प्रभाव पूर्ण नाकारता येणार नाही. तथापि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीतरागी जिनांची स्थापना करून, त्यांच्या आदर्शरूप मानवी गुणांची पूजा करणे, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. भक्ती, श्रद्धा, पूजा यांना स्थान असले तरी ते पुण्यबंधकारक मानले आहे. सिद्धांतानुसार भक्ती, पूजा, गुणानुवाद, दान इ. सर्व कृत्ये पुण्य बांधतात परंतु कर्मांची निर्जरा करू शकत नाहीत. त्यासाठी ज्ञानपूर्वक केलेल्या तपस्येची, शुद्ध आचरणाची आणि संयमित वृत्तींची आवश्यकता आहे, हे प्रत्येक जैन व्यक्ती प्राय: समजूनच असते. यक्ष-यक्षिणी, विद्यादेवता, शासनदेवता इ. मुळे कदाचित ऐहिक लाभ होऊ शकतील (अर्थात् तेही कर्मफलानुसार). परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी देवदेवता पूजन प्रत्यक्ष सहाय्यभूत होऊ शकत नाही.
२) सण-वार- उत्सवात सहभाग :
हिंदू बांधवांच्या सण-वार- उत्सवात जैन बांधवांचा सहभाग हा निव्वळ सामाजिक कारणाने असतो, धार्मिक नव्हे. अर्थातच काही अपवाद असू शकतात. अक्षयतृतीया, दिवाळी इ. प्रसंगी आवर्जून, जैन इतिहासातील व्यक्तींचे व घटनांचे स्मरण केले जाते.
३) चातुर्मास व इतर व्रते :
हिंदूंच्या व जैनांच्या चातुर्मासाच्या पद्धतीत साम्प्रत काळातही बराच फरक दिसतो. जैनांच्या चातुर्मासात तप आणि उपवासाला विशेष महत्त्व असते. हिंदू व्रते प्राय: पूजाविधी व भोजनविधीच्या संबंधित असतात. मुळातच 'व्रत' हा शब्द जैन परंपरेत महाव्रते व श्रावकव्रते (अणुव्रते) यांच्याशीच जोडलेला आहे. इच्छित गोष्टीच्या प्राप्तीसाठी केलेली तात्कालिक व्रते जैनांमध्ये त्यामानाने अत्यल्प आहेत. त्यापेक्षा दैनंदिन, चातुर्मासिक अथवा वार्षिक नियम ग्रहण करून तो पाळण्याकडे अधिक कल दिसतो.
४) अनेक संप्रदाय - उपसंप्रदाय :
अनेकांतवादी जैनधर्मातील श्वेतांबर - दिगंबर मतभेद आणि फाटाफूट होऊन निघालेले इतर संप्रदाय, याबद्दल अभ्यासक अनेकदा आक्षेप घेतात. फाटाफुटीचे समर्थन करण्याचा येथे उद्देश नाही. परंतु शैव, वैष्णव, माहेश्वरी, लिंगायत, नाथपंथी, वारकरी, रामानुजी आणि इतरही असंख्य उपसंप्रदाय असूनही, जेव्हा ते सर्वजण हिंदू म्हणून संबोधले जातात, तेव्हा समान सैद्धांतिक आधार असणारे संप्रदाय अनेक असले तरी, जैनधर्माच्या एकत्वाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. शिवाय आधुनिक काळात याच कारणासाठी धर्म आणि जात या दोन्ही शीर्षकाखाली फक्त 'जैन' असे लिहावे, असे आव्हान करण्यात येते. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे कारण जैन युवापिढीला संप्रदाय - उपसंप्रदायातील ही तेढ अजिबात मान्य नाही. येत्या दशकभरातच त्याचे