________________
जैन तत्त्वज्ञान आणि जैन समाजातील परिवर्तने
(महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, मुंबई येथे विशेष व्याख्यान, नोव्हेंबर २०१०)
(१) प्रस्तावना : समाजाची परिवर्तनशीलता ; परिवर्तनशीलतेला जैन तत्त्वज्ञानात स्थान
आपल्या आजूबाजूचे जग, वस्तू, व्यक्ती, घटना सर्वांमध्ये सतत बदल चालू आहेत. काही बदल मंद तर काही शीघ्र आहेत. बदलांच्या अखंड मालिकेने डोळ्यात भरणारी पृथगात्मकता ज्याने जाणवते त्याला आपण 'परिवर्तन' म्हणू या. सामान्यत: अशी अपेक्षा केली जाते की धर्माचरणामध्ये अशी परिवर्तनशीलता असावी. परंतु ती इतकीही नसावी की जिने धर्माला आधारभूत चौकट देणाऱ्या सिद्धांतांना, तत्त्वांना धक्का बसेल.
__ जैन परंपरेचे असे वैशिष्ट्य आहे की बदल, परिवर्तनशीलता आणि 'ध्रौव्य' या दोहोंना तिने आपल्या मूलभूत ढाचातच कौशल्याने विणून ठेवले आहे. 'सत्' म्हणजे 'reality'चे स्वरूपच जैन दर्शनाने 'कूटस्थ नित्य' न मानता ‘उत्पाद-व्यय-ध्रौव्ययुक्त सत्' असे मानले आहे. अशी 'सत्' द्रव्ये एकूण सहा मानली आहेत. जगातील खऱ्याखुऱ्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींची विभागणी षड्-द्रव्यांमध्ये केली आहे. द्रव्याची व्याख्या'गुणपर्यायवद् द्रव्यम्' अशी आहे. यातील ‘पर्याय' संकल्पनेत अवस्थांतरे, बदल, परिवर्तने याला भक्कम सैद्धांतिक पार्श्वभूमी आहे. ___वस्तूकडे (व्यक्तीकडे, घटनांकडे) पाहण्याचे चार 'निक्षेप'ही परिवर्तनशीलतेला वाव देणारे आहेत. ते म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भाव. अनेकान्तवादाचा सिद्धांत तर theory of non-absolutism अगर 'theory of relativity' म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याचा अधिक विस्तार न करता म्हणेन की 'जैनत्व अबाधित राखणारे घटक' आणि 'जैन समाजातील कालानुसार परिवर्तने' या दोन मुद्यांचा विचार आणि त्यातील सुसंगती दाखवणे हे आजच्या माझ्या भाषणाचे प्रयोजन आहे.
(२) जैनविद्येकडे पाहण्याचे अभ्यासकांचे जुने प्रारूप (model). ते बदलण्याची आवश्यकता
___"मुळातला जैनधर्म हा अत्यंत सैद्धांतिक, मूलगामी व कडक असून, साहित्यात, समाजात आणि कलानिर्मितीत, केल्या गेलेल्या तडजोडी ही सर्व 'भ्रष्टरूपे' आहेत”-असे एक प्रारूप जैनविद्येचे देशी-विदेशी अभ्यासक, डोळ्यासमोर ठेवून मूल्यांकन करीत असत. गेल्या दशकात म्हणजे २१ व्या शतकाच्या आरंभापासून हे वैचारिक प्रारूप बदलण्याची आवश्यकता, अभ्यासकांना वाटू लागली. डॉ. जॉन ई. कोर्ट, डॉ. पॉल इन्डास इ. पाश्चात्य विचारवंतांनी नवीन विचारसरणी प्रथम दृष्टिपथात आणली. वैदिक धर्मापासून पुराणातील हिंदुधर्मापर्यंत, त्या परंपरेत जे बदल, परिवर्तने व अवस्थांतरे झाली, त्याची अनेक अभ्यासकांनी 'लवचिक', 'समन्वयवादी' अशा शब्दात भलावण केली. हिंदूंच्या विकसनशील दैवतशास्त्राचा चिकित्सक अभ्यास केला. नवीन बदलांना स्वीकृती दिली.
हिंदू समाजाच्या अत्यंत निकट राहणाऱ्या, जैन समाजाने मात्र ज्या चालीरीती, श्रद्धा व देवदेवता स्वीकारल्या, त्याबद्दल जैनांमधल्या सनातन्यांनी पाखंड म्हणून हिणवले. विचारवंतांनीही 'जैनीकरण' 'जैनीकरण' अशी दूषणे लावली. जैनधर्म आणि हिंदुधर्म यांना असे दोन वेगळे निकष लावायचे का ? हे सर्व बदल बाह्य आचारबदल आहेत की सिद्धांताशीही तडजोड केली आहे', याचा पुनर्विचार होणे अत्यंत जरूरीचे आहे.
(३) जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार टिकविण्याचे मुख्य आधार - १) कुटुंब २) स्वाध्याय मंडळे ३) साधु-साध्वी वर्ग
औपचारिक शिक्षण पद्धतीतून जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार यांचे मिळणारे मार्गदर्शन जवळ-जवळ नगण्य