Book Title: Jain Tattvagyan aani Jain Samajatil Parivartane
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra

View full book text
Previous | Next

Page 3
________________ परिणाम दिसण्याची सुचिह्ने जाणवू लागली आहेत. (५) व्यापार व शेतीव्यवसायामुळे निर्माण झालेली अंगभूत वैशिष्ट्ये अ) साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण : ____ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार जैन समाजात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण जवळ-जवळ शत-प्रतिशत आहे. व्यापार आणि हिशेब ठेवणे ही तर कारणे आहेतच परंतु आदिनाथ ऋषभदेवांनी आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना लिपी विज्ञान आणि गणित यांचे शिक्षण दिले होते, ही ऐतिहासिक धारणाही यामागची पार्श्वभूमी असावी. ब) जेथे जातील तेथील समाजाशी एकरूप : भ. महावीरांच्या कार्यप्रवृत्ती प्रामुख्याने मगधात होत्या म्हणजे अंग-वंग आणि कलिंग या प्राचीन भारतीय प्रदेशात तो सर्वप्रथम पसरला. जैन इतिहासानुसार त्यानंतर तो पश्चिमेकडे व दक्षिणेकडेही प्रसृत झाला. विशेष गोष्ट अशी की व्यापारामुळे व धाडसी स्वभावामुळे जैन समाज भारतभर व भारताबाहेरही पसरत राहिला. विशिष्ट प्रदेशाशी निगडित नसल्यामुळे, त्या त्या प्रदेशाची भाषा, चालीरीती, पोषाख इ. ही स्वीकारीत गेला. एवढे सामाजिक अभिसरण होऊनही जैनधर्मीयांनी आपली पृथगात्मकता नेटाने जपली. क) भाषिक वैशिष्ट्ये : धर्म आणि आचार हा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठीच, जैन तीर्थंकरांनी आपले उपदेश 'प्राकृत' भाषेमध्ये दिले होते. भ. महावीरांचे प्राचीन उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत आहेत. प्राकृत या बोलीभाषा असल्यामुळे त्या संपूर्ण भारतात आरंभापासूनच विविध होत्या. भाषेची स्थळानुसार आणि काळानुसार होणारी सगळी परिवर्तने, जैनधर्माने सकारात्मकतेने स्वीकारली. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश या पाचही भाषांतून ग्रंथनिर्मिती केली. १० व्या शतकानंतर गुजराती, हिंदी, मराठी कन्नड या चार भाषांमधील मूळ साहित्याला भरीव योगदान दिले. महत्त्वाची गोष्ट अशी की, आपले सर्व मूलगामी तत्त्वज्ञान वेळोवेळी त्यांनी या भाषांच्या माध्यमातून समाजापर्यंत झिरपवले. जैन समाजाचे हे वैशिष्ट्यच आहे की तो तीन-चार भाषा तरी सहजपणे बोलू शकतो. अर्थातच बहुभाषित्वाचे हे वरदान जैन साधु-साध्वी-वर्गामध्ये तर अधिकच विशेषत्वाने दिसते. ड) राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण : जैनांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहास वाचताना हे जाणवते की, या तिन्ही काळात त्यांनी राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवले. इ.स.पूर्व २०० मध्ये होऊन गेलेला ‘सम्राट खारवेल' जन्माने जैन होता असे कलिंग अर्थात आधुनिक ओरिसातील 'हाथीगुंफा' शिलालेखावरून स्पष्ट होते. गुजरातेतील शैवराजा, वनराज चावडा जैनानुकूल होता. चालुक्य राजा कुमारपाल पूर्णत: जैन श्रावक होता. दक्षिणेतील कदंब, गंग, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ हे राजेही जैन साधुवर्ग व श्रावकवर्गाला अनुकूल होते. ह्या सर्व राजवटीत राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवणे त्यामानाने सोपे होते. मुघल राजांच्या आक्रमणानंतर तपागच्छ आणि 'खरतरगच्छा'च्या साधुवर्गाने त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. जिनप्रभसूरींच्या अंगी असलेल्या शक्ती व सिद्धींचा प्रभाव, ‘महम्मद तघलका'वर होता असे दिसून येते. त्यामुळेच जिनप्रभसूरींनी मुघल राजवट चालू असतानाही, अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत पुढाकार घेऊन जैनसंघाची व धर्माची खूप प्रभावना केली. त्याच्या आश्रयाने 'विविधतीर्थकल्प'सारख्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मितीही केली. १६

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6