Book Title: Jain Tattvagyan aani Jain Samajatil Parivartane
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra

View full book text
Previous | Next

Page 4
________________ व्या शतकात सम्राट ‘अकबरा'च्या दरबारात आ. 'हीरविजयसूरीं'ना सन्मानाचे स्थान होते. सम्राट अकबराने आपल्या संपूर्ण साम्राज्यात पर्युषणपर्वकाळात कत्तलखाने बंद ठेवण्याची आज्ञा दिली होती. शिकारीलाही बंदी घातली होती. बादशाह ‘जहांगिर'नेही अकबरानंतर हेच धोरण ठेवले होते. २० व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडां'वरही तपागच्छाच्या 'बुद्धिसागरसूरीं'च्या अहिंसाविचाराचा पगडा होता. पुढील काळात जैन आणि युरोपियन यांचे सामाजिक, आर्थिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. ब्रिटीश राजवटीतही जैन समाजाने Bankers, Traders and Merchants यांच्या रूपाने आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटन, आफ्रिका आणि अमेरिका या खंडात व्यापारानिमित्त पोहोचलेले लोक बहुतांशी जैनच होते. या खंडात पोहोचल्यानंतर त्यांनी आपोआपच संघटना बांधून, मंदिरनिर्मिती व अभ्यासकेंद्रे स्थापली. यशस्वी व्यापाराबरोबरच शाकाहार, अहिंसा आणि शांतता यांच्या प्रसाराचे काम, आपापल्या शक्तीनुसार चालू ठेवले. या संक्षिप्त इतिहासावरून असे दिसून येते की सामोपचाराचे धोरण ठेवण्यासाठी, स्वत:त वेळोवेळी बदल घडवून आणण्याची जी शक्ती लागते, ती जैनांनी परंपरागत धर्मातून चालत आलेल्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मिळविली. (६) परिवर्तने चालू असतानाच जैनांनी जपलेले 'जैनत्व' : ___वर वर पाहता समाजाशी एकरूप झाल्यासारखे दिसणारे जैन लोक, कोणकोणत्या बाबतीत आपल्या जैनत्वाची चिह्न जपून आहेत, या विषयाचे काही मुद्दे, माझ्या २५ वर्षांच्या निरीक्षणाच्या आधारे नमूद करीत आहे. १) अहिंसेचे आहारात प्रत्यक्षीकरण : अहिंसातत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात सूक्ष्म वापर करत असताना, जैनांनी प्रथम स्वत:च्या आहारात पूर्ण अहिंसा आणली. शाकाहाराच्या अंतर्गतही प्रत्येक वनस्पतिजीवाचा सूक्ष्म विचार करून, अनेक प्रकारच्या संयम व मर्यादा सांगितल्या. आधुनिक काळातही देश-विदेशी मिशनरी वृत्तीने शाकाहार चळवळ चालू ठेवली. त्या चळवळीला सकारात्मक पाठिंबाही मिळत आहे. २) 'आपला समाज'-अशी संघभावना : सामाजिकता जपत असतानाच स्वतः अल्पसंख्य असल्यामुळे धर्माच्या समानतेच्या आधारे, छोट्यामोठ्या संघटना उभ्या करून, त्या द्वारे आपल्या आणि इतर समाजाच्या हिताची कामे करण्याची एक सर्वसाधारण प्रवृत्ती, जैन माणसामध्ये मूलत:च रुजलेली असते. धर्म आणि आचार टिकून राहण्यासाठी, अशा छोट्यामोठ्या संघटना आपोआपच कार्यरत असतात. ३) साधु-साध्वी वर्गाचे तुलनेने काटेकोर आचरण : पायी विहार, वस्त्र-पात्र मर्यादा, सचित्त सेवनाचा त्याग, रात्रिभोजनत्याग इ. अनेक प्रकारचे कडक अथवा कठोर आचरण इतर धर्मीयांच्या तुलनेत, जैन साधु-साध्वीवर्ग काटेकोरपणे करीत असलेला दिसतो. वेळोवेळी यामध्ये शिथिलता आणण्याची चर्चाही होत राहते. परंतु जैनत्व जपण्यासाठी अंतिमत: हे कडक आचरण उपयुक्तच ठरते.

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6