________________
सारख्या अनेक संज्ञा आहेत. परिभाषा जरी वेगळी असली तरी साम्यही आहे. 'शून्यवाद', 'मायावाद' या गोष्टी जैनांना मान्य नाहीत. सूत्रकाराने यात अस्तित्वातील आधारभूत तत्त्वांवर, 'साधूंनीच काय तर कोणत्याही सामान्य व्यक्तिनेही एकांगी विचार करू नये', अशा गोष्टींची यादी जोडीरूपाने दिली आहे. भ. महावीरांनी ‘इइ दिठिं न धारए', 'इति वायं न नीसरे'-अशा प्रकारे कोणती दृष्टी धारण करावी व कशाप्रकारे वाणीचा संयम ठेवावा, यावर दिलेला भर दिसून येतो.
जगातील सगळ्या भूमिती या मानवी मनाच्या संज्ञा आहेत. 'लोक-अलोक'मधील कोणाच्याही नजरेत न बसलेले 'अलोक' अस्तित्वात आहे व ही संकल्पना जैनांनीही मानली आहे. केवळ 'जीवा'लाच श्रेष्ठत्व न देता 'अजीवा'लाही तेवढेच महत्त्व देणारे जैनच होत. 'धर्म-अधर्मा'ला गती-स्थितीशील मानून आजच्या भौतिकशास्त्रातला जवळचा सिद्धांत मांडलेला आढळतो. व्यावहारिक जीवनात 'मोक्षाएवढेच' 'बंधनालाही महत्त्व दिले आहे. आयुष्यभर बंधनात राहणारी मानसिकताही खरीच आहे व त्यापलीकडचा 'मोक्ष' म्हणजे सुटका, हीही तेवढीच महत्त्वाची आहे. नैतिक दष्टिकोनाच्या संकल्पनेतुन जैनांची अठरा ‘पापस्थाने' व नऊ 'पुण्यांची' संकल्पना जगात सर्वमान्य आहे, हे मात्र दिसत नाही. उलट जे आपल्या वाट्याला आले आहे, ते प्रामाणिकपणे पार पाडणे, हा मोठा नैतिक सद्गुणच सर्वमान्य आहे. ही नीतिमूल्ये आचरणात आणताना व्यावहारिक गरजा वाढविणे म्हणजे 'आस्रव' व त्या कमी करणे म्हणजे 'संवर'च होय.
आचारश्रुत अध्ययनात ‘वाक्-संयमा'लाही खूप महत्त्व दिले आहे. येथे सापेक्षतावाद' खूप लागू पडतो. शंका उत्पन्न करणाऱ्या काही गोष्टींची विधाने करू नयेत, तर काही विधाने द्रव्य-क्षेत्र-काल-भावाप्रमाणे न लावता दैनंदिन व्यवहाराप्रमाणे लोककथन करण्याकडे महावीरांचा ओढा दिसतो. तसेच काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी सामूहिक नसून वैयक्तिक असतात. जसे - मुक्ती, मोक्ष, केवलज्ञान, अगदी एकटेपणासुद्धा.
सूत्रकृतांगातील वैचारिक उदारमतवाद, सर्व जगाकडे पाहण्याची दृष्टी या श्रुतस्कंधात आढळते. सामुदायिक प्रवचनातून दिसलेला भावनिक पावित्र्याचा मूळ गाभा कायम ठेवून, ‘काळानुसार परिवर्तन', हा जैनधर्माचा स्वभाव जाणवतो. 'आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य हे एकांगी सत्य असू शकते', हा सापेक्षतावाद मनात घर करून गेला. सत्याला पाहण्याच्या दृष्टिकोणाचे अनेक अंश दिसून आले. व्यक्त करणाऱ्या शब्दाला मर्यादा आहेत हा सापेक्षतावाद् दसऱ्या अर्थाने अनेकांतवाद म्हणजे खुले मन. सत्य हे अत्यंत व्यामिश्र आहे.
काही गोष्टी तात्कालिक असतात तर काही त्रैकालिक सत्य असतात. वचनगुप्तीचे पालन कसे महत्त्वाचे व जाहीर प्रतिक्रिया कशी घातक असू शकते, हीदेखील या अध्ययनातून मिळालेली जाणीव होय. 'असेल', 'असू शकेल' किंवा 'असेलही कदाचित्'-अशी स्वत:ला समजवण्याची ताकद मिळाली. ___अनेकांतवाद हे केवळ धर्मतत्त्व नसून ते आयुष्यात प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचे तत्त्व आहे. हाच सापेक्षतावाद, हाच अनेकांतवाद, हीच बौद्धिक उदारता व सहनशीलता माझ्यातही यावी हीच भावना !!!