________________
श्रुतस्कंध १ :
१) समय - अहिंसा सिद्धांत २) वैतालीय - वैराग्याचा उपदेश ३) उपसर्ग - संयमी जीवनात येणाऱ्या विघ्नांचे वर्णन ४) स्त्री-परिज्ञा - ब्रह्मचर्यघातक विघ्नांचे वर्णन ५) नरक - नरकातील दुःखांचे वर्णन ६) वीरस्तुती - महावीरांची स्तुती वर्णन ७) कुशील - चारित्रहीन व्यक्तीचे वर्णन ८) वीर्य - शुभाशुभ प्रयत्नांचे वर्णन ९) धर्म - धर्माचे वर्णन १०) समाधि - धर्मातील स्थिरतेचे वर्णन ११) मार्ग - संसार-बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग १२) समवसरण - क्रिया-अक्रिया-विनय-अज्ञानाचे वर्णन १३) याथातथ्य - मानवी मनाचे सुंदर वर्णन १४) ग्रंथ - ज्ञानप्राप्तीच्या मार्गाचे वर्णन १५) आदानीय - महावीरांच्या उपदेशाचे सार १६) गाथा - गद्यमय असून भिक्षूचे वर्णन.
अशा प्रकारे प्रत्येक अध्ययनाचे शीर्षक जरी वेगळे असले तरी त्यात विचारांची साखळी गुंफली आहे. विषय नजरेतून सुटू नयेत म्हणून विषयांची पुनरावृत्ती फार आहे. अनेकदा व्यापक विचार मांडले आहेत. यात एक प्रकारे 'मानसशास्त्र'ही आहे. कसे वागा, कसे वागू नका याचा भरपूर विचार मांडला आहे. उत्तम श्रावकाचे उदाहरणात्मक वर्णन नाही. पण त्याच्या अंगी कोणते गुण असावेत याचे विस्तृत वर्णन आहे.
श्रुतस्कंध २ :
प्रत्येक अध्ययन वेगळे पण पूर्ण स्वतंत्र आहे. विषयांची विविधता अनेक पैलूतून मांडली आहे. सर्व विषय अर्थपूर्ण, परिणामकारक आहेत. सर्व अध्ययनात काळाच्या पुढचे विवेचन आहे.
१) पौण्डरिक : गद्यमय-विभिन्न संप्रदायांच्या भिडूंचे वर्णन. सदाचारी, सुसंयमी पुरुषच सफल होतो असे प्रतिपादन.
२) क्रियास्थान : दरक्षणी केलेल्या वर्तनाला जैन दर्शनात किती महत्त्व आहे ते १२ क्रियांतून व १८ पापस्थानांतून दिसते.
३) आहारपरिज्ञा : वाचकाचा प्रथमदर्शनी अपेक्षाभंग होतो. कारण जैनआचारात अवाजवी महत्त्वाचा असलेला आहाराचा त्याग' कोठेही सांगितला नाही. प्रत्याख्यान शब्दच नाही. संथारा नाही. आध्यात्मिक उपदेश देणे नाही. जीव एकमेकांवर उपकार करतात असेही नाही. 'जीवो जीवस्य जीवनम्' हे ब्रीदवाक्य. त्यांना विदित असलेले जे जे जीवशास्त्रीय आणि वनस्पतिशास्त्रीय ज्ञान त्यावेळी होते ते आपल्यापर्यंत पोहोचवले. 'पहा' व 'जाणा' हेच सांगितले.
४) प्रत्याख्यानक्रिया : त्यागाचे, नियमांचे स्वरूप व वर्णन. हा पूर्ण अध्याय असला तरी त्याचे परिशिष्ट पुढे 'नालंदा' मधूनही केले आहे. अनुकूलता असते त्यावेळी संयमाचे महत्त्व. अंत:प्रेरणेला लगाम घाला. १८ पापस्थानांचे प्रत्याख्यान करा.
५) आचारश्रुत : खास सांगितलेला जो साधुविषयक रूढाचार आहे, त्याच्याबद्दल एकही वाक्य नाही. जसे - पंचमहाव्रत, गुप्ती, समिती, दशविधधर्म इ. हा अध्याय वाक्समितीवर आधारित आहे.
६) आर्द्रकीय : महावीर किती व्यवहारवादी होते त्याचा हा अध्याय द्योतक आहे. तो प्रश्नोत्तरातून उलगडत जातो. शंका व त्याला दिलेले उत्तर यात आहे. शंका-समाधान जरी असले तरी काही ठिकाणी दिलेली उत्तरे पटत नाहीत.
********** (१२) सूत्रकृतांगाच्या द्वितीय श्रुतस्कंधाचे सार
शकुंतला चोरडिया सूत्रकृतांगच्या अथांग ज्ञानसागरात डुबकी मारली सात अध्ययनातून सात विचारांची पाने उलगडली