________________
पैशांचा व्यवहार
असे कुणी शिकवणारच नाही ना? नियमात राहून अनीति करायची, हे तर फार मोठे कार्य आहे.
जो अनीति सुद्धा नियमात राहून करतो त्याचा मोक्ष होईल, पण जो अनीति करीत नाही, जो लाच घेत नाही त्याचा मोक्ष कसा होणार? कारण जो लाच घेत नाही, त्याला 'मी लाच घेत नाही' याची नशा चढलेली असते. देव सुद्धा त्याला हाकलून देतो की, 'जा, तुझे तोंड वाईट दिसत आहे.' पण याचा अर्थ असा नाही की आम्ही लाच घ्या असे म्हणतो, पण जर तुला अनीतिच करणे भाग असेल, तर तू पद्धतशीरपणे (नियमाने) कर. नियम कर की मी लाच म्हणून पाचशे रुपयेच घेईन. पाचशेच्यावर पाच हजार जरी दिले, तरी ते सर्व परत करीन. घरखर्चामध्ये कमी पडत असतील तेवढीच, पाचशेचीच लाच घ्यायची. बाकी, असली जोखीम तर आम्हीच घेतो. कारण अशा काळात लोक लाच घेणार नाही तर काय करणार बिचारे? तेलातूपाचे भाव किती वाढले आहेत? साखरेचा दर किती वाढला आहे ? आता मुलांची फी दिल्याशिवाय चालेल का? बघा ना! तेलाचे भाव तर काही सतरा रुपये म्हणतात ना?
प्रश्नकर्ता : होय.
दादाश्री : आता जे व्यापारी काळाबाजार करतात त्यांचा निर्वाह तर होतो पण नोकरी करणाऱ्यांची बाजू घेणारा कुणी राहिलाच नाही ना? म्हणून आम्ही सांगतो की लाच घ्यावी लागली तर ती सुद्धा नियम सांभाळून घे. तर तो नियम तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. लाच नडत नाही, अनियम नडतो.
प्रश्नकर्ता : अनीति करणे हे तर चुकीचेच म्हटले जाईल ना?
दादाश्री : तसे पाहिले तर चुकीचेच म्हटले जाते! परंतु देवाच्या घरी तर वेगळ्याच प्रकारची व्याख्या आहे. देवाकडे तर नीति किंवा अनीति याचे भांडणच नाही. तिथे तर अहंकाराची अडचण आहे. नीतिपालन करणाऱ्यांचा अहंकार फार मोठा असतो. त्यांना तर दारु न पिता नशा चढलेली असते.