________________
पैशांचा व्यवहार
नाही. प्रामाणिकपणा नसेल तर भक्ति करण्याचा काही अर्थ नाही. प्रामाणिकपणा जोडीला हवाच. प्रामाणिकपणामुळे मनुष्य पुन्हा मनुष्याच्या जन्माला येतो. आणि जी माणसे भेसळ करतात, बिनहक्काचे हिसकावून घेतात, बिनहक्काचा भोग करतात, ती सर्व इथून दोन पायातून चार पायात जातात. यात कोणी तसूभरही फरक करू शकत नाही. कारण बिनहक्काचे उपभोगणे हा त्याचा स्वभावच बनला आहे. म्हणून तिथे जनावरात गेला की मग भोग घेतो. तिथे तर कुणी कुणाची बायकोच नाही ना! सगळ्या बायका स्वत:च्याच की! इथे मनुष्यात तर लोक विवाहित असतात, म्हणून कुणाच्या पत्नीवर कुदृष्टी करू नकोस. पण ही तर सवयच होऊन गेलेली असते, स्वभाव झालेला असतो, त्यामुळेच तर जनावरात जातो. तिथे एक जन्म, दोन जन्म भोग घेऊन झाले की मग शहाणा होतो. तर हे सर्व जन्म त्याला सरळ करतात. सरळ झाला की मग इथे येतो. पुन्हा वाकड्यात शिरला, तर पुन्हा तिथे पाठवून सरळ केले जाते. म्हणजे असे सरळ होत होत शेवटी तो मोक्षासाठी लायक बनतो. जोपर्यंत वाकडा चालतो तोपर्यंत मोक्ष होत नाही.
नीतिमय पैसा आणला तर त्यास हरकत नाही. पण अनीतिमय पैसा आणला तर समजा आपल्याच पायावर कु-हाड मारली आणि तिरडी निघेल तेव्हा ते पैसे इथेच पडून राहतील. ते मग जातात निसर्गाच्या जप्तीत. आणि त्याने इथे जो गुंता निर्माण केला, तो परत त्याला भोगावा लागणार.
देवाचे भजन केले नाही पण नीतिपूर्वक राहिला तरी पुष्कळ झाले. देवाची भक्ति करतो पण नीतिपूर्वक राहत नाही त्याला काही अर्थच नाही. ते मीनिंगलेस आहे. पण तरी आपण तसे बोलू नये, नाहीतर तो परत देवाला सोडून अनीतिच वाढवत राहील. तात्पर्य, नीति सोड़ नका. त्याचे फळ चांगले येईल
जगात सुख एका जागीच आहे. जिथे संपूर्ण नीति असेल. प्रत्येक व्यवहारात संपूर्ण नीति असेल, त्या जागी सुख असेल. आणि दुसरे म्हणजे जो समाजसेवक असेल, जो स्वतःसाठी नव्हे, तर परक्यासाठी जीवन जगत असेल, तर त्याला फार सुख असते, पण ते भौतिक सुख आहे. ते मूर्छचे सुख म्हणायचे.