________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : आम्ही दररोज बोलतो, की हे चुकीचे आहे, असे नव्हते बोलायचे, पण तरी असे का होते? करायचे नसेल तरी का केले जाते?
दादाश्री : अति शहाणपणा आत भरुन आणलेला आहे म्हणून. आम्ही कधीही कोणाला काहीही सांगितले नाही की असे करू नका. जर सांगितले गेले तर तेव्हाच सावध होतो.
प्रश्नकर्ता : आम्ही खोटे बोललो असू, ते सुद्धा कर्म बांधले असेच म्हटले जाईल ना?
दादाश्री : अर्थात्च! पण खोटे बोलले असाल, त्याहीपेक्षा खोटे बोलण्याचे जे भाव करता ना, ते त्याहूनही अधिक मोठे कर्म म्हटले जाते. खोटे बोलणे हे तर म्हणा कर्मफळ आहे. खोटे बोलण्याचे भावच, खोटे बोलण्याचा आपला निश्चय, त्यामुळेच कर्मबंधन होत असते. आले का तुमच्या लक्षात? हे वाक्य काही मदत करेल का तुम्हाला? कसे मदत करेल?
प्रश्नकर्ता : खोटे बोलणे बंद करायला पाहिजे.
दादाश्री : नाही. खोटे बोलण्याचा अभिप्रायच सोडून द्यायला पाहिजे आणि खोटे बोलले गेले तर पश्चाताप केला पाहिजे की 'काय करू? असे खोटे बोलायला नको'. तरी खोटे बोलणे बंद होणार नाही. पण तो अभिप्राय मात्र बंद होईल. 'आजपासून खोटे बोलणार नाही, खोटे बोलणे हे महापाप आहे, महा दुःखदायी आहे आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे.' असा जर तुमचा अभिप्राय झाला, तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाईल. आणि या पूर्वी जोपर्यंत हे भाव बंद केले नव्हते, तोपर्यंतच्या त्याच्या ज्या 'रिअॅक्शन' (प्रतिक्रिया) आहेत, तेवढ्या बाकी राहतील. तेवढा हिशोब तुमच्या समोर येईल. त्यामुळे मग तुम्हाला तेवढे खोटे अनिवार्यपणे बोलावे लागेल, तेव्हा तुम्ही त्याचा पश्चाताप करा. आता जरी पश्चाताप केला, तरीही तुम्ही जे खोटे बोललात, त्या कर्मफळाचेही फळ तर येणारच आणि मग तेही भोगावे तर लागेलच.