________________
वाणी, व्यवहारात...
भांडण करू नये. कारण ते बंधनकर्ता आहेत, म्हणूनच समाधान आणले पाहिजे.
एका भगिनीस तर मी विचारले, 'नवऱ्यासोबत वादविवाद-भांडणे वगैरे होतात का? क्लेश होतो का?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही, कधीच नाही.' मी विचारले, 'वर्षभरात एकदाही भांडण झाले नाही?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही.' मी तर हे ऐकून आश्चर्यचकीतच झालो की हिंदुस्तानात अशीही घरं आहेत! पण ती ताई मात्र अशी होती. नंतर मी पुढे विचारले की, 'काहीतरी तर होत असेल ना. नवरा आहे म्हटल्यावर काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही.' तेव्हा ती म्हणाली, 'नाही, कधीतरी टोमणे मारतात.' गाढवाला काठीने मारायचे आणि बायकांना टोमण्यांनी मारायचे. स्त्रिला काठीने मारु शकत नाही पण टोमण्यांनी मारतात. टोमणे तुम्ही पाहिलेत ना? टोमणे मारतात ते! तेव्हा मी म्हणालो. 'तो टोमणे मारतो, तेव्हा तुम्ही काय करता?' त्यावर ती ताई म्हणाली, तेव्हा, 'मी त्यांना सांगते की तुम्ही आणि मी, आपण दोघे कर्माच्या उदयामुळे एकत्र आलो आहोत, कर्माच्या उदयाने आपले लग्न झाले, तुमचे कर्म तुम्हाला भोगायचे आणि माझे कर्म मला भोगायाचे. मी म्हणालो, 'धन्य आहात ताई तुम्ही!' आपल्या हिंदुस्तानात अशा आर्य स्त्रिया अजूनही आहेत. यांना सती म्हणतात.
हे सर्व एकत्र कशामुळे आले? आपल्याला आवडत नसतानाही का एकत्र राहावे लागते? तर हे सर्व कर्म करवून घेते. पुरुषांना आवडत नसेल तरी जाणार कुठे? पण त्यांनी समजून जावे की, 'माझ्या कर्मांचा उदय आहे.' असे मानून शांतता राखली पाहिजे. पत्नीचा दोष काढू नये. दोष काढून करायचे तरी काय? दोष काढून कुणी सुखी झाला का? कुणी सुखी होऊ शकतो का?
आणि मन ओरडते की 'कितीतरी बोलून गेली, किती सर्व झाले,' तेव्हा म्हणावे, ‘झोपून जा ना, हे घाव तर लगेच भरुन जातील' असे म्हणावे. आणि घाव भरतातही लगेचच.... हो ना, खांदे थोपटून द्यावे म्हणजे झोपेल.
प्रश्नकर्ता : वाणीचा अपव्यय आणि दुर्व्यय हे समजवा.