________________
८८
अहिंसा
तुम्ही म्हणाल की जीवांना वाचवण्यासारखे आहे. नंतर वाचतील किंवा वाचणारही नाहीत त्याचे जोखीमदार तुम्ही नाही. तुम्ही म्हणाल की, या जीवांना वाचवण्यासारखे आहे, तुम्हाला फक्त असा भावच करायचा आहे. नंतर हिंसा झालीच तर त्याचे जोखीमदार तुम्ही नाही! हिंसा झाली त्याचा पश्चाताप, त्याचे प्रतिक्रमण करायचे, म्हणजे सर्व जोखीमदार संपली.
___आता अशा सर्व सूक्ष्म गोष्टी मनुष्याला कशा समजतील? त्याची काय क्षमता? एवढे दर्शन तो कुठून आणेल? आणि माझ्या या सर्व गोष्टी तो तिथे घेऊन गेला तर सगळी गैरसमजच होईल. आम्ही पब्लिकसमोर असे सांगत नाही. पब्लिकला सांगू शकत नाही ना! समजतयं का तुम्हाला?
भावअहिंसा म्हणजे मला कोणत्याही जीवाला मारायचे आहे असा भाव कधीच होता कामा नये आणि मला कोणत्याही जीवाला दुःख द्यायचे आहे, असा भाव सुद्धा उत्पन्न व्हायला नको. मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो, अशी फक्त भावनाच करायची आहे, क्रिया नाही. भावनाच करायची आहे. क्रियेत तर तू कसे काय वाचवशील? अरे, फक्त श्वासोच्छवासातच लाखो जीव मरत असतात. आणि इथे तर जीवांचे थवे आदळतात, आदळल्यानेच मरून जातात. कारण आपण तर त्यांना मोठया दगडासारखे वाटतो. त्यांना असेच वाटते की हा दगड आपटला.
सर्वात मोठी आत्महिंसा, कषाय जिथे क्रोध-मान-माया-लोभ (कषाय) आहेत ती आत्महिंसा आहे आणि ती दुसरी तर जिवाणूंची हिंसा आहे. भावहिंसेचा अर्थ काय? तर तुझी स्वतःची जी हिंसा होत असते, हे क्रोध-मान-माया-लोभ, हे तुला स्वत:ला बंधनात टाकतात, म्हणून स्वत:वर दया कर. प्रथम स्वतःची भावअहिंसा आणि नंतर दुसऱ्यांची भावअहिंसा, असे सांगितले आहे.