________________
७४
अहिंसा
दादाश्री : यात तर वाचवणाऱ्याचा जबरदस्त गुन्हा आहे. तो फक्त अहंकारच करतो. भगवंताने तर इतकेच म्हटले होते की तुम्ही तुमच्या आत्म्याची दया पाळा. बस, संपूर्ण शास्त्रात इतकेच म्हटले आहे की भावदया पाळा. दुसऱ्या कुठल्या दयेसाठी तुम्हाला सांगितलेले नाही. आणि विनाकारण हातात घ्याल तर तो गुन्हा होईल.
तो आहे वाचवण्याचा अहंकार हे तर सगळे असेच समजतात की, आपण वाचवतो म्हणून हे जीवजंतु वाचतात. आपले लोक तर कसे आहेत? घरी आईला शिव्या देत असेल आणि बाहेर वाचवण्यासाठी निघालेला असतो!
या लोकांना तर समुद्रात पाठवायला पाहिजे. समुद्रात तर भाजीपाला, धान्य वगैरे सर्व उगवत असेल, नाही का? मासे तेच खात असतील ना? नाहीतर आपण इथून धान्य पाठवत असू, नाही? का फुटाणे वगैरे टाकून खाऊ घालत नाही? मग त्यांचा आहार काय असेल? एवढे-एवढे, लहान-लहान मासे असतात, त्यांना मोठे मासे गिळून टाकतात. मोठया माशांना पुन्हा त्यांच्यापेक्षा मोठे मासे गिळतात. असे निरंतर एकमेकांना गिळतच राहतात. आणि एका बाजूने नवीन माल तयार होतच राहतो! आता जर तिथे अक्क्लवाल्याला बसवले तर त्याची काय अवस्था होईल?
जगात कशी मान्यता चालत आहे? 'आम्ही वाचवत आहोत' असे म्हणतात आणि खाटिकावर द्वेष करतात. त्या खाटिकाला आपण विचारले की, 'तू असा नालायक धंदा करतोस?' तेव्हा तो म्हणेल, 'का साहेब, माझ्या धंद्याला तुम्ही नालायक का म्हणता? माझा धंदा तर बाप-दादांच्या पिढ्यांपासून चालत आलेला आहे. ही तर आमची परंपरा आहे.' तो मग आपल्याला असे म्हणेल. म्हणजे ही वंश परंपरा म्हटली जाईल. आपण त्याला काही सांगायला गेलो तर त्याला असे वाटेल की 'ही बिनअकलेची माणसं यांना काही समजतच नाही.'