________________
७२
अहिंसा
अभयदान कोणत्या जीवांसाठी ?
प्रश्नकर्ता : मी असे सांगत आहे की जीवांना अभयदान मिळावे म्हणून दहा वर्षांपूर्वीच आम्ही कंदमूळ न खाण्याची प्रतिज्ञा घेतली होती.
दादाश्री : अभयदान तर, जो जीव हालू- चालू शकत असेल, जो जीव घाबरत असेल, भीतीचा अनुभव करू शकत असेल, अशा जीवाला अभयदान द्यायचे आहे. ज्यांना भय समजतच नाही त्यांना अभयदान कसे काय देणार ?
अभयदान म्हणजे ज्या जीवांना भीती वाटत असेल, लहान मुंगीला सुद्धा आपण हात लावला तर तिला भीती वाटते. त्यांना अभयदान द्या. पण हे गव्हाचे दाणे, बाजरीचे दाणे यांना भीती वाटत नाही. त्यांना काय निर्भय करायचे ? भय समजतच नाही, मग त्यांना अभयदान कसे द्यायचे ?
प्रश्नकर्ता : एकदम करेक्ट गोष्ट आहे.
दादाश्री : म्हणजे हे सर्व समजल्याशिवायच चालले आहे. जे चोपडायचे (औषध) आहे ते पिऊन टाकतात आणि नंतर म्हणतील, ‘महावीर भगवंताचा औषध प्यायला आणि मरून गेला!' 'अरे, महावीर भगवंतांना कशाला फजित करतोस.' परंतु आता तर हाच व्यापार चालू आहे. चोपडण्याचे औषध पितात आणि मग म्हणतील धर्म खोटा आहे. अरे मूर्खा, धर्म खोटा असतो का कधी? पूर्वी काय तू चोपडण्याचे औषध पीत होतास ?
प्रश्नकर्ता : यापूर्वी तर काही माहीतच नव्हते.
दादाश्री : हे चोपडायचे आहे की प्यायचे आहे तेच माहीत नव्हते! ज्या जीवांना भय वाटते त्यांना त्रसकाय जीव म्हणतात. म्हणजे ही भयसंज्ञा उत्पन्न झाली आहे त्यांच्यासाठी भगवंताने सांगितलेले. दुसऱ्यांसाठी तर असेच सांगितले आहे की, विनाकारण पाणी सांडू नका.