________________
अहिंसा
म्हणून जर तुम्हाला या जगापासून, या दु:खांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला जरी कोणी दुःख दिले तरी पण तुम्ही त्यांना दु:ख देऊ नका. तुम्ही त्यांना थोडे जरी दुःख दिले तरी पुढील जन्मी ती नागीण बनून तुम्हाला चावेल, हजारो प्रकारे वैर वसूल केल्याशिवाय राहणार नाही. या जगात अजिबात वैर वाढवण्यासारखे नाही. नंतर ही जी दु:खं येतात, ती कोणाला तरी दुःख दिले होते, त्यामुळेच ही सर्व दुःखं येतात ना! नाही तर दुःख नसतेच या जगात.
प्रश्नकर्ता : म्हणजे, हे जीवन एक शाश्वत संघर्षच आहे.
दादाश्री : हो, पण जर तुम्ही अहिंसक वातावरण तयार कराल तर साप देखील तुम्हाला चावणार नाही. समोरच्याने तुमच्यावर साप टाकले तरीही तो तुम्हाला चावणार नाही, पळून जाईल बिचारा. वाघ सुद्धा तुमच्या वाट्याला जाणार नाही. या अहिंसेत एवढे बळ आहे की विचारूच नका! अहिंसेसारखे कोणतेच बळ नाही आणि हिंसेसारखी निर्बळता नाही. ही सर्व दुःखं फक्त हिंसेमुळेच आहेत, निव्वळ हिंसेमुळेच दुःख आहे.
बाकी, या जगात तुम्हाला चावू शकेल असा कोणी नाहीच. आणि जर कोणी चावू शकतो तर तो तुमचाच हिशोब आहे. म्हणून हिशोब चुकता करून टाका. आणि चावल्यानंतर आत तुम्ही जो भाव करता की 'या कुत्र्यांना तर मारूनच टाकले पाहिजे, असे करायला पाहिजे, तसे करायला पाहिजे.' तो मग तुम्ही नवीन हिशोब चालू केला. कुठल्याही परिस्थितीत समता ठेवून समाधान आणा, आत सहजही विषमता नसावी!
प्रश्नकर्ता : परंतु अशा परिस्थितीत तर जागृती-समता राहत नाही.
दादाश्री : हा संसार पार करणे खूप कठीण आहे, म्हणून हे अक्रम विज्ञान देत आहोत.