________________
अहिंसा
दादाश्री : हा सर्व आहाराचाच परिणाम आहे. हे जे अन्न खातो, ते पोटात गेल्यानंतर त्याची ब्रान्डी तयार होते आणि ब्रान्डीमुळे दिवसभर बेशुध्दपणे तन्मयाकार राहतो. हा जो सात्विक आहार आहे ना, त्याची सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात ब्रान्डी होत असते. आणि ती बाटलीतली ब्रान्डी पितो तेव्हा तर शुद्धीच राहत नाही. तसेच हे जे अन्न पोटात जाते, त्याची सुद्धा ब्रान्डीच होऊन जाते. हे लाडू आहेत, हिवाळीपाक म्हणतात ना, ते सर्व काही सात्विक नव्हे! सात्विक म्हणजे खूप हलके जेवण आणि लाडू तर नशा वाढवणारे. पण लोक आपल्या आवडीप्रमाणे स्वीकार करतात, सोयीस्कर करून घेतात.
प्रश्नकर्ता : या मांसाहाराचा आध्यात्मिक विचारात काही परिणाम होतो का?
दादाश्री : नक्कीच. मांसाहार हा स्थूल आहार आहे, म्हणून आध्यात्मिक बुद्धी उत्पन्न होत नाही. आध्यात्म्यात जायचे असेल तर लाइट फूड-हलके जेवण असावे की ज्याच्यामुळे नशा चढणार नाही आणि जागृती वाढेल. बाकी, या लोकांना जागृती आहेच कुठे?
ते फॉरेनचे सायन्टिस्ट आपली गोष्ट समजू शकत नाहीत. ते सायन्टिस्ट म्हणतात, 'ओहो! ही तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आम्ही असे मानू शकत नाहीत. मी म्हणालो, 'अजून तर पुष्कळ वेळ लागेल. पुष्कळ कोंबडया खाल्या आहेत म्हणून वेळ लागेल. त्यासाठी तर वरण-भात लागेल. प्यॉर व्हेजिटेरियनची आवश्यकता आहे. व्हेजिटेरियन (शाकाहारी) अन्नाचे आवरण पातळ असते, म्हणून ते ज्ञानाला समजू शकतात, सर्व आरपार पाहू शकतात आणि त्या मांसाहार करणाऱ्यांचे आवरण जाड असते.
मांसाहारामुळे नरकगती? प्रश्नकर्ता : असे म्हटले जाते की मांसाहार केल्याने नरकगती जावे लागते.