________________
अहिंसा
मांसाहारी लोकांना काही अडथळा येऊ शकतो का ? याविषयी आपले काय मंतव्य आहे ?
५७
दादाश्री : असे आहे की, मांसाहारी कसा असला पाहिजे ? त्याच्या आईच्या दुधात मांसाहाराचे दूध असले पाहिजे. अशा मांसाहारीला भगवंताच्या भक्तिसाठी हरकत नाही. त्याच्या आईचे दूध मांसाहारी नसेल आणि नंतर तो मांसाहारी झाला तर त्यास हरकत आहे. बाकी, भक्तिसाठी शाकाहारी आणि मांसाहारीत काहीच हरकत नाही.
प्रश्नकर्ता : तर मग शुद्ध आणि सात्विक आहाराशिवाय भक्ती होऊ शकते की नाही होऊ शकत ?
दादाश्री : नाही होऊ शकत. पण आता या काळात तर काय करु शकतो ? शुद्ध सात्विक आहार आपल्याला प्राप्त व्हावा किंवा ते असणे हे खूप कठीण आहे आणि अशा कलियुगात मनुष्य घसरणार नाही, कलियुगाचा प्रभाव त्याच्यावर पडणार नाही अशी माणसे फार कमी असतात. नाहीतर त्यांना तसे मित्र भेटतात किंवा असे कोणी भेटतात की जे त्याला चुकीच्या मार्गी लावतात. त्यांच्यात कुसंग शिरतो.
प्रश्नकर्ता : अजाणतेपणी अघटित आहार घेतला गेला असेल तर त्याचा काही परिणाम होतो का ?
दादाश्री : सगळ्यांचे अजाणतेपणीच होत राहिले आहे. तरीही त्याचा परिणाम होतो. जर चुकून आपला हात विस्तवावर पडला तर ? लहान मुलासही विस्तव भाजत नाही का ? लहान मुले सुद्धा भाजतात. असे हे जग अजाणतेपणी केलेल्या किंवा जाणतेपणी केलेल्या, सर्वांना सारखेच फळ देते. फक्त भोगण्याची रीत वेगळी आहे. अजाणतेपणी करणाऱ्याला अजाणतेपणी भोगावे लागते आणि जाणतेपणी करणाऱ्याला जाणून भोगावे लागते. इतकाच फरक आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे अन्नाचा परिणाम मनावर पडतो, हे पण निश्चित आहे ?