________________
३२
अहिंसा
दादाश्री : अध्यात्म्यात रुची ठेवत असतील आणि हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर हिंसेचे अनुमोदन केले असे म्हटले जाईल. म्हणून कोणतेही अध्यात्म असो, पण हिंसेला थांबवण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
प्रश्नकर्ता : अशा संयोगात मोठ्या द्रव्यहिंसेचे निवारण का सुचत नसावे?
दादाश्री : द्रव्यहिंसेचे निवारण अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण दुसरे प्रयत्न करावे, व्यवस्थितपणे सगळ्यांनी एकत्र येऊन मंडळ उभे करावे आणि गर्व्हमेंटकडेही आपण निवडलेल्या माणसांना पाठवले तर त्याचाही भरपूर फायदा होतो. सगळ्यांनी भावना करण्याची गरज आहे, मजबूत भावना करण्याची गरज आहे, प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
प्रश्नकर्ता : पण दादा, शेवटी तर हा हिशोबच आहे ना?
दादाश्री : होय, हिशोबच आहे. पण सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर हिशोब आहे असे म्हटले पाहिजे. आधीच हिशोब म्हटले तर सर्व बिघडेल. आपल्या गावात भोंदूबाबा आले असतील आणि ते मुलांना पळवून नेत असतील तेव्हाही आपण म्हणतो ना की, यांना पकडा, यांना थांबवा! म्हणजे जसे स्वतःच्या मुलाला कोणी पळवून नेले तर आपल्याला किती दुःख होते? तसेच या गायी-म्हशी कापल्या जातात त्यासाठी मनात खूप दुःख वाटले पाहिजे. आणि त्याचा विरोध केला पाहिजे. नाही तर ते काम सफळ होणारच नाही ना! गप्प बसून राहण्याची गरजच नाही. त्यास कर्माचा उदय मानता पण देव सुद्धा असे मानत नव्हते. देव सुद्धा विरोध प्रर्दशित करत होते, म्हणून आपणही विरोध प्रर्दशित केला पाहिजे, एकता निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्या विरोधात राहिले पाहिजे. यात कोणी हिंसेचा विरोधी नाही, परंतु हा तर अहिंसक भाव आहे!