________________
अहिंसा
१०५
दादाश्री : हे पाप तर, हे जग निव्वळ पापमयच आहे. जेव्हा या देहाचा मालक नसेल तेव्हाच निष्पापी होईल, नाही तर जोपर्यंत या देहाचा मालक आहे तोपर्यंत सर्व पापच आहे.
आपण श्वास घेतो तेव्हा कित्येक जीव मरतात आणि श्वास सोडतो तेव्हाही कित्येक जीव मरतात. आपण असेच फक्त चालतो ना, तेव्हा सुद्धा कित्येक जीवांना आपला धक्का लागत राहतो आणि ते मरत राहतात. आपण फक्त हात खाली-वर केला तरीही कित्येक जीव मरतात. तसे ते जीव आपल्याला दिसत नाहीत तरीही जीव मरत राहतात.
म्हणजे हे सर्व पापच आहे. पण हा देह म्हणजे मी नाही असे जेव्हा भान होईल, जेव्हा देहाचा मालकीपणा नसेल तेव्हा स्वतः निष्पाप होईल. मी सव्वीस वर्षांपासून या देहाचा मालक नाही. या मनाचा मालक नाही, वाणीचा मालक नाही. मालकीभावाचे दस्तावेजच मी फाडून टाकले आहेत, म्हणजे मग त्याची जबाबदारीच नाही ना! अर्थात जिथे मालकीभाव आहे तिथे गुन्हा लागू होतो. मालकीभाव नाही तिथे गुन्हा नाही. म्हणून आम्ही तर संपूर्ण अहिंसक म्हटले जातो. कारण आत्म्यातच राहतो. होम डिपाटमेंटमध्येच राहतो आणि फॅारेनमध्ये हात घालतच नाही. म्हणून पूर्ण हिंसेच्या समुद्रात संपूर्ण अहिंसक आहोत.
प्रश्नकर्ता : हे 'ज्ञान' घेतल्यानंतर अहिंसक होतात का?
दादाश्री : हे ज्ञान तर मी तुम्हाला दिले आहे, तुम्हाला पुरुष बनवले आहे. आता आमची आज्ञा पाळल्याने तुम्हाला हिंसा स्पर्शत नाही. तुम्ही पुरुषार्थ केला तर तो तुमचा. पुरुषार्थ कराल तर पुरुषोत्तम व्हाल, नाही तर पुरुष तर तुम्ही आहातच. म्हणजे आमची आज्ञा पाळणे हा पुरुषार्थ आहे. अहिंसकाला हिंसा कशी शिवेले?
प्रश्नकर्ता : नऊ कलम जो अनुभवास आणेल, त्याला हिंसा नडतच नाही.