________________
क्लेश रहित जीवन
ह्या मुलाला मी मारले तरीही तो रडत नाही, उलट तो हसतो, त्याचे काय कारण? आणि तुम्ही त्याला फक्त एक टपली जरी मारली तरी तो रडायला लागेल, याचे काय कारण? त्याला लागले म्हणून? नाही त्याला लागल्याचे दुःख नाही, त्याचा अपमान केला हे त्याचे दुःख आहे.
यास आपण दुःख म्हणूच कसे शकतो? दुःख तर कशास म्हटले जाईल की, खायला मिळत नाही, संडासला जायला मिळत नाही, लघवीला जाता येत नाही. अशा गोष्टींना दुःख म्हणता येईल. आता तर सरकारने घरोघरी संडास बांधून दिले आहेत, पूर्वी तर लोकांना लोटा घेऊन जंगलात जावे लागत होते. आता तर बेडरूममधून निघालात की लगेच संडास! पूर्वी श्रीमंत ठाकूरानांही नव्हत्या इतक्या सुखसोयी आजच्या सर्व सामान्य लोकांना उपलब्ध आहेत. पूर्वी ठाकूराला देखील संडासला जाण्यासाठी लोटा घेऊन जावे लागत असे! त्याने जुलाबाचे औषध घेतले असेल तर त्यालाही पळावे लागत! आता असे नाही, तरी लोक असे झाले, नी तसे झाले ,असे ओरडत असतात. अरे पण काय झाले ते तर बोल. हा पडला, तो पडला, काय पडले? विनाकारण कशाला आरडओरड करतात?
ही जी दु:खं आहेत ती सर्व चुकीच्या समजुतीमुळे आहे. जर योग्य समज फीट केली तर दुःखासारखे काहीही नाही. जर तुमच्या पायाला काही लागले, काही इजा झाली असेल तर तपास करा की माझ्यासारखे दुःख लोकांना आहे की नाही? इस्पितळात जाऊन पाहिले तर समजेल की ओहोहो! खरे दुःख तर इथेच आहेत. माझ्या पायाला किरकोळ इजा झाली आणि मी विनाकारण दुःख मानून घेत आहे. अशी तपासणी करायलाच हवी ना? तपास केल्याशिवाय दुःख मानले तर काय होईल? तुमच्यासारख्या पुण्यवंत लोकांना दुःख असूच कसे शकते? तुम्ही पुण्यवंतांच्या घरी जन्मला आला आहात. थोड्याशा मेहनतीनेच तुम्हाला खायला-प्यायला मिळून जाते.