________________
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
'देही नित्यं अवध्योऽयं देहे सर्वस्य' अशी ओळ तोंडपाठ असणे निराळे आणि देहातील अशा अवध्य जीवाची जाणीव आणि सिद्धी प्राप्त करून घेऊन त्या बरहुकूम चारित्र्य ठेवणे अथवा ती सिद्धी अजूनही अप्राप्त असल्यास आमरणांत त्याची साधना ठेवणे निराळे. दुसरे जैन मार्गातील खडतर व्रत आहे.
शांतीच्या सागरातच हे शक्य आहे नाही तरी आपण दररोज मरणाऱ्यांना पाहातच आहोत. कोणातरी लहान मोठ्या माणसाचा मरणवृत्तान्त रोज आपल्या दैनिकातून झळकल्याशिवाय रहात नाही. (अनिवार्य अशा मरणाला निमूटपणे तोंड देणे निराळे आणि अनेक दशके खडतर तपस्येत घालवून धर्मसाधनेला आता हा देह अपुरा पडणार हे जाणून त्याच्याशी असलेला स्नेहसंबंध निष्कामपणे सोडवून घेणे हे निराळे.) या साधुत्वाची कसोटी फार निराळी आहे आणि ते प्रत्यक्ष पाहण्यास मिळणे ही फार दुर्लभ गोष्ट आहे. पूज्य श्री शांतिसागर महाराज यांचा निर्याणकाळ हा एक अद्भुत प्रसंगच म्हणावा लागेल. शरिरावर. प्राणांवर, मनावर. संयमसिद्धी कितपत अस शकते याचे प्रात्यक्षिकच त्यांनी आपल्या अंत्यकाळच्या ३५ दिवसांत दाखविले. गोष्ट अशी असते की, कोणतीही गोष्ट एकदा करायची ठरविल्यावर ती होता होईल तो चट्कन् व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते. आणि त्यातूनही अंत्यकालासारखी किचकट गोष्ट चुटकीसरशी झाल्यास बरी असे वाटणे साहजिक आहे. मरण येत नाही म्हणून खेद नाही व मरणमहोत्सवाचा हर्षही नाही अशा उच्च उदासीनतेने इतर कारभार राखूनही ३५ दिवस प्रतीक्षा करणे हे एवढे चारित्र्य मोठे बिकट आहे आणि सिद्धीचे लक्षण आहे. सल्लेखनेचे आणि समाधिमरणाचे वर्णन आपण ग्रंथांतरी वाचतोच, परंतु मरणकाळी शांती टिकविणे म्हणजे काय याचा खरा अर्थ असला एखादा प्रसंग पाहीतोपर्यंत खरा लक्षात येत नाही. आहार आणि पाणी त्याग केल्यावरही लोकांची दर्शनेच्छा सफल करण्याकरिता आयास न मानता जा ये करणे; इतर वेळी नियमित कार्य करणे, सभोवती रागद्वेषाचा गोंगाट होत असतानाही स्तब्ध शांतीत राहणे हे शांति-सागरातच साध्य आहे. एवढ्या तेवढ्या टिपूसभर शांतीला ते असाध्य झाले असते. गांभीर्याला सागराची उपमा देतात, आणि श्री शांतिसागर महाराज यांच्या ठिकाणी शांतिगांभीर्याचा काही वेगळाच विलास जवळ जवळ महिनाभर पाहावयास मिळाला. अशामुळे जुन्या शास्त्रवचनांना काही नवीन अर्थ प्राप्त होतो आणि देहात राहून मरणाला न जुमानणारी, जणु काही मरण आपल्या घरचे नव्हेच अशा तटस्थतने वागणारी ही वृत्ती जातिवंत आणि जिवंत वस्तू आहे, अशी सोदाहरण खात्री दशकानुदशके टिकून राहते. प्राणोत्क्रमणाच्या वेळी जीव स्थिर नसलेला माणूस दैहिक ताटातट सहन करू शकणार नाही. अशा या स्थिर प्रज्ञेतून जीवाची जीवकळा अनुभवास येते, आणि जिंकणारी वस्तु जीव आहे आणि तो अमृत आहे हे प्रत्ययास येते. म्हणून अशा या जीवाच्या अमर भावनेला, वीर भावनेला, शांत भावनेला अनंत प्रणाम असोत.
[सन्मति : आचार्य श्री विशेषांकावरून]
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org