________________
१६
रूपिणी.
यातनांची तुला कल्पना नाही ? कां, हा सारा प्रकार तुला खोटा वाटतो ? थांब ! या प्रकारांत कितपत तथ्य आहे हे जर तुला पहावयाचे असेल तर क्षणभर डोळे झांकून स्थिर मनाने रहा, आणि । तुला काय दिसतें तें सांग." ___ रूपिणीचें मन त्या महात्म्याच्या भाषणाने इतकें वेधून गेलें होतें, की, तिला ते स्थिर करण्याचा बिलकुल प्रयत्नच करावा लागला नाही; ते आपोआपच स्थिर झाले होते. ती त्यांच्या सांगण्याप्रमाणे डोळे झांकून उभी राहिल्यास काही थोडा वेळ लोटला नसेल, तोच मोठ्याने तिनें एक किंकाळी मारिली, आणि "महाराज, मला वांचवा हो वांचवा : असें ह्मणत त्यांचे पायावर लोळण घेतली."
रूपिणीला जिवंतपणीच या वेळी जो नरकाचा भयानक देखावा दिसला त्याच्या मुळाशी त्या महात्म्याचे काही अलौकिक सामर्थ्य होते, की, तो केवळ तिच्या कल्पनेचा होता, हे निश्चितपणे सांगतां येणे अशक्य आहे; व्यभिचारी जीवांस नरकलोकी कसे भयंकर शासन मिळते, या विषयींच्या गोष्टी नेहमी तिच्या कानांवर पडत असून त्यावरून तत्संबंधी विचारहि तिच्या मनांत नेहमी घोळत असत. यामुळे मुनीच्या भाषणाने आधीच विशेष श्रद्धाळू बनलेल्या मनास त्याच विचारांचे काल्पनिक चित्र अगदी मूर्तिमंत दिसा ही गोष्ट कदाचित् अधिक संभवनीय असेल. ते कांही असो. एवढी गोष्ट ग्वरी, की, तो दिसलेला भयानक देखावा तिला इतका खरा वाटला, आणि त्याचा तिच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला, की, ती स्थिति आपण प्रत्यक्षच भोगीत आहोत अशी तिच्या मनाची समजूत होऊन, तिने वर सांगितल्याप्रमाणे भेदरून जाऊन मोठ्याने किंकाळी फोडिली !