________________
विचारवंतांनी या सिद्धांताची दखल घेतली. 'सापेक्षतावादाचा सिद्धांत' वैज्ञानिक क्षेत्रात मांडणाऱ्या आईन्स्टाइनने जैनांच्या अनेकांतवादाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. 'विभज्यवाद' व 'मध्यममार्गा'चा अवलंब बुद्धानेही केला ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति' या ऋग्वेदवचनातूनही वैचारिक उदारतेचेच द्योतन होते. परंतु जैन दर्शनाने व न्यायशास्त्राने हा विचार नयवाद, स्याद्वाद व अनेकांतवादाच्या रूपाने नीट विकसित करून सिद्धांतरूप बनविला. परिणामी ‘अनेकांतदर्शन' हे जैन दर्शनाचे पर्यायी नाव बनले.
(८) जैन महामंत्र :
सर्व जैन संप्रदाय-उपसंप्रदायांना एकमताने शिरोधार्य व पवित्र असलेला जैनधर्मातील प्रभावी मंत्र म्हणजे 'नमस्कार' अथवा 'नवकार मंत्र' होय. तो मंत्र याप्रमाणे -
नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं
नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमोक्कारो सव्वपावप्पणासणो मंगलाणं च सव्येसिं पढमं हवइ मंगलं ।।
हा मंत्र अर्धमागधी भाषेत आहे. जैनधर्मानुसार हा सर्व मंत्रांचा राजा व तत्त्वज्ञानाचे सार आहे. यात विश्वातील सर्व अरिहंत (अर्हत्), सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांना नमस्कार केला आहे. जैनधर्मानुसार हे पंच परमेष्ठी आहेत. म्हणजेच सर्वोत्कृष्ट आदर्शाची प्रतिके आहेत. पंच परमेष्ठींना हा नमस्कार असला तरी त्यात निजस्वरूप परमात्म्याचे गुणगान आहे.
आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने अरिहंत आणि सिद्ध हे समान आहेत परंतु अरिहंत हे सशरीरी आहेत व सिद्ध हे अशरीरी आहेत. आचार्य, उपाध्याय आणि साधू हे तिघेही मोक्षमार्गाचे आराधक असून त्यांच्यात बाह्य व आभ्यंतर निग्रंथता असते. परंतु व्यावहारिक दृष्टीने त्यांच्या कार्यांमध्ये भेद असतो. आचार्य हे संघावर शासन करतात आणि जैनशासनाचा महिमा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. उपाध्याय हे समग्र आगमांचे व प्रायश्चित्त शास्त्राचे ज्ञाते असतात. साधु-साध्वीवर्गाच्या अध्यापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
नमस्काराच्या रूपाने या पाचांच्या अंगी असलेल्या गुणांची आराधना केली जाते. पंच परमेष्ठींच्या नमस्कारानंतर या मंत्रातच असे निर्दिष्ट केले आहे की यांची गुणपूजा ही सर्व पापांचा नाश करते. जैनांच्या मते विश्वातील सर्वात मंगलप्रद गोष्ट म्हणजे नमस्कारमंत्र होय.
(८ अ) जैन ध्वज :
___ जैन शासनात ध्वजाची प्रथा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी जैन ध्वज केशरी रंगाचा स्वस्तिक चिह्नांकित असा, त्रिकोणी आकाराचा होता. महावीरांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवाच्या वेळी मुनीश्री विद्यानंदजी यांनी पंच परमेष्ठींचे व पंच महाव्रतांचे प्रतिक असलेला पंचरंगी ध्वज प्रचलित केला. श्वेत रंग अहिंसेचा आणि अरिहंतांचा आहे. लाल रंग सत्याचा आणि सिद्धांचा आहे. पीत रंग अचौर्याचा आणि आचार्यांचा आहे. हरित रंग ब्रह्मचर्याचा आणि उपाध्यायांचा आहे. नील रंग अपरिग्रहाचा आणि साधूंचा द्योतक आहे. हा पंचरंगी ध्वज सर्व जैनधर्मीयांमध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करतो.