________________
(८ ब ) जैन प्रतीकचिह्न :
जैन प्रतीकचिह्न बनवताना जैन दृष्टीने विश्वाच्या आकाराची बाह्य प्रतिकृती बनवितात. त्यावर वरच्या बाजूस चार गतींचे प्रतीक असलेले स्वस्तिक व खालच्या बाजूला १२, १६ अगर २४ आऱ्याचे धर्मचक्र दर्शविलेले असते. या प्रतीकचिह्नाच्या अग्रभागी सिद्धशिलादर्शक एक अर्धचंद्राकार रेघ व ज्ञान - दर्शन - चारित्रदर्शक तीन बिंदू दर्शविले जातात. बऱ्याच वेळा प्रतिकाच्या खालच्या बाजूस हाताच्या बाह्याकृतीवर धर्मचक्र दर्शविलेले दिसते.
(९) जैन मंदिरे व तीर्थक्षेत्रे :
आज भारतात स्तिमित करणारे जे प्राचीन कलाविष्कार आहेत त्यातील वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला यांमधील जैनांचे योगदान लक्षवेधक आहे. गुंफानिर्मिती या कलाविष्काराचा पहिला टप्पा असून तो मंदिरे, मूर्ती व चित्रकलेच्या स्वरूपात अधिकाधिक सौंदर्यपूर्ण होत गेला. जैन वास्तुकलेचा विकास स्तूप, गुंफा, चैत्य आणि अखेर मंदिर या क्रमाने झालेला दिसतो. परंतु आज उभ्या असलेल्या स्वतंत्र, संरचनात्मक (स्ट्रक्चरल), सर्वोत्कृष्ट अखंड मंदिरांचा काळ दहाव्या शतकाच्या मागे जात नाही.
मौर्यकालीन जैन मंदिरांचे अवशेष पटण्याजवळ लोहानीपुर येथे सापडले. 'ऐहोळे' येथील 'मेघुटी' मंदिर (इ.स.६३४) त्यातील शिलालेखामुळे महत्त्वाचे ठरते. हे मंदिर ' द्राविडी' शैलीत आहे. धारवाड जिल्ह्यातली दोन मंदिरे (१२ वे शतक) याच शैलीत आहे. 'होयसाळ' राजवटीतील (१४ वे शतक) 'मूडबिद्री'चे मंदिर, स्तंभांवरील कमळांच्या शिल्पांनी चिरस्मरणीय ठरते. प्राचीनतम जैन ग्रंथांच्या ताडपत्रीय हस्तलिखित प्रतीही मूडबिद्रीच्या ग्रंथभांडारात आहेत.
झाशी जिल्ह्यातील‘देवगड' पहाडीवरील जैन मंदिर-समूहांवर 'नागर' शैलीचा प्रभाव दिसतो. मध्य प्रदेशातील अतिप्रसिद्ध 'खजुराहो' मंदिरांमधील आदिनाथ, शांतिनाथ आणि पार्श्वनाथ यांची मंदिरे अप्रतिम आहेत. मध्य प्रदेशातीलच 'मुक्तागिरि' मंदिरसमूह पर्वतराजी आणि धबधब्याच्या पार्श्वभूमीमुळे नयनरम्य झाला आहे. यावर मुघल शैलीचा प्रभाव आहे. राजस्थान आणि मारवाडमध्ये तर 'देवालयांची नगरे' आहेत. जोधपुरजवळील 'राणकपुर' येथील चतुर्मुखी मंदिर वास्तुकलेचा अजोड नमुना आहे. अर्बुदाचल अर्थात् आबूच्या पहाडातील 'दिलवाडा' येथील पाच प्रमुख मंदिरे तर अवघ्या भारतीय वास्तुकलेला ललामभूत आहे. त्यांचा इतिहास, दंतकथा आणि अप्रतिम कारागिरी केवळ अद्भुत आणि कल्पनातीत आहे. संगमरवरातून कोरून काढलेली छताची झुंबरे पाहून रसिकांची मने अननुभूत सौंदर्यानुभूतीने भारून जातात.
सौराष्ट्रातील शत्रुंजय (पालीताणा) आणि गिरनार हे मंदिरसमूह तसेच बिहारमधील 'सम्मेदशिखर' ही तीर्थंकरांच्या इतिहासाशी संलग्न पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.
जैन मुनींच्या सिद्धींशी संबंधित असलेल्या स्थलांना 'अतिशय क्षेत्रे' म्हणतात. ही क्षेत्रे भारतभर विखुरली आहेत. याखेरीज, 'नष्ट झालेल्या, नष्ट केलेल्या आणि परिवर्तित केलेल्या जैन मंदिरांची संख्याही शेकड्यात मोजावी लागते'-असे पुरातत्त्वविद् म्हणतात. 'अखिल भारतीय दिगंबर तीर्थोद्धार समिती' ने प्राचीन तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या दशकात हाती घेतले आहे.
आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी - आणि जेथे जेथे जैन श्रावकवर्ग पोहोचला आहे तेथे तेथे संप्रदायवाद बाजूला ठेवून मंदिरे व स्थानके उभारली गेली आहेत व जात आहेत. भारतातही जैन समाज मंदिर-निर्मितीच्या कमी अतिशय उत्साही आहे. मंदिरे, मूर्तिप्रतिष्ठा आणि दीक्षामहोत्सव यामधे खर्च होणारा अमाप पैसा हा शिक्षण, आरोग्य, आपत्तिनिवारण, रोजगारसंधी आणि अनेक समाजोपयोगी उपक्रमांकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील असलेला एक जैनवर्ग गेल्या दोन-तीन दशकांपासून क्रियाशील झालेला दिसतो.