________________
जैन तत्त्वज्ञानात मोक्षमार्ग एक आणि एकच आहे. तो तीन घटकांनी अथवा तीन मौल्यवान रत्नांनी बनलेला आहे. त्यांची आराधना एकापाठोपाठ एक करावयाची नसून एकत्रितच करावयाची आहे. आरंभी षड्द्रव्ये, नवतत्त्वे इत्यादींचे माहितीवजा ज्ञान असणे अपेक्षित आहे. खरे “देव - गुरु- धर्म” यांवर आणि द्रव्य - तत्त्वांवर सम्यक् श्रद्धा म्हणजे ‘सम्यक् दर्शन' अथवा 'सम्यक्त्व'. पक्षपातरहित उचित श्रद्धा दृढ झाली की प्राप्त केलेल्या ज्ञानालाही ‘सम्यक्त्व' येऊ लागते. हे 'सम्यक् ज्ञान' होय. जिनांनी घालून दिलेल्या आचारनियमांचे प्रत्यक्षात पालन करणे हे 'सम्यक् चारित्र' होय. चारित्र अगर आचारधर्म दोन प्रकारचा दिसतो. साधु-आचार आणि श्रावकाचार. अनेक जैन आचारप्रधान ग्रंथात पंचमहाव्रते, समिति, गुप्ति यांच्यावर आधारलेला 'साधुधर्म' आणि पाच अणुव्रते, गुणव्रते व शिक्षाव्रते यांच्यावर आधारलेला 'श्रावकधर्म' विस्ताराने वर्णिलेला दिसतो. दिगंबर परंपरेत '११ प्रतिमां' च्या सहायाने श्रावक, उपासक अगर गृहस्थाला मार्गदर्शन केलेले दिसते. हे तीन स्वतंत्र मार्ग नाहीत. मोक्षप्राप्तीसाठी तिन्हींची यथायोग्य आराधना अपेक्षित आहे. 'त्रिरत्न' संकल्पना श्रमण परंपरेचे वैशिष्ट्य दिसते. कारण बौद्ध धर्मातही सम्यक् प्रज्ञा- शील-समाधि यांना 'त्रिरत्न' म्हटले आहे.
(इ) आध्यात्मिक विकासाच्या श्रेणी अर्थात् गुणस्थान :
आत्मिक विकास हा रत्नत्रयाच्या शुद्धीनुसार होत असतो. हा विकास क्रमिक असतो. मार्गदर्शनार्थ त्याचे चौदा टप्पे, श्रेणी, स्थाने अथवा पायऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. एका बाजूने कर्मनिर्जरेशी त्याची जोड घालण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूने धर्मध्यान आणि शुक्लध्यानाशी सांगड घातलेली दिसते. गुणश्रेणीवर उत्तरोत्तर विकास करणाऱ्या जीवाला प्राप्त होणाऱ्या ऋद्धी-सिद्धी - अतिशय यांचे वर्णनही जैनांच्या आध्यात्मिक ग्रंथात मिळते. याबाबत पातंजल योग- सूत्रांशी जैन सूत्रे खूपच मिळती-जुळती दिसतात. एकाक्षरी ध्यानासाठी ॐ हेच अक्षर त्यांनीही पवित्र मानले आहे. ॐ, स्वस्तिक आणि कमळ ही भारतीय संस्कृतीची प्रतीकात्मक चिह्ने जैनांनीही तपशिलाच्या थोड्या भिन्नतेसह मानलेली दिसतात.
(फ) कर्मसिद्धांत आणि कर्मशास्त्र :
चार्वाक अथवा बार्हस्पत्यांचा अपवाद वगळता सर्व भारतीय दर्शनांनी जे मुद्दे एकमुखाने मान्य केले आहेत, त्यापैकी मुख्य आहे तो कर्मसिद्धांत.
प्राण्यांच्या सुखदुःखभोगात ईश्वरी कर्तृत्व न आणता त्यांची उपपत्ती तर्कसंगत रितीने लावावयाची असल्याने जैनांनी कर्मचिकित्सा इतकी सूक्ष्मतेने व अनेकदा क्लिष्टतेने केली आहे की भल्या-भल्या अभ्यासकांची मती कुंठित व्हावी. तो केवळ एक सिद्धांत न राहता परिपूर्ण ज्ञानशाखाच तयार केली. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत प्राकृत- संस्कृत भाषांत कर्मसिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अक्षरश: शेकडो ग्रंथ लिहिलेलेसितात. जैनांच्या सूक्ष्म कर्मसिद्धांताचे सार पुढीलप्रमाणे सांगता येईल
स्वयं कर्म करोत्यात्मा, स्वयं तत्फलमश्नुते ।
-
स्वयं भ्रमति संसारे, स्वयं तस्माद् विमुच्यते ||
जीव स्वत:च्या कर्मांचा स्वतःच कर्ता व भोक्ता आहे. तो स्वत:च कर्मयोगाने बांधला जातो आणि स्वप्रयत्नानेच त्यातून सुटणार आहे. ईश्वर, ईश्वरेच्छा, ईशकृपा इ. ला यामध्ये स्थान नाही.
‘बंध' नावाच्या तत्त्वात विवेचन केल्याप्रमाणे कर्मपुद्गल (अथवा परमाणू ) आत्मप्रदेशांशी निगडित होणे म्हणजे कर्मबंध होय. हा कर्मबंध चार प्रकारचा असतो. प्रकृति, स्थिति, अनुभाग आणि प्रदेश. प्रकृति म्हणजे स्वभाव. कर्माच्या मूळ प्रकृती आठ आणि उत्तरप्रकृती १४८ आहेत. येथे फक्त मूळप्रकृती नोंदविणेच शक्य आहे. प्रत्येकाचे अनेक उपप्रकार कर्मशास्त्रात नोंदवले आहेत.
(१) ज्ञानावरणीय कर्मामुळे आत्म्याच्या ज्ञानगुणावर आवरण निर्माण होते. (२) दर्शनावरणीय कर्म आत्म्याच्या