________________
(क) नऊ अथवा सात तत्त्वे :
जीव आणि अजीव ही दोन द्रव्ये एकमेकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या एकत्र येण्याने अथवा विभक्त होण्याने नऊ अथवा सात नैतिक, मानसिक किंवा आध्यात्मिक तत्त्वे कार्यरत असतात. जीव आणि पुद्गलकर्म यांच्या संयोग-वियोगाने जीवाला बंध व मोक्ष कसे प्राप्त होतात हे सांगण्याचे काम नऊ अगर सात तत्त्वांनी केले आहे. म्हणून या तत्त्वांना जीव आणि अजीव यांचे विशेष प्रकार मानले आहेत. त्यापैकी 'जीव' आणि 'अजीव' यांचा विचार द्रव्यसंकल्पनेखाली केला. आता पुण्य, पाप, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष यांचा संक्षेपाने विचार करू.
पुण्य-पाप यांचा समावेश 'आस्रव' अथवा 'बंध' तत्त्वात होऊ शकतो. शुभ कर्म म्हणजे पुण्य. त्याची अनेक कारणे व उदाहरणे दिली आहेत. अशुभ कर्म म्हणजे पाप. त्याचीही अनेक कारणे व उदाहरणे दिली आहेत. शुभ व अशुभ भाव हे भावपुण्य व भावपाप होतात. आत्म्याशी जोडले गेलेले जड कर्मपुद्गल हे द्रव्य-पुण्य-पाप होतात. पारमार्थिक दृष्टीने पाप व पुण्य दोन्ही बंधनकारकच आहे. ह्यापलिकडचा 'शुद्ध' भाव धारण करणाराच आत्मिक विकास करू शकतो. ___आस्रव/आश्रव म्हणजे कर्मपुद्गलांचा आत्म्यात शिरणारा प्रवाह. शारीरिक-मानसिक-वाचिक क्रिया, मिथ्यात्व आणि कषाय (क्रोध, लोभ इ.) इत्यादी अनेक कारणांनी कर्मपुद्गल आत्म्यात (जीवात) स्रवू लागतात. हा आस्रव प्रत्येक जीवात निरंतर चालू असतो.
कर्मपुद्गलांचा आत्म्यात आस्रव झाला की दोहोंचे प्रदेश एकमेकात मिसळतात. आत्मा कर्मपुद्गलांनी बांधला जातो. यालाच 'कर्मबंध' म्हणतात. यासंबंधी अधिक विचार जैनांनी 'कर्मसिद्धांत' अथवा 'कर्मशास्त्रात' केला आहे.
जीवामध्ये शिरणाऱ्या कर्मांचे आगमन थांबवणे अथवा रोखणे म्हणजे 'संवर' होय. कर्मांचा आत्म्यात शिरणारा प्रवाह निरुद्ध करण्यासाठी जैन आचारशास्त्राने अनेक उपायांचे दिग्दर्शन केले आहे. पाच महाव्रते, पाच समिति (नियंत्रित हालचाली), तीन गुप्ति (मन-वचन-कायेचा संयम अथवा गोपन), ऋजुता-मृदुता आदि दहा सद्गुण, बारा प्रकारच्या भावना (सर्व काही क्षणभंगुर आहे, मी एकटा आहे, माझे कोणी नाही इत्यादि विचार), बावीस प्रकारच्या प्रतिकूल स्थिती सहन करणे, पाच प्रकारचे चारित्र - या सर्वांच्या सहाय्याने संवर साधता येतो.
'निर्जरा' म्हणजे जीवात प्रविष्ट झालेली कर्मे जीर्ण करणे, झटकून टाकणे, दूर करणे. कर्मे आत्म्यापासून दूर होण्याची प्रक्रिया सहजपणे होत असते (अकाम निर्जरा) अथवा तपस्येने विचारपूर्वकही करता येते (सकाम निर्जरा). निर्जरेचे मुख्य साधन आहे तप'. आंतरिक आणि बाह्य मिळून ते तप बारा प्रकारचे असते. जैन धर्मात तपांचे व विशेषतः अनशन (उपवास) तपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बेला, तेला, अठाई असे निरंकार उपवास करणारे हजारो लोक आजही जैन समाजात आहेत. उपवासाचे उद्यापन अथवा पारणे उत्सवी थाटामाटात मिरवणुकीसह करण्याचाही प्रघात आहे. ____ अनादि काळापासून जीवाच्या संपर्कात राहून जीवाला बद्ध करणाऱ्या सर्व कर्मांची पूर्ण निर्जरा झाली की आत्मा बंधनमुक्त होतो. त्याचे शुद्ध रूप प्रकट होते. आपल्या ऊर्ध्वगामी स्वभावानुसार हा जीव विश्वाच्या माथ्यावर नित्य वास करतो. त्याची जन्ममरणचक्रातून कायमची सुटका होते. याचेच नाव मोक्ष अथवा निर्वाण.
(ड) रत्नत्रयात्मक मोक्षमार्ग :
श्रीमद्-भगवद्-गीता हा रूढ अर्थाने हिंदुधर्मीयांचा प्रातिनिधिक पवित्र ग्रंथ मानला जातो. ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग, निष्काम-कर्म-मार्ग - अशी मार्गांची विविधता गीतेत वेगवेगळ्या अध्यायात प्रतिपादिलेली दिसते. गीतेचा अभिप्राय असा आहे की वरीलपैकी कोणत्याही मार्गाचे निष्ठेने पालन केले की मोक्षप्राप्ती होऊ शकते. म्हणजे मार्गांची विविधता सांगितली आहे.