________________
'दृष्ट' 'श्रुत' 'मत' शब्दातून जाणवला पुरेपूर आत्मविश्वास परमात्मपदाच्या वर्णनात दिसले तुमच्या अनुभूतींचे निश्वास 'धुत' अध्ययनातून दिलेस अवधूततत्त्वाचे निकष कूर्म आणि वृक्षाचे दिलेस दृष्टांत आमच्यासाठी सकस निर्लिप्तपणे जगणाऱ्यांसाठी ‘महावीर' शब्द वापरलास भयग्रस्तांना अभय देणारा तूच खरा महावीर ठरलास कुटुंब-स्वजन-परित्याग साधूंसाठी पहिलं ‘धुत' कर्म-परित्याग, भाव-मुंडन तू सांगितलंस दुसरं धुत आधीच मोजकी उपकरणं, त्यांचाही क्रमाक्रमानं त्याग शरीराच्या लघुतेलाही महत्त्व दिलंस तू खास तितिक्षा, कषायांचं स्थान प्रत्येक अध्ययनात सांगितलंस आचारपतित साधू-मुनींना कठोर शब्दात फटकारलंस शरीर-जीवांच्या अलगतेचा विचार, 'विमोक्ष' अध्ययनाचं सार मोक्षाचं वर्णन असेल म्हणून, वाचायला घेतलं उत्सुकतेनं फार आठ उद्देशात पुन्हा एकदा आरंभ ते उपसंहार विमोक्ष अध्ययनात दिसला, पंडितमरणाचा गंभीर विचार आदरभाव-उपेक्षाभाव, केव्हा कुठं ठेवावा वादाचा मुकाबला वादानं, कोणत्या वेळी करावा धार्मिकता नसते गावात, अरण्यात, ती तर असते मनात मौनाचं महत्त्व वेळोवेळी सांगितलंस ठेवायला ध्यानात शरीर-कषायांची कृशता आणि पृथक्त्वाची भावना तीनही प्रकारच्या मरणांनी होते आयुष्याची सार्थकता.