________________
ह्या आट्यापिट्यात धावता धावता इंद्रियांनी साथ सोडली. ती शिणली. असाध्य व्याधींनी शरीरात ठाण मांडले. वेदनांनी घेराव घातला. हायत्राय सुरू झाली. सर्वांना हवाहवासा वाटणारा तोच आता नकोसा झाला. अनीतीने आणलेल्या लक्ष्मीनेही पाठ फिरवली. ज्यांच्यासाठी एवढी मेहनत केली त्यांनीही तोंड फिरवले. तेव्हा भगवंताचे शब्द आठवले - 'णालं ते तव ताणाए वा सरणाए वा ।' स्वजन आदि शरण देण्यात असमर्थ आहेत. सांसारिक सुख हे सारे क्षणिक आहे, अस्थिर आहे, स्वप्नवत् आहे. अज्ञानी अवस्थेत सांसारिक भोग-उपभोगात दुर्लभ जीवनाची इतिश्री केली. आणि जन्म मरणाच्या चक्रात पुन्हा अडकला. ही जीवाची अज्ञानी अवस्था पाहूनच आचारांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधातील विमुक्ती अध्ययनात आचार्यांनी तत्त्वदर्शी विधाने केली आहेत असे वाटते.
संसारात मनुष्याचे शरीर, सुखसमृद्धी, नातीगोती सारे अनित्य आहे. तेव्हा निर्भयतेने राग, द्वेष, मोह, आरंभ, परिग्रहाचा त्याग कर. सर्वांनाच आपले जीवन प्रिय आहे. म्हणून कोणत्याही जीवाची हिंसा करू नकोस. कोणीही निंदा केली, तिरस्कार केला, दुर्व्यवहार केला तरी समभावनेने सहन कर. उत्तम क्षमा आदींचा स्वीकार करून तृष्णेचा त्याग कर. तपोबल वाढव. कर्माचा नाश करण्यासाठी पंचमहाव्रतांचे पालन कर. सर्व परीषह अनासक्त भावनेने सहन करून कर्मबंधनातून मुक्त होऊन अक्षय, अव्यय, निराबाध अर्थात् मोक्षाचा स्वामी हो.
६०