________________
(२०) आचारांगाचा मौल्यवान् संदेश
शकुंतला चोरडिया
आचारांग ह्या प्राचीनतम जैन ग्रंथातील प्रथम श्रुतस्कंधात अनेक छोटी छोटी सूत्रवजा वाक्ये आहेत. त्या छोट्या अर्थपूर्ण मौलिक वाक्यातून सजग जीवन जगण्याचा जणू धागाच सापडतो. 'णत्थि कालस्स णागमो' ह्या हृदयस्पर्शी वाक्याने केवढा मोठा संदेश दिला आहे. काळाचा काही भरवसा नाही. तो केव्हाही येईल आणि येथील जीवनयात्रा संपून जाईल. तेव्हा प्रतिक्षणी आयुष्याचे अनमोल क्षण संपत आहेत ह्याचा विसर पडलेल्या अज्ञानी भोळ्या जीवाचे सद्यस्थितीचे चित्रण डोळ्यासमोर तरळते.
-
‘अहिंसा परमो धर्मः' म्हणवणारे पूजा, सन्मान, सत्कार, प्रतिष्ठेसाठी स्थावर जीवांची वारेमाप हिंसा करत आहेत. विषयवासनेच्या आधीन झालेल्या माणसाची इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी नको तेवढी धडपड चालली आहे. आप्त, स्वकीय, प्रियजनांच्या मोहाने प्रेमाने वेडावलेला माणूस सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस धावत आहे. जसजसे पैसा, ऐश्वर्य, मानमरातब वाढत चालले, तसतसे विवेकाचे डोळे बंद झाले आणि अनीतीचे मार्ग खुले झाले. दुराचारी लोकांची संगत वाढली. पैसा मिळविण्यासाठी किती खालच्या थरापर्यंत तो पोहोचला ! 'माझे हात कोठपर्यंत पोहोचले आहेत' हे दाखविण्यासाठी पुढाऱ्यांची मनमानी केली. मोठमोठ्या पार्यांचे आयोजन केले. मोठमोठ्या देणग्या देऊन नावाच्या पाट्या लावल्या. नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवून सुखाची प्राप्ती केली. पण तीही क्षणिकच ठरली.
५९