________________
अहिंसा ह्या संकल्पनेचा प्रारंभच ह्या स्थावर जीवांच्या रक्षणाने झालेला दिसतो. त्यामुळे ‘पास लोए महब्भयं' या सूत्रामुळे पंचकर्म, सौंदर्य चिकित्सा, स्पा थेरपीज् याकडे पहाण्याची चिकित्सकवृत्ती आली. सौंदर्य वाढवणाऱ्या वस्तूंमध्ये त्या जीवांविषयी करुणाभाव दिसू लागला.
महावीरांची दूरदृष्टी अफाट होती. ते 'आयतचक्खु' होते. ज्या समस्या आपणास आत्ता भेडसावत आहेत त्यांचा विचार त्यांनी त्याकाळीच केला. अन्न, पाणी, वस्त्र याचा गरजेपुरताच वापर केल्यास पर्यावरण संतुलनाबरोबर मानसिक संतुलनही रहाते हे जाणवले व त्यादृष्टीने विचार करण्यास चालना मिळाली. साधूंची आचारसंहिता सूक्ष्म निरीक्षणातूनच बनवली. साधूने न पहाता, काळजी न घेता कोणतीही गोष्ट करू नये. त्यांनी आहार, विहार, भिक्षा, रहाण्यासंबंधी समितीयुक्तच जीवन जगावे. महावीरांचे सूक्ष्म निरीक्षण समाजातील अनेक भिडूंना योग्य मार्गदर्शनच ठरले.
त्याकाळची खान-पान व्यवस्था, उत्सव, वस्त्रे, घरे, भोजनसमारंभ यातून भारताच्या समृद्धीचे, भरभराटीचे दर्शन होते. आपण किती मॉडर्न, आधुनिक, सुधारित, रॉयल राहणीमान जगतो हा व्यर्थ अभिमान हे सर्व पाहून गळून पडतो. आपण फक्त कृत्रिमता व भपकेबाज यात गुरफटत आहोत, हे समजते.
उपसंहार :
आचारांग हे खऱ्या अर्थाने विचारांग आहे. 'पास, पासह, पासेज्जा' हे सांगून चिंतन करायला लावते. कोणतीही साधनसामग्री उपलब्ध नसताना केवळ निरीक्षणातून आपल्याला इथपर्यंत आणून सोडले की, आपण प्रत्येक गोष्ट करताना निरीक्षण करायला शिकलो तर आपल्या हातून पण हिंसा कमी होईल.