________________
(१८) महावीरांनी निरीक्षणाला दिलेले महत्त्व
- कल्पना मुथा 'पास', 'पासह', 'पासेज्जा' हे शब्द आचारांगात बऱ्याच ठिकाणी दिसतात. 'आजूबाजूला असलेल्या घटकांचे नीट निरीक्षण करून त्याचे स्वरूप समजावून घ्या व प्रत्येकाशी कसे वागावे याचा सखोल विचार करा', हीच आचारांगाची प्रमुख सुरुवात होय. पूर्वपरंपरेने महावीरांनी जे ऐकले, अनुभवले त्यावर स्वत:चे निरीक्षण, चिंतन करून पहा, विचार करा असे सांगून साधूला व श्रावकाला सावध केले. सृष्टीचे दार उघडले.
सर्व एकेंद्रियांपासून स्थूलापर्यंत सर्वांना मनापासून जाणले तर त्यांच्यात सुद्धा प्राणचेतना, संवेदना आहे हा सूक्ष्म आणि व्यापक विचार महावीरांनी केला. एकेंद्रियांच्या वेदनेला आवाज दिला. त्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचवल्या. जरी या जीवांना आपल्या वेदना व्यक्त करता आल्या नाहीत आणि आपल्याला सुद्धा त्या कधी कळल्याच नाहीत, त्यांच्यात जीवत्व आहे ह्या दृष्टीने आपण कधी त्यांच्याकडे पाहिलेही नाही. हीच सूक्ष्म दृष्टी महावीरांनी आपल्याला दिली. ह्या स्थावरकायिक जीवांच्या सहभागामुळेच आपण जगत असतो. हे जीव सुद्धा मनात प्रेमभाव धरूनच असतात. हे निरीक्षणाने कळल्यामुळे क्रिया-प्रतिक्रिया करताना उदारभाव ठेवता आला. सावधानतेबरोबर जागरूकताही आली.
प्रत्येक विषम परिस्थितीकडे समभावाने पहा, हे त्यांचे वक्तव्य आजच्या धावपळीच्या, अनित्य अशा जीवनात समुपदेशनाचे काम करते. जीवनातील मरगळ दूर होवून प्रत्येक गोष्टीकडे 'पॉझिटिव्ह अँगल'नेच पाहिले जाते.
‘णालं पास' अशा छोट्या सूत्राद्वारे भोगोपभोग व परिग्रह यामुळे अविश्वास व भय कसे वाढीला लागतात याचे मानवी विचारांच्या अनुषंगाने कलेले निरीक्षण कळते आणि संसारात मर्यादेबरोबरच सहनशीलता वाढवण्याची दृष्टी येते.