________________
असे हे काटेकोर असलेले नियम पुढे छेदसूत्र काळापर्यंत शिथिल होत गेले. 'वनस्पतिजन्य प्रासुक एषणीय द्रव्यांच्या आधारे साधूने रोगचिकित्सा करवून घ्यावी', असा नियम रूढ झाला. कल्प, व्यवहार, निशीथसूत्रे यांमध्ये साधूंनी करावयाच्या चिकित्सेचे वर्णन येते.
रोगाने पीडित झालेल्या साधूंच्या आचरणात शिथिलता येईल व स्वाध्यायध्यानधारण-तप-जप-साधने याकडे त्याचे लक्ष लागणार नाही. म्हणूनच शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या उक्तीनुसार शरीर स्वस्थ ठेवणे गरजेचे आहे. कारण साधकाचे अंतिम ध्येय मोक्ष व ते मिळविण्यासाठी करावा लागणारा पुरुषार्थ यासाठी शरीर हेच साधन आहे.
आचारांगात आलेली रोगांची नावे, रोगचिकित्सेचे प्रकार यावरून त्यावेळचे वैद्यकशास्त्र किती प्रगत होते ते कळते. आजही अभ्यासकास ते मार्गदर्शक ठरते.
द्रव्य-क्षेत्र-काल-भावानुसार परिस्थिती बदलली आहे. आज मात्र समाजात साधुसाध्वींसाठी सर्व प्रकारच्या रोगचिकित्सा व त्यावर करावे लागणारे उपचार म्हणजे शस्त्रक्रियेपर्यंत विकास झाला आहे. यावर कर्मनिर्जरेसाठी ते गुरूंकडून प्रायश्चित्तही घेताना दिसतात. सर्वसंगपरित्याग केलेला असला तरी तेही मनुष्यच आहेत.
५४