________________
(१७) साधूंची रोगचिकित्सा
- कमल बोथरा
आचारांग हा साधुआचाराचे नियम सांगणारा ग्रंथ आहे. 'अहिंसेचे पूर्णांशाने पालन करणाऱ्या साधूने स्वशरीरात रोग उत्पन्न झाला तरी चिकित्सा करवून घेऊ नये' असे आचारांगात सांगितले आहे.
___ कारण पूर्वी जीवांचे छेदन-भेदन-हनन करून, त्यांची चरबी, हाडे, शिंगे, मज्जा, मांस इ.चा उपयोग करून औषधे बनविली जात होती. अशा औषधांनी ज्यांची चिकित्सा केली जाईल, त्यांचाही त्या हिंसेत सहभाग होतो. ते कर्मबंधाचे कारण ठरते. असे विधान स्वत: महावीरांनी केले आहे.
(संदर्भ :- आचारांग १-लोकविजय-सूत्र क्र.१४७)
प्रारंभी महावीरांनी साधूंसाठी रोगचिकित्सेचा पूर्ण निषेध केला आहे. अपरिग्रहव्रतधारी साधूला शरीराचे ममत्व ठेवून चालणार नाही. त्याने विचार करावा, ‘शरीर हे नाशवंत आहे. असाता वेदनीय कर्माच्या उदयाने माझ्या शरीरात रोग उत्पन्न झाला आहे. कायक्लेश परीषह समभावाने सहन केल्याने माझी कर्मनिर्जरा होईल.'
रोगचिकित्सा केल्याने रोगापासून मुक्त होऊन मला दीर्घायुष्य लाभेल, असा विचार साधूने करू नये. कारण आयुर्वर्धन संकल्पना जैन कर्मसिद्धांतात बसत नाही. प्रत्येकाची आयुमर्यादा आधीच ठरलेली असते. तैल, मर्दन, अभ्यंग, वमन, विरेचन, बस्ति ही आयुर्वेदातील पंचकर्मेही साधूंसाठी निषिद्ध मानली गेली. यावरून ते नियम काटेकोर असावेत.
५३