________________
(१४) जैन-बौद्ध आचारविचार : साम्य-भेद
- शकुंतला केमकर महावीरांचा काळ इ.स.पू.५२३ तर गौतम बुद्धांचा इ.स.पू.५६३. दोघांचा काळ जवळजवळ एकच. त्यावेळी समाजात यज्ञ-याग, पशुबळी यांचे स्तोम होते. दोघांनीही अहिंसेसाठी अथक प्रयत्न केले. दोन्ही धर्म श्रामण्यपर असल्याने जैन व बौद्ध साहित्यात अनेक संकल्पना, पदावली, उपमा, दृष्टांत यांमध्ये खूपच साम्य आढळते. त्यांचे प्रारंभिक विहारक्षेत्रही प्राय: एकच होते. म्हणून तेथील प्रचलित लोकभाषा अर्थात् ‘अर्धमागधी' व 'पाली' त्यांनी उपदेशासाठी स्वीकारल्या. दोघांनीही ऐन यौवनात गृहत्याग केला. दीर्घकाळ खडतर तपस्या, ध्यान व चिंतन केले. महावीरांच्या आत्मसाक्षात्कारास केवल-ज्ञान-प्राप्ती' म्हणतात तर गौतम बुद्धांच्या आत्मसाक्षात्कारास 'बोधि' म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर दोघांनीही दीर्घकाळ विहार करून धर्मोपदेश दिला.
___महावीरांची वाणी त्यांच्या गणधरांनी सूत्ररूपाने संकलित केली. तीन वाचनांच्या नंतर ती अकरा अर्धमागधी अंग-ग्रंथांच्या रूपाने ग्रंथारूढ झाली. गौतम बुद्धांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे गाथारूपाने बाहेर पडलेला उपदेश, त्यांच्या शिष्यांनी संकलित केला. त्यांच्याही तीन ‘संगीति' (वाचना) झाल्या. आज 'त्रिपिटका'च्या रूपाने तो उपदेश उपलब्ध आहे. अर्थात् दोघांच्याही साहित्यात वेळोवेळी भर पडलेली दिसते.
___ महावीरांनी सर्व जीवांच्या समानतेवर अधिक भर दिला. एकेंद्रियांची हिंसा करताना सदैव अप्रमत्तता ठेवण्याचा उपदेश दिला. बुद्धांची हिंसा इतकी सूक्ष्म नसून बरीच व्यावहारिक आहे.
४६